सहसंपादक- डॉ-संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9922419159
मे महिन्यातील अवकाळी पावसाने एकरात केलेल्या पिकांची नुकसान भरपाई शासन गुंठ्यांच्या हिशेबात देत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम होत आहे. इंदापूर तालुक्यातील काझड गावच्या ग्रामस्थांनी हा आरोप केला असून हे शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
काझडचे शेतकरी आण्णा पाटील, सागर नरुटे, राजकुमार पाटील, अमोल नरुटे, योगेश काळे, पांडुरंग नरुटे यांनी नायब तहसीलदार विजय घुगे यांच्याकडे तसे निवेदन दिले आहे.
यासंदर्भात आण्णा पाटील म्हणाले, मे महिन्यात झालेल्या पावसाने काझड परिसरातील कांदा, मका, बाजरी, भुईमूग आदी पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले तसेच शेतकऱ्यांच्या जमिनीतील माती वाहून गेली होती. अनेकांच्या विहिरीत माती जावून त्या भुईसपाट झाल्या होत्या. त्यावेळी तसे पंचनामे देखील प्रशासनाने केले होते. नुकसान भरपाई देताना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या नावावर असलेल्या उताऱ्याप्रमाणे व पीक पाणी क्षेत्रानुसार नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. मात्र नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून शेतकऱ्यांना १७५ रुपये गुंठा याप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात आली आहे. प्रत्यक्षात
शेतकऱ्यांचे नुकसान एकरांमध्ये झालेले असताना ते केवळ काही गुंठ्यात झाल्याचे दाखवून नुकसान भरपाई देण्यात येत असल्याचा दावा श्री. पाटील यांनी केला आहे.
शासन शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसत आहे. त्यामुळे काझड भागातील शेतकऱ्यांच्या मनात तीव्र संतापाची भावना असून त्याची शासनाने योग्य दखल घेऊन नुकसान भरपाईच्या धोरणात त्वरित बदल करून नुकसान भरपाई द्यावी अन्यथा शेतकरी आक्रमक आंदोलन करतील असा इशारा श्री. पाटील यांनी दिला.
सरकारने शेतकरी सुखी तर जग सुखी असे नुसते म्हणून नये तर शेतकऱ्यांना बळीराजा होण्यासाठी शाश्वत सोयी सुविधा युद्ध पातळीवरून उपलब्ध करून द्याव्यात असे आग्रही मत त्यांनी व्यक्त केले.
फोटो ओळी : नायब तहसीलदार विजय घुगे यांच्याकडे निवेदन देताना अण्णा पाटील व त्यांचे सहकारी.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा