Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२६

*पोटेगाव बंधाऱ्याच्या निकृष्ट कामावरून अधिकाऱ्यांची कोंडी; ठेकेदाराची बोलती बंद!* सकाळी आठ वाजता अधिकारी, ठेकेदार व कर्मचाऱ्यांची पाहणी; कामाच्या गुणवत्तेबाबत कृती समिती आक्रमक

 *करमाळा तालुका-- प्रतिनिधी* 

     *आलिम. शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


पोटेगाव येथील बंधाऱ्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी आठ वाजता अधिकारी, ठेकेदार आणि संबंधित कर्मचारी प्रत्यक्ष पाहणीसाठी साईटवर दाखल झाले. यावेळी बंधारा कृती समितीच्या सर्व सदस्यांनी कामाचा सविस्तर आढावा घेतला. समितीच्या सदस्यांनी अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद प्रश्नांची सरबत्ती केल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली, तर ठेकेदारालाही अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले.

पोटेगाव बंधाऱ्याच्या कामात गुणवत्तेच्या निकषांचे पालन होत आहे का, याची तपासणी करण्याची मागणी कृती समितीने यावेळी लावून धरली. समितीचे प्रमुख विशाल भागडे यांनी कामातील विविध त्रुटी आणि तांत्रिक मुद्द्यांवर अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. मात्र, या प्रश्नांवर अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली का, याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा रंगली.

 गॅबियन वॉलचा मुद्दा ऐरणीवर

पाहणीदरम्यान गॅबियन वॉलचा मुद्दा चांगलाच गाजला. बंधाऱ्याच्या कामातील या महत्त्वाच्या भागाच्या गुणवत्तेबाबत समितीने प्रश्न उपस्थित केले. तसेच, रिलिंग काढून पुन्हा व्यवस्थित बसविण्याबाबत सूचना करण्यात आल्या. बंधाऱ्याचे काम केवळ पूर्ण करण्यासाठी न करता ते तांत्रिक निकषांनुसार आणि दर्जेदार पद्धतीने करण्यात यावे, अशी ठाम भूमिका समितीने मांडली.


 क्वालिटी कंट्रोलच्या तपासणीची मागणी

बंधाऱ्याच्या कामाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी क्वालिटी कंट्रोल विभागामार्फत पहिली तपासणी करण्यात यावी, अशी मागणी कृती समितीने केली. गुणवत्तेची खात्री झाल्यानंतरच पुढील काम करण्यात यावे, अशी सक्त ताकीदही समितीच्या वतीने देण्यात आली.

काम नेमके कधी सुरू होणार, याबाबत विचारणा केली असता ठेकेदाराकडून चिडचिडीची प्रतिक्रिया व्यक्त होत असल्याचेही यावेळी दिसून आले. मात्र, कामाच्या गुणवत्तेचा प्रश्न हा शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित असल्याने त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अशी भूमिका समितीने घेतली.

 बंधाऱ्यांच्या सुरक्षेसाठी वॉचमन नेमण्याची मागणी

पोटेगावसह परिसरातील बंधाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. संगोबा बंधाऱ्यासाठी दोन, पोटेगाव बंधाऱ्यासाठी दोन आणि तरटगाव बंधाऱ्यासाठी दोन अशा एकूण सहा वॉचमनची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी समितीने केली. बंधाऱ्यांची देखभाल आणि सुरक्षा योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी ही नियुक्ती आवश्यक असल्याचे समितीने स्पष्ट केले.

बंधाऱ्याच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी आणि कामाच्या गुणवत्तेची नियमित पाहणी करण्यासाठी कृती समिती गठीत करून सोमवारी कार्यालयात तिच्या नोंदणीची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे बंधाऱ्याच्या कामावर सातत्याने लक्ष ठेवण्याचा समितीचा प्रयत्न आहे.

**“बंधाऱ्याचे काम गुणवत्तेच्या निकषांनुसारच झाले पाहिजे. कामाची योग्य तपासणी केल्याशिवाय पुढील काम करू नये. निकृष्ट काम कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही,”** असा स्पष्ट इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला.

पोटेगाव बंधाऱ्याच्या कामाबाबत यापूर्वीही प्रश्न उपस्थित झाले असून, आता प्रत्यक्ष पाहणीदरम्यान समितीने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे कामाच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. त्यामुळे संबंधित विभाग आता या मागण्यांवर कोणती कार्यवाही करतो आणि बंधाऱ्याचे काम प्रत्यक्षात कधी सुरू होते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यावेळी उपाभियंता प्रकाश बाबा, जे इ सौंदणे, अतुल दाभाडे, पुराणिक, लावंड,ठेकेदार भारत थिटे सदस्य विशाल भागडे, गणेश शेंद्रे, विजय महारणावर, निखिल नलावडे, राजेश गायकवाड, नितीन नलावडे,  अविनाश गायकवाड,आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा