*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
*तामलवाडी (ता. तुळजापूर) :* महाराष्ट्र शासनाने धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने ७०० गावांसाठी पाणीटंचाई निवारणार्थ २ कोटी ८० लाखांचा आराखडा जाहीर केला असताना, तामलवाडी येथील माजी सैनिक व आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सावंत शिवाजी रामकृष्ण यांनी अत्यंत सकारात्मक व दूरदृष्टीचा मुद्दा उपस्थित केला आहे.
त्यांनी प्रशासनाला नवीन टँकरवर खर्च करण्यापूर्वी आधीच मंजूर असलेल्या जल जीवन मिशनचे अर्धवट काम पूर्ण करावे, अशी रास्त मागणी करणारे निवेदन थेट मंत्रालयापर्यंत पाठवले आहे.
*शासनाच्या सर्व वरिष्ठांना एकाच वेळी मेल :*
श्री. सावंत यांनी दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मा. प्रधान सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन, मा. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर, मा. मुख्य अभियंता, जल जीवन मिशन, मा. जिल्हाधिकारी धाराशिव, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष, जि.प. धाराशिव,
मा. कार्यकारी अभियंता, म.जी.प्रा. धाराशिव
यांच्यासह एकूण १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकाच वेळी ई-मेलद्वारे निवेदन पाठवले आहे.
*बातमीचा गाभा काय?*
श्री. सावंत यांच्या निवेदनात म्हटले आहे की, तामलवाडी-मंगरूळ-काटगाव या तीन गावांसाठी कोट्यवधींची जल जीवन मिशन योजना मंजूर असूनही काम निकृष्ट व अर्धवट आहे. रस्ते खोदून तसेच आहेत, पाईपलाईन फक्त १ ते १.५ फुटावर टाकल्याने फुटण्याची भीती आहे, अनेक ठिकाणी गळतीने पाणी वाया जात आहे. याबाबत दैनिक 'एकमत' नेही वृत्त प्रसिद्ध केले होते.
त्यामुळे दुष्काळात नवीन टँकरवर लाखो रुपये खर्च करणे हा दुबार खर्च ठरेल. जर जल जीवन मिशनचे काम दर्जेदारपणे पूर्ण झाले तर या तीन गावांना टँकरची गरजच भासणार नाही आणि शासनाचे लाखो रुपये वाचतील, तसेच नागरिकांना कायमस्वरूपी नळाद्वारे स्वच्छ पाणी मिळेल.
*माजी सैनिकाची सकारात्मक भूमिका :*
देशसेवेनंतर समाजसेवेत सक्रिय असलेले श्री. सावंत हे सातत्याने गावातील रस्ते, पाणी, वीज या प्रश्नांवर पाठपुरावा करतात. दुष्काळाच्या काळात पाण्याचा थेंब अन् थेंब महत्त्वाचा असताना, त्यांनी शासनाचा निधी वाया जाऊ नये आणि जनतेला दूषित पाण्यामुळे आरोग्याचा धोका होऊ नये, यासाठी केलेली ही मागणी कौतुकास्पद मानली जात आहे.
त्यांनी चार प्रमुख मागण्या केल्या आहेत :
१) जल जीवन मिशनचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे
२) पाण्याचे नियोजन करताना प्रथम नळ योजनेतून पाणी देता येते का याची चाचणी घ्यावी
३) कामाची जिल्हाधिकारी व CEO यांच्यामार्फत संयुक्त फेरचौकशी करावी
४) खोदलेले रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत
*"दुष्काळात शेतकरी व गावकरी आधीच अडचणीत आहेत. शासनाने नवीन योजना आणण्यापूर्वी जुन्या योजना पूर्ण केल्या तरच खऱ्या अर्थाने दुष्काळ निवारण होईल व शासनाचा पैसा वाचेल," असे श्री. सावंत शिवाजी रामकृष्ण (माजी सैनिक) यांनी सांगितले.*




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा