*करमाळा तालुका-- प्रतिनिधी*
*आलिम. शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
उजनी वरील चार प्रकल्पांना विरोध करण्यासाठी आमदार रोहीतदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या आंदोलनात सकाळी दहा वाजता करमाळा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करमाळा मतदार संघाचे आमदार नारायण आबा पाटील यांनी केले आहे. भीमानगर येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार नारायण आबा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे आवाहन केले आहे. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी सांगितले की उजनीच्या निर्मितीसाठी करमाळा तालुक्यातील अनेक गावांचे संपुर्णपणे भुसंपादन केले गेले. आजही पुनर्वसित गावांना व धरणग्रस्तांना स्थैर्य प्राप्त झाले नाही. अशातच ए आय डाटा सेंटर सह चार प्रकल्प उजनीवर होऊ पाहत असताना येथील धरणग्रस्त व मच्छीमार यांना परत एकदा विस्थापित व्हावे लागणार अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. आपण शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्री ध जलसंपदा मंत्री यांचे समोर मांडल्या आहेत. हे प्रकल्प इतरत्र नेण्याचा सरकारने विचार करावा. अगोदरच करमाळा तालुक्यातील मच्छीमार व धरणग्रस्त हा आर्थिक संकटास सामोरा जात आहे. धरणग्रस्तांच्या शेतीसाठी आवश्यक ती वीज पुरेशा दाबाने दिली जात नाही. यामुळे जेमतेम उत्पन्नात उजनीकाठचा शेतकरी आपल्या प्रपंचाचा व मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च भागवत आहे. जेवढे पैसे हाती उरतील त्यात आजही शेतीमध्ये सुधारणा करण्यातच ते खर्च होत आहेत.अशातच उजनीवर चार प्रकल्प येऊ पाहत आहेत याची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या व लोकप्रतिनिधींची मते विचारात न घेता प्रकल्पाचे काम सुरू केल्याने शेतकऱ्यांच्या संभ्रमात आणखी भर पडत आहे. यामुळे आता शेतकऱ्यांच्या हाती फक्त आंदोलन करणे एवढेच उरले आहे. यामुळे उद्या कायद्याच सन्मान राखून शांततेत पार पडणाऱ्या आंदोलनात करमाळा मतदारसंघातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. या प्रकल्पामुळे केवळ उजनी बॅक वॉटर परिसरातील शेतकरीच अडचणीत येणार नाही तर तालुक्यातील पुर्व भागातील व भीमा सीना जोड कालवा परिसरातील शेतकरी सुध्दा भविष्यात पाण्याच्या कपातीच्या संकटात पडू शकणार आहे. यामुळे सर्वच शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न समजून मिळेल त्या वाहनाने भीमानगर येथील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आमदार नारायण आबा पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा