Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

उजनी धरणातून भिमा नदीत सव्वा लाखाचा विसर्ग, गणेशवाडी पुल सहाव्यांदा पाण्याखाली सकाळपासूनच वाहतूक बंद


 

कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी 

मोबाईल नंबर 8378081147

----- पुणे परीसर व घाट माथ्यावर तसेच उजनी धरण परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे वरील धरणातून एक लाखापेक्षा जास्त पाणी दौंड मधून उजनीत येत आहे. धरण १०० टक्के भरल्याने पुरनियंत्रणेच्या दृष्टीने उजनी धरणातून भिमा नदीत एक लाख २५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडला जात आहे. त्यामुळे भिमा नदीवरील तीनही बंधारे सहाव्यांदा बुडाले तर गणेशवाडी पुलावर दहा फुट पाणी वाहत असल्याने यावरील वाहतूक बंद झाली आहे. तर वीरमधून नीरा नदीत सात हजार ८०० क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी काठावरील इंदापूर, माढा व माळशिरस तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नरसिंहपूर येथील संगमावर एक लाख ३४ हजार क्युसेक्सचा विसर्ग वाहत आहे.

     पुणे परिसर, घाट माथ्यावर व जिल्ह्यात तुफान पर्जन्यवृष्टी होत असल्याने वरील सर्वच धरणातून एक लाखापेक्षा जास्तीचे पाणी दौंड येथून उजनीत येत आहे. धरण शंभर टक्के भरल्याने पुरनियंत्रणाच्या दृष्टीकोनातून उजनी धरणातून भिमा नदीत काल संध्याकाळी ४० हजाराने असणारे पाणी रात्री एक वाजता ७५ हजार सकाळी ८ वाजता ८५ हजार, नऊ वाजता ९५ हजार, एक वाजता एक लाख पाच हजार तर दुपारी तीन वाजता एक लाख २५ हजार क्युसेक्सने सोडण्यात येत असल्याची माहिती उजनी धरण नियंत्रण विभागाकडून देण्यात आली आहे. 



     उजनी धरणातून भीमा नदीत सतत पणाने कमी जास्त प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामध्ये आज वरील सर्व धरणातून एक लाखापेक्षा जास्तीचे पाणी उजनीत येत असल्याने उजनी धरणाच्या साठ्यात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे पुरनियंत्रणाच्या दृष्टीकोनातून भिमा नदीत आज सहाव्यांदा एक लाख २५ हजार क्युसेक्सचा विसर्ग सोडला जात आहे. पावसाची परिस्थिती जर अशीच राहिली तर पाण्यात वाढ करण्यात येणार असल्याचे उजनी धरण प्रशासनाने नदी काठावरील शेतकरी व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

     उजनी धरणातून भिमा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे भांडगाव, टणू, नरसिंहपूर येथील बंधारे व गणेशवाडी - गारअकोले यांना जोडणारा पुल दोन महिन्यात सहाव्यांदा पाण्याखाली गेला आहे. पुलावर जवळपास दहा फुट पाणी वाहत असल्याने यावरून होणारी वाहतूक सकाळी सहा वाजल्यापासून बंद झाली आहे. नागरिक पुलाच्या दोन्ही बाजूला नदीवरील पाणी पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. तर कोंढार पट्टृयातील विद्यार्थ्यांना आज पुन्हा सुट्टी देण्यात आली आहे. 



     वीर धरणातून नीरा नदीत ७ हजार ८०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडला जात आहे. त्यामुळे भीमा व नीरा नदीला पूर सदृश्य परस्थिती निर्माण झाली आहे. नरसिंहपूर येथील संगमावर एक लाख ३४ हजार क्युसेक्सचा विसर्ग वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे असा इशारा जलसंपदा विभाग सोलापूर, धरण नियंत्रण विभाग भिमानगर, धरण नियंत्रण विभाग निरा खोरे - विर धरण व उजनी पूर नियंत्रण विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

      नरसिंहपूर संगम व नरसिंहपूर शेवरे पुलावरून वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू आहे. कोंडारपट्ट्यातील गावातील विद्यार्थ्यांना गणेशवाडी पुलावर पाणी आले असल्याने शाळेला सुट्टी देण्यात आली आहे. नदी काठावरील शेतातील पिकात सहाव्यांदा पाणी घुसल्याने केळी, डाळींब, ऊस, मका पिके पाण्याखाली गेली आहेत.

चौकट - उजनी धरणातून भीमा नदीत पुरनियंत्रणासाठी पाणी सोडले जात असल्याने गणेशवाडी - गारअकोले पुलावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तलाटी, पोलिस पाटील असे कोणीही हजर नसतात त्यामुळे नागरीक पुलावरील पाण्यात धोकादायक पणाने घुसून जिव धोक्यात घालत आहेत. 

फोटो - भिमा नदीवरील गणेशवाडी - गारअकोले पुलावर दहा फूट पाणी वाहत आहे.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा