Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १ जुलै, २०२६

*आधुनिक ज्ञानगंगा घरोघरी पोचविण्याचे महान कार्य मुक्त विद्यापीठातर्फे निरंतर सुरु : सेवानिवृत्त एअर मार्शल बी. एन.गोखले*

 *इंदापूर, डॉ. संदेश शहा*

*बुधवार, १ जुलै २६*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* *सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*


शिक्षण क्षेत्र ते संरक्षण क्षेत्र सगळीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआयचा) वापर वाढत आहे. हे तंत्रज्ञान मानवासाठी वरदान असले तरी त्याचा वापरदेखील मानवाच्या हाती आहे. मानवी बुद्धी व समज याची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता घेवू शकत नाही. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा मानवी रोजगारावर दुष्परिणाम  होईल ही भीती व्यर्थ आहे. त्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने काळानुसार बदलत ड्रोन तंत्रज्ञान ते डेटा ॲनालिटिक्स असे वैविध्यपूर्ण, कौशल्याधारित व रोजगारक्षम शिक्षणक्रम सुरु करत आधुनिक ज्ञानगंगा घरोघरी पोचविण्याचे महान कार्य निरंतर सुरु आहे. त्यामुळे अनेक कुटुंब आत्मनिर्भर झाली आहेत. त्याचा सार्थ  आनंद आहे असे गौरवोद्गार भारतीय हवाई दलाचे सेवानिवृत्त एअर मार्शल बी. एन. गोखले यांनी काढले. 


नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते. यावेळी डॉ. डी. एम. गुजराथी, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, विद्यापीठ अंतर्गत गुणवत्ता व आश्वासन केंद्राचे संचालक डॉ. मधुकर शेवाळे यांच्यासह विविध विद्याशाखा संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती. 



सेवानिवृत्त एअरमार्शल बी. एन. गोखले पुढे म्हणाले, यशाचे उत्तुंग शिखर गाठूनही जमिनीवर पाय रोवून सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीमत्वांचा सत्कार मुक्त विद्यापीठाने केला  आहे. तो आदर्श आणि प्रेरणादायी आहे. ज्या ज्या वेळी देश बिकट परिस्थितीतून जातो, त्या त्या वेळी अशा व्यक्तिमत्वांनी, कार्याने देश तळागाळातून सावरला आहे याची आपण जाण ठेवली पाहिजे. यावेळी त्यांनी भारत - चीन युद्ध, भारत - पाक युद्ध, यशवंतराव चव्हाण यांचे योगदान, आकाश व ब्राह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती व विकसन आणि त्यावेळेच्या परिस्थितीचे विश्लेषण केले. यावेळी त्यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. अशोकराव कुकडे – लातूर ( वैद्यकीय सेवा, ऑनलाईन उपस्थिती ), अनिल मेहेर – नारायणगाव ( कृषी व ग्रामीण विकास ), प्रा. दिलीप फडके – नाशिक ( साहित्य – संस्कृती व ग्राहक संरक्षण ), डॉ. निरुपमा देशपांडे – मेळघाट, अमरावती (आदिवासी उद्योजकता व पर्यावरण ) आणि सौ. सीमा मिलिंद कांबळे – पुणे ( महिला सक्षमीकरण ) यांचा द्वितीय ‘यश जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सत्कार करण्यात आला. शाल, स्मृतीचिन्ह, मानपत्र, धनादेश, स्वर्गीय राम ताकवले स्मृतीग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. विद्यापीठाच्या विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांचा उत्कृष्ट शिक्षक, श्रीमती अर्चना देशमुख यांचा उत्कृष्ट कर्मचारी तर नांदेड विभागीय केंद्राचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक विद्यार्थी संख्या नोंदणी विभाग म्हणून गौरव करण्यात आला. यावेळी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्राच्या कॉफी टेबल बुकचे देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 

यावेळी नाशिक मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे म्हणाले, समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा देश संरक्षण सेवा केलेल्या व्यक्तीच्या हातून विद्यापीठात सत्कार झाला याचा सार्थ अभिमान आहे. मुक्त व दूरस्थ शिक्षण पद्धती सोबत आता आपण ऑनलाईन शिक्षण पद्धतीत प्रवेश केला आहे. हे विद्यापीठ डिजिटल होत असताना व्यवहारात व वापरात तंत्रज्ञानसोबत पारदर्शकता आहे. विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्राच्या मधुमक्षिका पालन ते रोपवाटिका व्यवस्थापन अशा विविध शिक्षणक्रमांचा गेल्या वर्षभरात २७ हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. त्यात प्राथमिक एआय तंत्रज्ञानाचा देखील समावेश आहे. पॉवरलुम ते मेकॅनिक असे जवळपास दोन हजार छोटे कौशल्य आधारित शिक्षणक्रम उपलब्ध करून देत आहोत. आगामी काळात विद्यापीठ आवारात ई – गॅरेज उभारण्यात येणार असून त्यात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक प्रशिक्षण – शिक्षण देण्यात येईल. त्यासाठी महिंद्रा कंपनी व जपानी कंपनीसोबत लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे.  विद्यार्थ्याना नोकरी, व्यवसाय व त्यातील पर्याय यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हानिहाय विद्यापीठाचे केंद्र उभारण्याचे प्रयत्न सुरु  सांगितले.  

पद्मश्री डॉ. अशोकराव कुकडे यांनी सत्कारास उत्तर देताना आपल्या कार्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार व प्रेरणा असल्याचे सांगितले. अनिल मेहेर यांनी विद्यापीठाचे व कृषी विज्ञान केंद्राच्या उपक्रमांचे कौतुक करत  शेतीचा कणा मजबूत केला पाहिजे, त्यासाठी तंत्रज्ञानाचे सहाय्य व शेतीतील विविध प्रयोगांचे पाठबळ मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रा. दिलीप फडके यांनी आपल्या कार्याच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य मनुष्य असला की काम सहज सोपे होते आणि मुक्त विद्यापीठाच्या कार्याच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य मनुष्य असल्याचे सांगितले.  सौ. निरुपमा देशपांडे यांनी पीएच. डी. विद्यार्थिनी म्हणून विद्यापीठातील जुन्या आठवणींना उजाळा देत मेळघाटात आदिवासी समुहासाठी सुरु असलेल्या बांबू उद्योग प्रकल्पाची माहिती दिली. सौ. सीमा कांबळे यांनी शिक्षिका ते महिला उद्योजिका प्रेरणास्थान पर्यंतचा झालेला प्रवास कथन केला.  

तत्पूर्वी विद्यापीठ आवारातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राज्यगीत व विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. तुळशीच्या रोपट्यास मान्यवरांच्या हस्ते पाणी देवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, व्यवस्थापन मंडळ सदस्य प्रसेनजीत फडणवीस व डॉ. संजीवनी महाले, डॉ. नितीन ठोके, प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रा. दत्ता पाटील यांनी सूत्रसंचालन तर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे यांनी आभारप्रदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा