उपसंपादक -- नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
सीरियात 53 वर्षांपासून सुरू असलेली असद कुटुंबाची राजवट अवघ्या काही दिवसांत बंडखोरांनी उलथवून टाकली आणि संपूर्ण जगतात सीरिया या देशाची चर्चा सुरू झाली. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सनं यावर्षी जाहीर केलेल्या शक्तिशाली सैन्य दलांच्या जागतिक क्रमवारीनुसार, सीरिया हा देश अरब जगतात सहाव्या, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर साठाव्या स्थानी होता. अशा सीरियाची ही अशी अवस्था का झाली? अवघ्या 11 दिवसांत 53 वर्षांपासूनची राजवट कशी उध्वस्त झाली? सीरियन सैनिकांनी बंडखोरांसमोर शरणागती पत्करली? पत्नीच्या एका मुलाखतीमुळं बशर अल असद यांचं साम्राज्य कसं नष्ट झालं? या प्रश्नांची उत्तरं शोधणारा Top news चा हा स्पेशल रिपोर्ट… अस्वस्थ सीरियाची उध्वस्त राजवट!
सीरिया… मध्य-पूर्वेकडील अरब देश! गेली 14 वर्षांपासून सीरियात गृहयुद्ध सुरू होतंच. इथली हयात तहरीर अल-शाम (HTAS) या बंडखोर गटानं सरकारविरोधात बंड पुकारलं आणि सीरियावर 53 वर्षांपासून मजबूत पकड असलेल्या असद साम्राज्याचा अवघ्या 11 दिवसांत अंत झाला. बशर अल-असद यांचे वडील हाफिझ अल-असद 1971 मध्ये सीरियाचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि तेव्हापासून सीरियावर असद राजवटीचा एकछत्री अंमल सुरू झाला. सीरियाच्या सत्तेवर त्यांची अशी काही पकड होती की त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत लोकशाही मार्गानं निवडणुका होऊच दिल्या नाहीत. 2000 मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते सीरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी होते. हाफिझ अल-असद यांना दोन मुलं मोठा बसेल, तर धाकटा बशीर! 1994 मध्ये बसेल यांचा मृत्यू झाला आणि तेव्हापासूनच सीरियाचा पुढील राज्यकर्ता म्हणून बशर अल-असद यांच्या जडणघडणीला सुरुवात झाली.
हाफिझ अल-असद यांच्या मृत्यूनंतर 34 वर्षांच्या बशर अल-असद यांना सीरियाचा राष्ट्राध्यक्ष करण्यात आलं. सीरियाचा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी वयाची अट 40 असणं आवश्यक असतानाही सीरियाच्या राज्यघटनेत बदल करून ती खाली आणण्यात आली. बशर यांची नेतृत्वशैली पाहाता सीरियात एका नव्या युगाची सुरुवात होईल असं वाटलं खरं मात्र ती फोल ठरली.
कारण पुढील दहा वर्षांच्या त्यांच्या कारकीर्दीत नजर टाकता त्यांनी आपल्या वडलांच्या पावलांवर पावलं टाकायला सुरुवात केली होती. त्यांच्या राजवटीचं वर्णन देखील हुकुमशाही राजवट म्हणून केलं जाऊ लागलं. सरकारच्या विरोधातील आवाज दडपण्याचा मार्ग अवलंबायला त्यांनीही सुरुवात केली.
सीरियात बंड व्हायला सुरुवात कुठून आणि कशामुळं झाली, हे ऐकलं तर आपल्याला नवल वाटेल. डिसेंबर 2010 मध्ये बशर अल असद यांच्या पत्नी अस्मा यांनी एका मासिकाला मुलाखत देताना सीरियामध्ये 'लोकशाही' आहे,' असं म्हटलं आणि असद राजवटीच्या अंताला याच मुलाखतीपासून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. या मुलाखतीच्याच दिवशी एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं थप्पड लगावल्यामुळं मोहम्मद बोअझिझि या एका ट्युनिशियन भाजी विक्रेत्यानं स्वत:ला पेटवून घेतलं. या घटनेचे पडसाद ट्युनिशियात उमटले आणि त्याठिकाणी उठाव होऊन तिथले राष्ट्राध्यक्ष झाइन एल अबिदिन बेन अली यांची राजवट उलथवून टाकण्यात आली. ट्युनिशियातील हा उठाव एक निमित्त ठरलं आणि या उठावाचं अरब जगतातील इजिप्त, लिबिया, येमेन, बहरिन करत करत सीरियात जाऊन पोचलं. सीरियाची दमास्कसमध्ये आंदोलनं सुरू झाली. दारा या सीरियाच्या दक्षिणेकडील शहरात भिंतीवर असद-विरोधी घोषणा लिहिल्यानंतर काही मुलांना अटक करण्यात आली आणि दारा शहरातही आंदोलनं सुरू झाली. दारामध्ये सुरक्षा दलांनी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारामुळं परिस्थिती आणखी चिघळली. यानंतर मात्र सीरियातील अनेक शहरांमध्ये बशर अल-असद यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी आंदोलनं सुरू करण्यात आली. काही महिन्यांतच परिस्थिती इतकी चिघळली की, सरकारी सुरक्षा दलं आणि विरोधी गट यांच्यात सशस्त्र चकमकी होऊ लागल्या. देशभरातील विरोधी गटांनी सीरियन सरकारच्या विरोधात शस्त्रं हाती घेतल्यानं गृहयुद्धाला सुरुवात झाली.
सीरियातील संघर्ष जसजसा वाढत गेला, तसतसा त्यातील आंतरराष्ट्रीय शक्तींचा सहभाग देखील वाढत गेला. रशिया, इराण इराणचा पाठिंबा असलेल्या सशस्त्र गटांनी सीरियाच्या सुरक्षा दलांना मदत केली, तर तुर्की आणि आखाती देशांनी बशर अल-असद यांच्या विरोधातील सशस्त्र गटांना पाठिंबा दिला.
ऑगस्ट 2013 मध्ये दमास्कसच्या जवळ विरोधी गटांच्या ताब्यातील पूर्व घौटामध्ये रासायनिक हल्ला झाला ज्यात शेकडो लोक मारले गेले. पाश्चात्य शक्ती आणि सीरियातील विरोधी गटांनी या हल्ल्यासाठी असद सरकारला जबाबदार ठरवलं. आंतरराष्ट्रीय दबाव आणि धमक्यांमुळे सीरिया त्यांच्याकडील रासायनिक शस्त्रास्त्रांचा साठा नष्ट करण्यास तयार झाला.
अर्थात यामुळं सीरियातील अत्याचारांचा शेवट काही झाला नाही. उलट पुढील काळात रासायनिक हल्ले होतच राहिले. सीरियात यादवी माजली असतानाच ऑक्टोबर 2023 मध्ये हमासनं इस्रायलवर अचानक हल्ला केला आणि गाझा युद्धाची सुरूवात झाली. बशर अल-असद यांचा लेबनॉन सहकारी हिजबुल्लाहवर या युद्धाचा परिणाम झाला. त्यांचे नेते हसन नसरल्लाह मारले गेले. ज्या दिवशी लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी झाली त्याच दिवशी हयात तहरीर अल शामच्या (HTS) नेतृत्वाखालील सीरियातील बंडखोर गटांनी सीरियात हल्ला करण्यास सुरू केली आणि अलेप्पो या सीरियातील दुसऱ्या मोठ्या शहरावर ताबा मिळवला. पुढं जाऊन त्यांनी हमा आणि सीरियातील इतर शहरांवर ताबा मिळवला. काल तर बंडखोरांनी राजधानी दमास्कसवरही ताबा मिळवला आणि सीरियाच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.
सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद देश सोडून पळून गेले असल्यानं आता सीरिया 'मुक्त' झाला आहे, असा दावा या बंडखोरांनी केलाय. एकीकडं राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांनी मॉस्कोत आश्रय घेतल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं सांगण्यात येत असलं तरी दुसरीकडं मात्र धन्यवाद, धन्यवाद, हुकूमशहा पडला. हुकूमशहा पडला, असं म्हणतानाच आता आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतो, अशा भावना सीरियन नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.एकूणच काय, बंडखोरांनी सीरियातील असद राजवट तर उध्वस्त केली आता सीरियाचं भविष्य काय असेल? स्थैर्य की पुन्हा अराजकता याचं उत्तर येणारा काळच देईल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा