*इंदापूर, डॉ. संदेश शहा*
*टाइम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*
इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे हल्ला प्रकरणाच्या निषेधार्थ तसेच आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी महसूल विभागाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दि.१० मार्च रोजी दोन तास काम बंद आंदोलन केले.
या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी तसेच बारामती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे निवेदन दिले आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नेमकी कोणत्या मार्गावर आहे असा प्रश्न या निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ता या नावाखाली गुंडगिरी व दहशत निर्माण करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे खंडणी मागणी करण्याचे प्रकार होत आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी तहसीलदार यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या आधी काही गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्या
वाहन चालकास यमसदनी पाठवलेले आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपीवर योग्य कडक कायदेशीर कारवाई होऊ शकत नसल्याने गुंडगिरी करत अधिकारी कर्मचाऱ्यां कडे खंडणी मागणे, ती न दिल्यास संबंधितां विरुध्द खोटेनाटे तक्रारी अर्ज देवून, अर्जानुसार कारवाई करावी म्हणून धरणे अंदोलन, उपोषण करण्याचा बनाव करणे व जास्तीत जास्त दडपण निर्माण करुन त्रास देण्याचे प्रमाणात वाढ होत असल्याची कैफियत निवेदना व्दारे मांडण्यात आली आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकां पासून तालुक्यातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात शेवटी करण्यात आली आहे. इंदापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे देखील निवेदनाची प्रत देण्यात आली आह
सोमवारी दि.९ मार्च रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास निमगाव केतकी गावाजवळ निमगाव केतकी ते पिटकेश्वर रस्त्यावर तहसीलदार जीवन बनसोडे यांना मुरुम वाहतूक करणारा टिपर ( क्र. एम. एच. ४२ ए.आर.१८६८) दिसला. त्यांनी नायब तहसीलदार विजय घुगे व अविनाश डोईफोडे, महसूल सहाय्यक राहुल पारेकर, वाहन चालक मल्हारी मखरे या महसूल विभागाच्या पथकासह सदर वाहनाचा वाहन चालक वैभव मनोज कांबळे ( रा. वडापूरी, ता. इंदापूर ) याच्याकडील गौण खनिज वाहतुक परवान्याची तपासणी करत असताना, आरोपी संतोष रामदास मोरे ( रा.वरकुटे खुर्द ता. इंदापूर ) हा बुलेटवरुन तेथे आला. महसूल विभागाच्या शासकीय वाहना (क्र. एम.एच.-४२-ए.एक्स.-१६६१) समोर बुलेट आडवी लावून 'तुम्ही ज्या वाहनाची तपासणी करत आहात, त्या वाहनावर आत्ताच्या आत्ता पैसे वसूल करा असे दमबाजीच्या सूरात बोलला.त्यावर तुमची बुलेट शासकीय वाहनाच्या बाजुला लावा असे महसूल विभागाच्या पथकातील लोकांनी त्यास सांगितले. त्यानंतर त्याने त्याची बुलेट गौण खनिज भरलेल्या टिपर समोर आडवी लावली. आत्ताचे आत्ता टिपरवर कारवाई करुन पैसे घ्यावेत असा दम त्याने तहसीलदारांना दिला. त्यावेळी वाहनावर नियमानुसार कारवाई करणेत येईल असे तहसिलदारांनी त्यास निक्षून सांगितले. त्यानंतर आरोपीने टिपर चालकाकडून दहा हजार रुपये घेऊन ते आपणास द्यावेत अशी मागणी केली.
त्यावर,'असे करता येत नसते. तुम्ही येथून निघून जावे असे तहसीलदार आरोपीस म्हणाले. त्यामुळे आरोपीने तहसीलदारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत 'तुम्ही इंदापूरात नोकरीच कशी करता ते बघतो. तुमची तक्रार जिल्हाधिकारी, महसूल मंत्र्यांकडे करतो. तुम्हाला इंदापूरमध्ये राहू देणार नाही असे म्हणत आरोपीने स्वतःकडील मोबाईल काढला व तो तहसिलदारांच्या अंगावर आला. तहसीलदारांची कॉलर पकडून त्याने त्यांना मारहाण करत शासकीय कामकाजात अडथळा आणला. त्यामुळे प्रशासन विरुद्ध तथाकथित सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ता असा संघर्ष तीव्र झाला आहे.
यापूर्वी देखील भरदिवसा तहसीलदार श्रीकांत पाटील, सूर्यकांत येवले यांच्यावर दमदाटी, अंगावर गाडी घालणे असे प्रकार घडले आहेत. तहसीलदार यांच्या वाहन चालकाचा देखील मारहाणीत मृत्यू झाला आहे. त्यामुळे अश्या प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. अवैध गौण खनिज, वाळू यातून मिळणारा पैसा हे अशा घटनांच्या मागचे उघड गुपित आहे. त्यामुळे प्रशासनात पारदर्शकता असल्यास अधिकाऱ्यांना दमदाटीचे प्रकार होणार नाहीत तसेच बेकायदेशीर वागणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे तरच असे प्रकार पुन्हा पुन्हा होणार नसल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा