सहसंपादक- डॉ-संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9922419159
हवामानातील बदलांमुळे एकाच दिवसात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने तसेच नाले अरुंद झाल्याने पाणी जाण्यास पर्यायी रस्ता नसल्याने रस्त्यावर पाणी साठून व्यापारी पेठेत घुसत आहे. त्यामुळे पुढील काळात व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शहरातील नाल्यांचे रुंदीकरण तसेच भुयारीमार्गाची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी त्वरित अंदाजपत्रक तयार करण्याची सूचना राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांना दिली.
शनिवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी पहाटे पासून सुरु असलेल्या पावसाने पुन्हा कहर करून इंदापूर शहर व परिसर जलमय करुन टाकला. इंदापूर शहर नवीन प्रशासकीय भवन शेजारील शंभर फुटी रस्त्यावरील इंदापूर नगरपरिषदेची नवीन इमारत, जेष्ठ नागरिक संघ तसेच जुना कचेरी रोड पुन्हा जलमय झाला. त्यामुळे गुडघाभर पाण्यातून कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, माजी उपनगराध्यक्ष कृष्णा ताटे यांनी पहाणी करुन शहरातील नाल्यांचे रुंदीकरण व भुयारी मार्गाची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याची सूचना नगरपरिषदेच्या मुख्याधिका-यांना दिली आहे.
शनिवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाने थैमान घातल्याने इंदापूर शहर व परिसरात सर्वच पाणीच पाणी झाले. शहरातील भार्गवराव तलावापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. इंद्रेश्वर मंदिर परिसर, पंधारा नाला भागात गुडघ्यापर्यंत पाणी साठले होते. प्रशासकीय भवनाशेजारच्या नगरपरिषदेच्या विस्तीर्ण जागेत,ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालया समोर पाणी साठले होते. तेथून जाणाऱ्या शंभर फुटी रस्त्यावर साठलेल्या पाण्यातून रस्ता काढत जाणे नागरिकांना जिकीरीचे झाले होते. नजीकच्या नगरपरिषदेच्या गाळ्यांमध्ये ही पाणी घुसले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
त्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, नगरपरिषद मुख्याधिकारी रमेश ढगे, माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, माजी उपनगराध्यक्ष प्रा. कृष्णा ताटे, प्रमोद राऊत, अर्शाद सय्यद, अहमदरजा सय्यद, संतोष देवकर, फकीर पठाण, बन्सी भंडलकर यांच्यासह पंधारा नाला भागातील पाणी साठलेल्या भागाची पहाणी केली. या सर्वांनी अक्षरशः गुडघाभर पाण्यातून चालत जावून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.दरम्यान पुढील तीन चार दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने नागरिक, व्यापारी हवालदिल झाले आहेत. यावेळी नागरी संघर्ष समितीच्या वतीने कृष्णा ताटे यांनी नागरिकांच्या समस्या सर्वांच्या लक्षात आणून दिल्या.
या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर विजेच्या खांबाजवळ अथवा विद्युत तारांजवळ कोणीही जावू नये, वाहत्या अथवा साठलेल्या पाण्यात उतरु नये, मुलांना घराबाहेर सोडू नये, पूरस्थिती निर्माण झाल्यास अत्यावश्यक साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
फोटो ओळी : पंधारा नाला परिसराची पहाणी करताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, भरत शहा, अशोक इजगुडे, कृष्णा ताटे व इतर मान्यवर.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा