सहसंपादक- डॉ-संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9922419159
इंदापूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक करणाऱ्या वाहन मालकांकडून महसूल प्रशासनाने थेट कारवाई करत दंडाच्या स्वरूपात सात लाख बावन्न हजार शंभर रुपयांचा महसूल वसूल केला. या कारवाईचे जनतेकडून स्वागत करण्यात आले असून ऐन दसरा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याने अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस
आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाने जोरदार कारवाई केली. सप्टेंबर महिन्यात विशेष मोहिमेत महसूल पथकाने तीन अवैध रित्या खनिज वाहतूक करणारी वाहने जप्त करून थेट कारवाई करत संबंधित वाहन मालकांकडून ७ लाख ५२ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
यासंदर्भात महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार इंदापूर शहर व तालुक्यात काही दिवसांपासून अवैध वाळू, मुरूम, खडी वाहतुकीचे प्रकार वाढले आहे. यासंदर्भात तहसीलदार व महसूल विभागाचे अधिकारी यांच्या विशेष पथकाने थेट कारवाई करण्याची मोहीम राबविली. या कारवाईत थेट जागेवर पंचनामा करून संबंधित वाहने ताब्यात घेण्यात आली, त्यानंतर त्यांच्या कडून दंडाची रक्कम महसूल खात्यात जमा करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गौण खनिज माफिया हवालदिल झाले आहेत.
या कारवाईत प्रशांत कदम यांच्या अवैधरित्या डबर वाहतूक करणाऱ्या टिप्पर वर केलेल्या कारवाईत ३ लाख २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तर अतुल चोपडे व गणेश गुटाळ यांच्या अवैधरित्या मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रत्येकी २ लाख १७ हजार ३०० व २ लाख ३४ हजार ६०० रुपये दंड करीत तो शासकीय चलनाद्वारे वसूल करण्यात आला. एकंदरीत सप्टेंबर महिन्यात तीन वाहनां कडून साडेसात लाख रूपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. या कारवाई मुळे गौण खनिज अवैधरित्या उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर जरब बसली आहे.
यासंदर्भात तहसीलदार जीवन बनसोडे म्हणाले,
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध अशा प्रकारच्या कारवाया निरंतरपणे पुढेही सुरू राहणार आहेत. अनधिकृत खनिज उत्खननामुळे शासन महसूलाचे मोठे नुकसान होतेच शिवाय पर्यावरणालाही गंभीर धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा कारवाया सातत्याने होणार असल्याचे शेवटी तहसीलदार
जीवन बनसोडे यांनी स्पष्ट केले.
तहसीलदार
जीवन बनसोडे हे सिंघम मोड मध्ये आल्याने अवैध वाळू, गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली आहे. इतक्या दिवस कारवाई नाही, आणि ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कारवाई झाल्याने अवैध गौण माफिया सावध झाले आहेत. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक समूळ नष्ट करावी अशी जनतेतून मागणी होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा