Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २३ फेब्रुवारी, २०२६

साखर कारखान्यांच्या हंगामातील ऊस गाळपामध्ये वाढ होणे आवश्यक -हर्षवर्धन पाटील. •हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांचा शेतकऱ्यांकडून सर्वप्रथम राज्यामध्ये सर्व ऊस बिल अदा केल्याबद्दल सन्मान.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९



देशात व राज्यामध्ये साखर कारखान्यांचे हंगामातील ऊस गाळपाचे दिवस अलीकडच्या काळात कमी होत चालले आहेत. त्यामुळे हंगामातील उसाचे गाळप देखील कमी होत चालल्याने साखर उद्योगांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. साखर कारखान्यांच्या हंगामातील ऊस गाळपामध्ये यथोचित वाढ होण्यासाठी विविध उपाययोजना व नियोजन करून साखर कारखान्यांचे हंगामातील ऊसाचे गाळप वाढविणे ही काळाची गरज आहे  असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी  केले.




शहाजीनगर ( ता. इंदापूर ) येथे नीरा भीमा कारखाना कार्यस्थळावर रविवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी नीरा भीमा कारखान्याने चालू, सन २०२५-२६ च्या हंगामामध्ये ऊस बिलाची रक्कम रुपये ३१०१ राज्यात सर्वप्रथम अदा करणारा पहिला कारखाना ठरल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने संस्थापक हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा सौ. भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

 हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, चालू हंगामामध्ये कारखान्याने एकूण ५२५६५७ मे. टन ऊसाचे गाळप करत दि. १० फेब्रुवारी रोजी हंगामाची सांगता केली.  यामध्ये उसाच्या फुले २६४ वाणाचे प्रमाण ८५ टक्के तर को. ८६०३२ वाणाचे प्रमाण अवघे १५ टक्के आहे. या हंगामामध्ये अधिकचे ऊस गाळप होईल असे नियोजन होते, मात्र अपेक्षेपेक्षा कमी गाळप झाले, त्या संदर्भातील कारणे दुरुस्त केली जातील.  


 कारखान्याचे झालेले  ऊसाचे गाळप हे सांघिक प्रयत्नाचे यश आहे. आगामी काळात कारखान्याला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मल्टिफीड कन्सेप्ट स्वीकारावा लागेल, त्यामुळे कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल. कारखान्याला कॉम्प्रेस बायो गॅस युनिट असे इतर नवीन प्रकल्पही उभारावे लागतील. मात्र कार्यक्षेत्रातील  शेतकऱ्यांनी नोंदवलेला सर्व ऊस कारखान्याला देण्याची मानसिकता बाळगली पाहिजे. तसेच ऊस तोडणी प्रोग्रॅम काटेकोरपणे राबविण्यासाठी शेतकऱ्यांनी येत्या २८ फेब्रुवारी पर्यंत कारखान्याकडे उसाच्या नोंदी द्याव्यात, असे आवाहन केले. यावेळी  हर्षवर्धन पाटील यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली व्यक्त केली. इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी मी, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे आम्ही सर्व कटिबद्ध असल्याचे सांगितले.

यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील म्हणाल्या, कोणतेही यश संपादन करण्यासाठी व्यवस्थेमध्ये शिस्त व नियम पालन, जबाबदारीची जाणीव त्याचप्रमाणे कौशल्य व्यवस्थापन आवश्यक असते. त्याकडे लक्ष दिल्याने चालू हंगामात कारखान्याची प्रगती झाली आहे. हा पॅटर्न वेळोवेळी राबविला जाईल. शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिलाचा दिलेला शब्द भाऊ व वहिनी पाळणारच आहेत, याबद्दलचा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

 आगामी २०२६ - २७ च्या गळीत हंगामामध्ये  शेतकऱ्यांनी गुणवत्तेचा व नोंदलेला सर्व ऊस कारखान्याला द्यावा, शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिल दिले जाईल हा अध्यक्षा म्हणून शब्द आहे. चालू हंगामामध्ये कारखान्यास सहकार्य केल्याबद्दल पुणे जिल्हा बँकेचे संचालक व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आप्पासाहेब जगदाळे, संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांचे देखील  अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांनी आभार व्यक्त केले. 

प्रास्ताविक कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी केले. याप्रसंगी लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, डॉ. लक्ष्मण आसबे यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी नूतन जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे, राजवर्धन पाटील, बाबुराव रणवरे, अनिल पाटील, दत्तू सवासे, दत्तात्रय शिर्के, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजेंद्र देवकर, अमरदीप काळकुटे, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, उमेश पाटील, विक्रम कोरटकर, आनंदराव बोंद्रे, शरद जामदार, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, सरपंच पल्लवी गिरमे, निवृत्ती शिंदे, चंद्रकांत भोसले, किरण पाटील, भागवत गोरे, जयकुमार कारंडे आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी  मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे तर आभार ॲड. कृष्णाजी यादव यांनी मानले. 

•चौकट:

आगामी सन २०२६ -२७ च्या गळीत हंगामासाठी सध्या कारखान्याकडे उसाच्या नोंदी करणे चालू असून, शेतकऱ्यांनी दि. २८ फेब्रुवारी पर्यंत ऊस नोंदी कराव्यात. चालू हंगामातील ऊस वाहतूक यंत्रणेतील व इतर उणिवा दुरुस्त करून आगामी गळीत हंगामात ७ लाख मे.टन ऊस गाळप निश्चितपणे पूर्ण केले जाईल, असा विश्वास अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांनी व्यक्त करताच त्याचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत झाले. 

* कार्यक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांचे एकरी ऊस उत्पादन कमी आहे, अशा शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन केले जाईल. शेतकऱ्यांनी शेतातीलच बेणे वारंवार वापरल्याने उत्पादनात घट येत आहे, रोगाचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे ऊस संशोधन केंद्रातील प्रमाणित, सत्यप्रत बियाणे वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे ऊस उत्पादकता वाढल्यास कारखान्याचे हंगामातील गाळप देखील वाढणार आहे. त्यासाठी निरा भिमा कारखाना शेतकऱ्यांसाठी सहकार्य करेल, अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी देताच त्याचे शेतकऱ्यांनी उस्फुर्त स्वागत केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा