Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १९ मार्च, २०२६

*रमजानुल मुबारक - ३० *जुमातुल विदाअ व लैलतुल जायजा*

 *सलीमखान पठाण*

    *श्रीरामपूर* 

*९२२६ ४०८०८२*


या वर्षीच्या रमजान महिन्या ची आज सांगता होत  आहे.आज चंद्रदर्शन झाल्यास रमजान महिना पूर्णत्वास जाऊन उदया शव्वाल महिन्याच्या पहिल्या तारखेस ईद साजरी होईल. आजचा शुक्रवार हा या रमजान महिन्यातील शेवटचा शुक्रवार (जुमा) आहे.याला जुमातुल विदाअ म्हणतात.

इस्लामी पंचांग वर्ष हे चंद्रदर्शनाशी निगडीत आहे. त्यामुळे दर महिन्याच्या चंद्रदर्शनास खूप महत्व आहे. इस्लामी हिजरी साल हे ३५५ दिवसाचे गणले जाते. त्यानुसार काही महिने २९ तर काही ३० दिवसांचे होतात. चंद्र पाहण्यासाठी हिलाल कमेटी गठीत केलेली असते. ती दरमहा चंद्र दर्शनाची खात्री करुन निर्णय जाहीर करते.(हिलाल म्हणजे पहिल्या तारखेची चंद्रकोर)



ईद बाबत हजरत पैगंबरांनी म्हटले आहे कि चंद्र पाहून रोजे सुरु करा व चंद्र पाहून ईद साजरी करा. ईदचा चंद्र पाहतांना खूप गोंधळ केला जातो.टी वी वर येथे दिसला, तेथे दिसला अशा बातम्या येतात.ग्रामिण भागात तर खूप गडबड होते.अशावेळी स्थानिक हिलाल कमेटीचा निर्णय मान्य करुन निर्णय घेतला जातो.

रमजानची शेवटची रात्र ही लैलतुल जायजा अर्थात ईनामाची किंवा पुरस्काराची रात्र म्हणून साजरी केली जाते.ही रात्र संपूर्णपणे अल्लाहचे नामस्मरण करण्यात व त्याच्या प्रार्थनेत घालविली पाहिजे.महिनाभर अल्लाहच्या कृपेने प्राप्त रमजान महिन्याच्या प्रति आभार व्यक्त करण्याची ही रात्र आहे.या रात्री अल्लाह तआला सातव्या आसमंतावरुन पहिल्या आसमंतावर येऊन विराजमान होतात तसेच त्याचे फरिश्ते प्रत्येक घरात दाखल होऊन रोजेदारांना, प्रार्थना (इबादत) करणारांना खुशखबरी देतात कि अल्लाहने तुम्हाला मुक्ती (मगफिरत किंवा माफी) दिली आहे.शेवटची रात्र ही ईदच्या तयारीत न घालविता अधिकाधिक प्रार्थना, अल्लाहचे नामस्मरण करुन व्यतीत केली पाहिजे.

 ईद म्हणजे अलाहचे आभार मानण्याचा दिवस.ज्यांनी महिनाभर रोजे पूर्ण केले, नमाजे तरावीह सह पाचही वेळेची नमाज नियमित आदा केली,कुरआन पठन (तिलावत) केले,अल्लाहचे नामस्मरण केले अशा लोकांसाठी ईदचा खरा आनंद आहे.या आनंदात सर्वांना सामावून घेऊन ईद साजरी केली जाते.ईदचा हा आनंद सर्व देशवासीयांना प्राप्त व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

 *चंद्र दर्शनानंतर ईद*  

अल्लाहची रहमत,मगफिरत व कृपा असलेला पवित्र असा रमजान महिना आज पूर्णत्वास जात आहे. संध्याकाळी चंद्रदर्शन होऊन उद्या ईद साजरी करण्यात येईल.इस्लामी वर्ष चंद्रदर्शनाशी निगडित असल्यामुळे इस्लामी वर्षाला कमरी साल असे ही म्हणतात. कमर म्हणजे चंद्र. सौदी अरेबियामध्ये चंद्रदर्शन व तारखेचे प्रगटीकरण करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आधिपत्याखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. प्रादेशिक सहा समित्या सुद्धा तेथे अस्तित्वात असून त्यामध्ये शासनाचे प्रतिनिधी, कोर्टाचे प्रतिनिधी व खगोल शास्त्रज्ञ यांचा समावेश आहे . प्रादेशिक समित्या या केंद्रीय समितीशी संलग्न आहेत. आप आपल्या भागात दर महिन्याच्या २९ किंवा ३० तारखेला चंद्र पाहून या समित्या केंद्रीय समितीला आपला निर्णय कळवितात. त्यानंतर सुप्रीम कोर्ट चंद्रदर्शन झाल्याचे जाहीर करते.त्यामुळे ईदच्या चंद्र दर्शनासाठी आपल्याकडे देशभरात,प्रत्येक गावात जी उत्सुकता असते,ती तेथे दिसून येत नाही.लोक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असतात. 

प्रेषित हजरत पैगंबरांनी सांगितले आहे की,चंद्र पाहून रोजे सुरु करा व चंद्र पाहून ईद साजरी करा.म्हणजेच चंद्रदर्शन झाल्यास दुसऱ्या दिवशी ईद साजरी करण्यात येईल. न झाल्यास ३० रोजे पूर्ण करण्यात येतील. त्यामुळे चंद्रदर्शन झाल्यावरच ईद साजरी होईल. 

आज चंद्रदर्शन होण्याची शक्यता आहे.             शव्वाल महिन्याच्या एक तारखेला ईद-उल-फित्र किंवा रमजान ईद साजरी केली जाते. त्यापूर्वीची रात्र म्हणजे चंद्रदर्शन झाल्यानंतरची रात्र ही लैलतुल जायज़ा म्हणून संबोधली जाते. ही रात्र सुद्धा अल्लाहच्या प्रार्थनेसाठी खूप महत्त्वाची आहे. या रात्री अल्लाहतआला आपल्या फरिश्त्यांसह सातव्या आसमंतावरून पहिल्या आसमंतावर येऊन विराजमान होतात. त्याचे फरिश्ते पृथ्वीवर सर्वत्र विखुरले जातात. जे जे लोक अल्लाहची प्रार्थना करतात, त्यांची मगफिरत, माफी करून त्यांना अल्लाहच्या विशेष ईनामाने गौरविण्यात येते. म्हणून लैलतुल जायज़ा मध्ये प्रत्येकाने आपल्यासाठी, आपल्या पूर्वजांसाठी, आपल्या देशासाठी व समस्त मानव जातीसाठी प्रार्थना करून दुआ केली पाहिजे. 

एक महत्वाची बाब म्हणजे खोटी शपथ खाऊ नये . शपथ फक्त अल्लाह / ईश्वराचीच खावी.केंद्रातील नविन सरकारच्या प्रत्येक मंत्र्याने मंत्रिपदाची शपथ घेतांना ईश्वराची शपथ घेतली आहे कि, आम्ही संविधानाच्या प्रति खरी श्रध्दा , निष्ठा ठेऊ आणि कोणताही भय , पक्षपात , अनुराग, द्वेषाशिवाय कर्तव्याचे पालन करु .. ईश्वर त्यांना या शब्दांप्रमाणे वागण्याची व समस्त देशवासींयासाठी आपले कर्तव्य पार पाडण्याची सुबुद्धी देवो .             

गेले महिनाभर दैनिक जनता आवाज च्या माध्यमातून रमजान महिन्याच्या निमित्ताने या लेखमालेद्वारे वाचकांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. इस्लाम धर्माची शिकवण,हजरत प्रेषित पैगंबरांची शिकवण, कुरआन शरीफ मधील अल्लाहचे फर्मान,मुस्लिम समाजातील चालीरीती यांचा परिचय इतर धर्मीय बांधवांना करून देण्याचा अल्पसा प्रयत्न या माध्यमातून केला. १९९८ पासून हे कार्य सुरू आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने वाचक ही लेखमाला वाचत असतात.अनेक वाचकांकडे मागील दहा वर्षाची या लेखमालेची कात्रणे देखील आहेत. यावरून या लेखमालेच्या लोकप्रियतेची कल्पना येते. सोशल मीडियाच्या युगामध्ये राज्यात व देशात नव्हे तर सातासमुद्रापलीकडे सुद्धा ही लेखमाला आपल्या मराठी बांधवांनी वाचली. तिचा प्रसार व प्रचार केला आणि यातून इस्लाम धर्माला समजून घेण्याचाही प्रयत्न केला. महिनाभर अनेक वाचकांचे आलेले फोन व  प्रतिक्रिया यातून लेख माला सर्वांना आवडल्याचे दिसून आले.याबद्दल मी अल्लाहचे आभार व्यक्त करतो. जनता आवाज परिवारातील सर्व सहकाऱ्यांनी महिनाभर खूप कष्ट घेऊन ही लेखमाला आकर्षकरीत्या मांडण्याचा प्रयत्न केला.त्याबद्दल या  सहकाऱ्यांनाही धन्यवाद. अत्यंत भक्तिभावाने, श्रद्धापूर्वक पालन करण्यात आलेला रमजान महिना आपल्यातून जाताना प्रत्येक मनात फक्त हीच भावना आहे कि -                       

 *तेरे आनेसे दिल खुश हुआ था,*            

*दिल का गुंचा खुशी से खीला था,*

 *आह,अब वक्ते रुखसत है आया,*

*अलविदा अलविदा माहे रमझां...* 

(क्रमशः)

*अलविदा या माहे रमजान अलविदा*


*सलीमखान पठाण*

    *श्रीरामपूर* 

*९२२६ ४०८०८२*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा