Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५

महाराष्ट्राला तिमिरातून तेजाकडे नेणारा तेजपुरुष:- डॉ. नरेंद्र दाभोळकर

 *संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*


महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि विचारवंतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीत संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माचा दीप लावला, तर क्रांतिसूर्य महात्मा फुले-राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी  सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली. त्याच तेजस्वी परंपरेचा पुढचा दीप बनून महाराष्ट्राला अंधश्रद्धेच्या तिमिरातून विवेकाच्या प्रकाशाकडे नेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोळकर. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात विज्ञान, तर्क आणि मानवता या त्रिवेणीचा संगम घडवला. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४५ रोजी सातारा येथे झाला. बालपणापासूनच ते बुद्धिमान आणि सामाजिक जाण असलेले होते. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून त्यांनी डॉक्टर म्हणून वैध्यकीय कार्य सुरू केले. मात्र, केवळ शरीराची नव्हे तर माणसाच्या विचारांची चिकित्सा करणे हाच त्यांचा खरा हेतू होता. त्यामुळे त्यांनी डॉक्टरकीचा व्यवसाय सोडून समाजप्रबोधनाची वाट निवडली.

       डॉ. दाभोळकरांना समाजातील अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि ढोंगी चमत्कारांचा फार त्रास होत असे. त्यांनी ठरवले की, लोकांना या अज्ञानरूपी अंधारातून बाहेर काढायचे आणि त्यासाठी विज्ञानाचा दीप लावायचा. या उद्देशाने १९८९ साली त्यांनी “महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती” या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत त्यांनी गावोगावी जाऊन लोकांना विज्ञानाचे प्रयोग दाखवले आणि अंधश्रद्धा कशी लोकांचा गैरफायदा घेते, फसवणूक करते हे समजावून सांगितले. भोंदू बाबांच्या तथाकथित चमत्कारांचे प्रयोग त्यांनी लोकांसमोर उघड केले. “आम्ही देवाविरोधात नाही, आम्ही देवदारी विरोधात आहोत” हा त्यांचा प्रसिद्ध संदेश आजही लोकांच्या आजही स्मरणात आहे. त्यांच्या कामात एक विलक्षण प्रामाणिकपणा आणि मानवतेची प्रांजळ भावना होती.

      डॉ. दाभोलकरांचा  विवेकवाद हा केवळ विज्ञानापुरता मर्यादित नव्हता. तो सामाजिक आणि नैतिक मूल्यांवर आधारलेला होता. ते म्हणत असत, धर्म म्हणजे माणसासाठी जगले पाहिजे, माणसाने धर्मासाठी नव्हे. त्यांच्या विचारांत मानवतावादाचा गहिरा सूर होता. ते समाजात समानता, बंधुता आणि सहिष्णुता प्रस्थापित करू इच्छित होते. त्यांनी अंधश्रद्धा, जातिभेद आणि धार्मिक दांभिकता, ढोंगीपणा यांच्यावर प्रखर प्रहार केला. त्यांच्या लेखनातून त्यांनी जनजागृती केली. ‘साप्ताहिक सकाळ’ या वृत्तपत्रात त्यांनी ‘साप्ताहिक विचार’ नावाची दीर्घकाळ चाललेली लेखमाला लिहिली. त्यांच्या लेखांमध्ये विज्ञान, सामाजिक प्रश्न आणि तर्कशील विचारांची सांगड होती. ते लिहीत असत पण त्यांचा प्रत्येक शब्द हे एक आंदोलन बनत असे.

      डॉ. दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेल्या कार्याचा परिपाक म्हणजे “महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन व काळाबाजार प्रतिबंधक कायदा”. या कायद्याने समाजातील मानवी बलिदान, झाडफुंक, ताईत-झोतिष आणि भोंदूगिरी यांसारख्या अमानवी प्रथांवर बंदी आणली. या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष केला. परंतु दुर्दैवाने हा कायदा त्यांच्या हत्येनंतरच लागू झाला. तरीही तो त्यांच्या विचारांचे जिवंत स्मारक आहे. ते म्हणायचे, “विचारांना गोळ्या घालता येतात, पण विचार कधी मरत नाहीत.” त्यांच्या या वाक्यातच त्यांचा सारा जीवनदर्शन सामावलेले होते.

        डॉ. दाभोळकर हे खऱ्या अर्थाने जनतेचे शिक्षक होते. त्यांनी गावोगावी, शाळा-महाविद्यालयांत जाऊन मुलांमध्ये विज्ञानाची जिज्ञासा जागवली. त्यांचा विश्वास होता की जो प्रश्न विचारतो तो विचारवंत होतो, आणि जो गप्प राहतो तो अंधश्रद्धेचा गुलाम बनतो. त्यांनी लोकांना प्रश्न विचारण्याचे, विचार करण्याचे धैर्य दिले. त्यांची कार्यशैली आक्रमक नव्हती; ती संयमी, विवेकनिष्ठ आणि प्रेमळ होती. त्यांनी नेहमी शांततेने आणि तर्काने आपले विचार मांडले.

         २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात सकाळच्या व्यायामाला जात असताना अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. पण त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या विचारांचा दीप विझला नाही; उलट तो अधिक तेजाने प्रज्वलित झाला. त्यांच्या स्मृतीने अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ अधिक बळकट झाली. त्यांच्या बलिदानाने विवेकवादाचा संदेश अधिक व्यापक झाला.ते म्हणत असल्याप्रमाणे गोळीने व्यक्तीची हत्या होऊ शकते परंतु विचाररांची हत्या होऊ शकत नाही.अज्ञान अंधःकार दूर करणारे त्यांचे विचार तिमिराला दूर करत तेजाकडे घेऊन जाणारे होते.

       आजही जेव्हा समाजात धर्माच्या नावाखाली हिंसा, असहिष्णुता आणि अंधश्रद्धा पसरते, तेव्हा डॉ. नरेंद्र दाभोळकरांचे विचार आपल्याला प्रकाश दाखवतात. त्यांनी शिकवले की विज्ञान आणि धर्म हे परस्परविरोधी नाहीत, पण अंधश्रद्धा आणि विज्ञान हे नक्कीच विरोधी आहेत. त्यांनी मानवतेला धर्मापेक्षा श्रेष्ठ मानले आणि प्रत्येक माणूस विचार करू शकतो, बदल घडवू शकतो, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले.

          डॉ.नरेंद्र दाभोळकर हे व्यक्ती नव्हते, ती एक विचारसरणी होती. त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक जाणीवेला नवे परिमाण दिले. त्यांनी शिकवले की,अंधश्रद्धेचे तिमिर दूर करण्यासाठी विवेकाचा दीप लावावा लागतो. त्यांचे जीवन हे प्रबोधनाचे प्रतीक आहे. ते खऱ्या अर्थाने तेजस्वी तेजपुंज समाजदूत होते, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य माणसातील माणुसकी जागवण्यासाठी अर्पण केले.

         आज आपण अभिमानाने म्हणू शकतो की डॉ. नरेंद्र दाभोळकर हे महाराष्ट्राला तिमिरातून तेजाकडे नेणारे खरे तेजपुरुष होते. त्यांच्या विचार कार्याचा प्रकाश आजही प्रत्येक विचारवंत मनात तेवत आहे. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र पुढे जात आहे आणि तेवढ्यानेच त्यांचे जीवन यशस्वी आणि अमर ठरले आहे.

                         डॉ. प्रकाश पांढरमिसे 

                      मो. नं.9423639796




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा