Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२६

नरसिंहपूर परीसरात मंगळागौर उत्साहात; महिलांच्या पारंपरिक खेळांनी रंगला सोहळा

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*



          श्रावण महिन्यातील मंगळागौर सण नरसिंहपूर परीसरात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. गावागावांतील महिलांनी एकत्र येत मंगळागौरीचे पूजन करून पारंपरिक वेशभूषेत विविध धार्मिक विधी पार पाडले.

     मंगळागौरनिमित्त महिलांनी झिम्मा, फुगडी, फेर, उखाणे तसेच विविध पारंपरिक खेळ खेळत आनंदोत्सव साजरा केला. यामुळे गावागावातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. नवविवाहित महिलांसह ज्येष्ठ महिलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

       सायंकाळच्या वेळी मंगळागौरीची पूजा, आरती व नैवेद्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर महिलांनी सामूहिकरीत्या पारंपरिक गीते म्हणत खेळांचा आनंद घेतला. जुन्या परंपरा व संस्कृतीचे जतन करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व असल्याचे महिलांनी सांगितले.

     पिंपरी बुद्रुक येथील मानकरी पोलीस पाटील वर्धमान आजिनाथ बोडके, अँड. भाग्यवंत बोडके यांच्याकडे परंपरेप्रमाणे मंगळागौर उत्सव साजरा केला जातो. पारंपरिक पूजेनंतर सतीश सूर्यवंशी यांच्या डोक्यावरून मंगळागौरीची प्रतिकृती फटाके वाजवत, हलग्या लेझमाच्या निनादाद गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर भीमा नदी तीरावर जाऊन आरती करून नदीपात्रात विसर्जन करण्यात आली. यावेळी गावातील महिलांनी गाणी म्हणत मंगळागौरीला निरोप दिला. यावेळेस गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    गणेशवाडी येथील मानकरी ज्ञानदेव दशरथ घोगरे यांच्या पाटील वाड्याची मातीची प्रतिकृती कोंडिबा कुंभार यांनी तयार केली. प्रतिकृतीच्या वरील बाजूस मातीचे अश्वारूढ देव ठेवण्यात आले. सायंकाळी प्रतिकृती वाजत-गाजत भीमा नदीच्या तीरावर नेण्यात आली. नदीकाठावर आरती करून त्याचे नदीत विसर्जन करण्यात आले. तर ओझरे येथील नरसिंह रामचंद्र पालवे यांच्याकडे, गोंदी येथे गोविंद सुळ यांच्याकडे परंपरेने मंगळागौर असते. तर परीसरातील नरसिंहपूर, सराटी, गिरवी, टणू गावातही नागपंचमी सण व मंगळागौर उत्सव साजरा करण्यात आली.

चौकट - पावसाळा सुरू होऊन जवळपास तीन महिने संपत आला आहे. तरीसुद्धा पावसाने दांडी मारल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे. पण आज सायंकाळी मंगळागौर विसर्जनावेळी पावसाने हजेरी लावल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू दिसून आले. तर महिलांनी ज्यादाचा पाऊस पडून शेत शिवारे फुलु दे असे साकडे मंगळागौरीला घातले. उजनी धरण भरल्याने भिमा नदी भरून वाहू लागली असल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटल्याचे समाधान दिसून आले.

फोटो - पिंपरी बुद्रुक येथील वर्धमान बोडके यांच्या मंगळागौरीचे विसर्जनास घेवून जाताना.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा