*करमाळा तालुका --प्रतिनिधी*
*आलिम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
बँकिंग क्षेत्रात पाच दिवसीय बँकिंग आठवडा लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी १२ ऑगस्ट रोजी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्या नेतृत्वाखाली देशभरात विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून करमाळा तालुक्यातील विविध बँकांमधील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र येत बँक ऑफ इंडिया, करमाळा शाखेसमोर एकदिवसीय आंदोलन करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. आंदोलनादरम्यान पाच दिवसीय बँकिंग आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. “पाच दिवसीय बँकिंग आठवडा लागू झालाच पाहिजे” आणि “बँक कर्मचारी एकजुटीचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनाच्या माध्यमातून बँक कर्मचाऱ्यांनी आपली एकजूट आणि संघटनात्मक ताकद दाखवून दिली.
या आंदोलनात बँक ऑफ इंडिया, करमाळा शाखेच्या वरिष्ठ शाखा प्रमुख डॉ. शीतल मतकर, एसबीआय करमाळा शाखेचे वरिष्ठ शाखा प्रमुख, बँक ऑफ इंडिया कोर्टी शाखेचे वरिष्ठ शाखा प्रमुख सुरेंद्र यादव, UBI वरिष्ठ शाखा प्रमुख जितेंद्र मांडगे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक तसेच विविध बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याशिवाय बँक ऑफ इंडियाच्या वीट, कोर्टी, साडे, कोळगाव आणि जेऊर शाखांतील अधिकारी व कर्मचारी, तसेच एसबीआय करमाळा, UBI करमाळा आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील अधिकारी व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.
पाच दिवसीय बँकिंग आठवडा लागू करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी योग्य 'वर्क-लाईफ बॅलन्स' निर्माण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांना कुटुंबासाठी पुरेसा वेळ मिळावा, विश्रांतीची संधी उपलब्ध व्हावी आणि आधुनिक बँकिंग व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना अधिक कार्यक्षम सेवा देता यावी, यासाठी पाच दिवसांचा बँकिंग आठवडा ही काळाची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनाच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील विविध बँकांच्या अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी पाच दिवसीय बँकिंग आठवड्याच्या मागणीसाठी एकत्र येत एकजुटीचे दर्शन घडविले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा