Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०२६

*भिमाई आश्रमशाळेत शिवजयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी*

 *इंदापूर, डॉ. संदेश शहा*.

*टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*


इंदापूर येथील भिमाई आश्रमशाळेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव विविध उपक्रमांनी जल्लोषात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त संपूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुल भगव्या पताकांनी तसेच आकर्षक सजावटीने लक्ष वेधून घेत होते.



मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे आणि मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे, सचिव ॲड. समीर मखरे, मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे आदी मान्यवरांच्या  हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी तथागत गौतम बुद्ध मूर्तीस पुष्प, माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित माहिती देण्यात आली. यावेळी 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या कार्यक्रमात विद्यार्थीनींनी शिवाजी महाराजांच्या जन्मावर पाळणा गीत सादर करून भक्तीभावाची रंगत वाढवली. एका विद्यार्थीनीने जोश पूर्ण शिवगर्जना देऊन सर्वांमध्ये उत्साह निर्माण केला.


यावेळी संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी इंदापूर शहरातील डॉ. आंबेडकर नगरातील जेतवन बुद्धविहारात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यानिमित्त इंदापूर नगरपालिकेच्या मैदानातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर, राष्ट्रपिता महात्मा फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना व श्री पांडुरंगाच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे उभारले, शिवाजी महाराजांच्या जीवनावर भाषणे, गीते, पोवाडे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. लेझीमचे अप्रतिम सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी सायंकाळी शाहीर विजय सरतापे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडे सादर केले. शेवटी एकत्रित शिवगर्जनाने कार्यक्रमाची सांगता झाली. नानासाहेब सानप यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी कार्यक्रमास संचालक अस्मिता मखरे, गोरख तिकोटे,  अश्वजीत कांबळे, नानासाहेब चव्हाण, तेजस मखरे, शितल पलंगे, राजाभाऊ गायकवाड, सुहास मखरे, परमेश्वर मखरे, सूरज धाईंजे, फारुख मुल्ला, बापू मखरे, सत्यवान भोसले, विजय खामगळ, आदींसह अधिक्षक, शिक्षक - शिक्षकेतर, विद्यार्थी, पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा