इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- इंदापूर तालुक्यातील २८८ आशासेविका व २० गटप्रवर्तक यांचा मागील तीन महिन्यापासूनचे मानधन थकल्याने उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने तातडीने मानधन देऊन उपासमार थांबवावी अशी मागणी केली जात आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य उपक्रमांतर्गत आशासेविका व गटप्रवर्तक यांची नेमणूक ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी करण्यात आली आहे. आशा सेविकांना ७२ हेडवरती काम केल्यानंतर त्याच्या मोबदल्यात त्यांना मानधन देण्यात येते. तर आशासेविका कडून कामे करून घेवून त्याचा पाठपुरावा शासनाकडे करण्याचे काम गटप्रवर्तकांना नेमले आहे.
विधवा, परीतक्ता, गरजू व गरीब महिलांची आशासेविका म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पण ज्या अशा सेविकांचे कुटुंबच निव्वळ त्यांच्या जीवावर चालते अशांची मात्र मोठी उपासमार व कुचंबना सुरू आहे. मात्र शासन केलेल्या कामाचा मोबदला देण्यास तीन महिन्यापासून टाळत असल्याने कुटुंब जगवण्यासाठी त्यांना शेतातील कामे करण्यासाठी हजेरीवर जाण्याची वेळ आली आहे. परंतु शासन याही कामाला जाऊन न देता आमचीच कामे करा असा दट्टा लावत आहे. त्यामुळे खायचे काय व जगायचे कसे असा सवाल केला जात आहे.
शासन स्तरावरील अधिकारी आशा सेविकांना ऑनलाइन कामे, विविध प्रकारचे सर्वे व इतर कोणी करत नसणारी कामे करून घेण्यासाठी कामावरून काढण्याची भीती दाखवत कामे करून घेत आहेत. त्याचा मोबदलाही वेळेत दिला जात नाही. यामुळे अशासेविकांना ताण तणावामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब व विविध प्रकारचे आजार जडले असून त्याचा खर्च त्यांना पेलवत नाही. अनेक आशासेविका कमी शिकलेल्या असल्याने त्यांना ऑनलाइन सर्वे करता येत नाहीत. परंतु वरिष्ठ अधिकारी घरातील सदस्याकडून ती करून घ्या असा दट्टा लावत आहेत. यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे.
चौकट- शासन मोबाईल व नेटचा खर्चही देत नसतानाही केवळ भीतीपोटी आशासेविका कामे पूर्ण करत आहेत. यांना कोणी वाली नसल्याने उठ सुट सर्वच अधिकारी मात्र अशा सेविकांकडे कामे करण्याचा हट्ट धरत असल्याने "भिक नको पण कुत्रे आवर" असे म्हणण्याची वेळ आली आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा