Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २ जुलै, २०२६

'"*एस आय आर'" प्रक्रियेसाठी* *कोणती कागदपत्रे लागणार? घर बंद असल्यास मतदार यादीतून नाव वगळले जाणार?*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


मतदारयाद्यांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आखलेल्या विशेष सखोल फेरतपासणीला (SIR) मंगळवारपासून सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रासह देशातील १६ राज्यांतील मतदारांची पडताळणी केली जाणार आहे. 

या मोहिमेत सहभागी असलेले हजारो अधिकारी थेट मतदारांच्या घरोघरी जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणार असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा मतदारांवर काय परिणाम होईल, मतदार यादीत आपले नाव कायम ठेवण्यासाठी नागरिकांना काय करावे लागेल, असे असंख्य प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाले आहे, त्याविषयीचा हा आढावा…

विशेष फेरतपासणी मोहीम म्हणजे काय?

मतदारयाद्यांची विशेष फेरतपासणी मोहीम (SIR) ही निवडणूक आयोगाद्वारे राबवली जाणारी एक व्यापक पडताळणी मोहीम आहे. याद्वारे घरोघरी जाऊन मतदार याद्या अपडेट केल्या जातात. पात्र मतदारांची नावे समाविष्ट करणे, दुबार नावे काढून टाकणे, मृत किंवा कायमचे स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे यादीतून वगळणे, मतदारांच्या माहितीत असलेल्या चुका सुधारणे आणि केवळ पात्र भारतीय नागरिकांचीच नावे मतदार यादीत राहतील याची खात्री करणे, असा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, देशभरात अशी शेवटची व्यापक मोहीम साधारण २० वर्षांपूर्वी राबवण्यात आली होती.

कोणकोणत्या राज्यांमध्ये ही मोहीम सुरू आहे?

महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा, पंजाब, सिक्कीम, त्रिपुरा, तेलंगणा आणि उत्तराखंड या राज्यांत आणि दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश, चंदीगड आणि दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांत मंगळवारपासून मतदारयाद्यांच्या फेरतपासणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्या अंतर्गत ३६ कोटी ७३ लाख मतदारांची पडताळणी केली जाणार आहे. प्रत्येक राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार या मोहिमेचा कालावधी थोडा वेगळा असणार आहे.

बीएलओ अधिकाऱ्यांचे काम काय असणार?

या मोहिमेसाठी नियुक्त केलेले बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी भेट देऊन त्यांची पडताळणी करतील. तसेच आवश्यक असल्यास त्यांच्याकडून अर्जही भरून घेतील. 'एसआयआर' प्रक्रियेत 'बीएलओ' प्रत्येक मतदाराला दोन गणना फॉर्म देणार आहेत. मतदारांनी त्यातील माहिती भरून एक प्रत स्वतःकडे ठेवायची असून दुसरी प्रत 'बीएलओ'कडे जमा करायची आहे. ही माहिती ऑनलाइनही सादर करता येणार आहे. बीएलओकडे निवडणूक आयोगाचे अधिकृत ओळखपत्र असते. त्यामुळे घरात प्रवेश देण्यापूर्वी त्यांचे ओळखपत्र तपासण्याचा सल्ला आयोगाने दिला आहे.

बीएलओला घर बंद आढळल्यास काय होईल?

बीएलओ अधिकारी घरी आल्यास कुटुंबातील काही सदस्य उपलब्ध नसल्यास त्यांना पुन्हा भेट देण्याची विनंती मतदार करू शकतात. याशिवाय पडताळणीची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्यासाठी मतदार आपापल्या भागातील बीएलओशी संपर्क साधू शकतात. घर बंद असल्यामुळे मतदारांचे नाव यादीतून आपोआप वगळले जाणार नाही. बंद आढळलेल्या घरांना 'बीएलओ' किमान तीन वेळा भेट देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मतदार निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. याशिवाय, बीएलओ मार्फत ऑफलाइन पद्धतीनेही ही प्रक्रिया पूर्ण करता येते. १८ वर्षे पूर्ण केलेले आणि मतदानासाठी पात्रतेच्या अटी पूर्ण करणारे नागरिक नियमानुसार मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतात. नुकतेच लग्न होऊन पत्ता बदलेल्या व्यक्तींना नवीन ठिकाणी मतदार म्हणून नाव नोंदविण्यासाठी अर्ज करता येतो. तसेच, जुन्या मतदारसंघातील नाव वगळण्याची विनंतीही करता येते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे बीएओकडे सादर करावे लागतात.

मतदारांकडे कोणकोणती कागदपत्रे आवश्यक?

निवडणूक आयोगाच्या मते, मतदारांना केवळ त्यांच्या तपशीलाची पडताळणी करावी लागेल; पण गरज पडल्यास वयाच्या पडताळणीसाठी जन्माचा दाखला, पॅन कार्ड, वाहनचालक परवाना, दहावी किंवा बारावीचे बोर्ड प्रमाणपत्र यापैकी एक कागदपत्र गरजेचे असेल. त्याशिवाय ओळखीचा पुरावा म्हणून फक्त आधार कार्ड बघितले जाईल. रहिवासी पुराव्यासाठी फोटोसह बँक किंवा पोस्ट ऑफिसचे पासबुक वीजबिल, भाडे करारनामा यापैकी एक कागदपत्रे ग्राह्य धरले जाईल. मतदारांकडे स्वत:चा पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो असणे आवश्यक आहे. महत्वाची बाब म्हणजे बीएलओ केवळ मतदारांचे फक्त मूळ कागदपत्रे पाहू शकतात. तसेच त्याची छायांकित (झेरॉक्स) प्रत आपल्याकडे ठेऊ शकतात. फेरतपासणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील, हे संबंधित मतदाराच्या श्रेणीवर आणि आयोगाकडे उपलब्ध असलेल्या माहितीवर अवलंबून असेल.

कुटुंबातील एक सदस्य सर्वांचे भरू शकतो का?

कुटुंबातील एक सदस्य घरातील इतर सदस्यांचे पडताळी अर्ज भरून बीएलओकडे जमा करू शकतो. मात्र प्रत्येक अर्जावर संबंधित मतदाराची स्वाक्षरी (किंवा आवश्यकतेनुसार इतर प्रमाणीकरण) असणे गरजेचे आहे. बीएलओ केवळ पडताळणीसाठी तुमच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करू शकतात, परंतु ते मूळ कागदपत्रे स्वतःकडे ठेवून घेत नाहीत. फक्त छायांकित प्रती (झेरॉक्स) किंवा आवश्यकता असल्यास अपलोड केलेले स्कॅन फॉर्म जमा केले जातात.

पडताळणी पूर्ण झाल्याची प्रक्रिया कशी तपासावी?

बीएलओ घरी आल्यानंतर तेव्हा मतदार त्यांच्या पडताळणीच्या प्रक्रियेविषयी बीएलओकडे विचारणा करू शकता. तसेच निवडणूक आयोगाच्या मतदार पोर्टलवर जाऊन संबंधित तपशील तपासू शकतात. ही संपूर्ण पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. मतदार पडताळणीसाठी किंवा मतदार यादीतील तपशील अद्ययावत करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्याचे अधिकार कोणत्याही निवडणूक अधिकाऱ्याला नाहीत. जर तुमचे नाव मतदार यादीत नसेल, तर त्वरित तुमच्या भागातील बीएलओशी संपर्क साधावा, मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे दिलेल्या मुदतीत विहित नमुन्यातील अर्ज भरून नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

काही त्रुटी आढळल्यास नाव वगळले जाईल का?

मतदारयाद्यांच्या फेरतपासणी नियमांनुसार, मतदारांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यास कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्याला नोटीस देणे बंधनकारक आहे. त्यानंतर ठराविक वेळेत मतदाराने मूळ कागदपत्रे सादर न केल्यास त्याचे नाव वगळले जाऊ शकते. मतदारांचे स्थलांतर, दुबार नोंदणी, मयत मतदारांची यादीतून काढून टाकणे, मतदारांच्या माहितीतील चुका दुरुस्त करणे आणि सर्व पात्र व्यक्तींचा मतदार म्हणून समावेश करणे, यासाठी निवडणूक आयोगाने ही मोहीम सुरू केली आहे. यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी मतदार याद्या स्वच्छ, अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी मदत होईल, असे आयोगाचे म्हणणे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा