*हिवरेबाजार-- प्रतिनिधी*
*नंदकुमार झावरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
हिवरेबाजार, दि. ३१ : राष्ट्रीय एकता दिनानिमित्त यशवंत माध्यमिक विद्यालय, आदर्शगाव हिवरेबाजार येथील 17 महाराष्ट्र बटालियन NCC अंतर्गत NCC युनिटच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, बंधुता, जलसंवर्धन आणि पाणी बचतीचा संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यात आला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक मुरलीधर अमृते सर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. विद्यालयातून सुरू झालेली ही रॅली गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. यावेळी NCC कॅडेट्सनी विविध घोषणांच्या माध्यमातून पाणी बचत, पाणी अडवा-पाणी जिरवा, दुष्काळमुक्त गाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले.
रॅलीचे आदर्शगाव हिवरेबाजार येथे आगमन झाल्यानंतर पद्मश्री डॉ. पोपटराव पवार साहेब यांनी रॅलीचे उत्साहात स्वागत केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून जलसंवर्धन, पाण्याचे नियोजन आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तरुणांनी पुढाकार घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, शिस्त, संघभावना आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाली.
'एकता, शिस्त आणि राष्ट्रप्रेम' या NCC च्या मूल्यांसह जलसंवर्धनाचा संदेश देणारी ही सायकल रॅली ग्रामस्थांसाठी जनजागृतीचा प्रेरणादायी उपक्रम ठरली.
या उपक्रमासाठी NCC अधिकारी नंदकुमार झावरेआणि, NCC कॅडेट्स यांनी सहकार्य केले.
_______________________________________________










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा