Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३० जानेवारी, २०२६

*बारामती दुर्दैवी विमान अपघातातील अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्यावर तरडगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार*

 अकलुज प्रतिनिधी 

  एहसान मुलाणी 

   टाइम्स 45 न्यूज मराठी



तरडगाव : बारामती येथील दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक आणि तरडगावचे सुपुत्र विदीप दिलीप जाधव (वय ३७) यांना वीरमरण आले. काल (बुधवार) रात्री उशिरा तरडगाव पालखी तळ परिसरात शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अवघ्या पंचक्रोशीचे डोळे पाणावले होते.

विदीप जाधव हे २००९ मध्ये मुंबई पोलिस दलात भरती झाले होते. २०१० पासून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा पथकात त्‍यांनी स्थान मिळवले. सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती जे. ए. सानप यांचे सुरक्षा रक्षक, त्यानंतर २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा सांभाळली.

तर २०१९ पासून ते अजित पवार यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते. कर्तव्य बजावत असतानाच काल नियतीने त्यांच्यावर घाला घातला. विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासमवेत विदीप जाधव व इतर तिघांचा मृत्यू झाला.

'मी आज दादांसोबत बारामतीला येतोय, संध्याकाळी घरी मुक्कामाला येईन...' असे सांगणारे विदीप तिरंग्यात लपेटून परतल्याचे पाहून त्यांच्या वृद्ध माता-पित्यांनी आणि पत्नीने केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या मागे आई, वडील, दोन बहिणी, तीन भाऊ, पत्नी संध्या यांच्‍यासह १३ वर्षांची मुलगी नेत्रा आणि आठ वर्षांचा मुलगा अद्विक जाधव ही दोन मुले असा परिवार आहे.

काल सायंकाळी विदीप यांचे पार्थिव गावात येताच तरडगावकर शोकसागरात बुडाले. सजवलेल्या ट्रॉलीतून त्यांची अंत्ययात्रा निघाल्‍यावर आबालवृद्धांनी लाडक्या सुपुत्राचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. पालखी तळ परिसरात पोलिस प्रशासनाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून त्‍यांना सलामी देण्‍यात आली.

'विदीप जाधव अमर रहे'च्या घोषणांनी आसमंत हेलावून गेला. यावेळी आमदार सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, माजी सभापती वसंत गायकवाड, अभिजित पवार, तहसीलदार पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा