Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२६

इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे हे गोरगरिबांची कामे करणारे चांगले प्रामाणिक अधिकारी’; तहसीलदार यांच्या समर्थनार्थ इंदापूर मध्ये मोर्चातून एल्गार; राजकीय हेतूने त्यांना टार्गेट केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांचा आरोप.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९



इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या समर्थनार्थ बुधवार दि. २५ नोव्हेंबर रोजी इंदापूर तालुक्यातील विविध पक्षीय नेते, संघटना, पदाधिकारी, नागरिकांनी एकत्र येत हजारोंच्या संख्येने भव्य मोर्चा काढला. तहसीलदार जीवन बनसोडे हे गोरगरीब जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणारे, सर्वसामान्यांची कामे वेळेत मार्गी लावणारे चांगले अधिकारी आहेत. मात्र त्यांच्या प्रामाणिक कार्यपद्धती मुळे काहींचे हितसंबंध बाधित झाल्याने त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप मोर्चातील प्रमुख नेत्यांनी केला. 'जीवन बनसोडे यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत,' असा एकमुखी सूर यावेळी प्रमुख नेत्यांनी भाषणांतून आळवला. यावेळी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी वाकडे तर त्याची स्मशानात लाकडे, भरणे यांच्या विरोधात बोलणाऱ्यांची जीभ हासडली जाईल, तुम्ही एक घोडा लावणार असाल तर आम्ही हजार घोडे लावू असा विरोधकांना सज्जड इशारा वक्त्यांनी आपल्या भाषणातून दिला  तर मुख्यमंत्री, तुमच्या जातियवादी लोकांना वेळीच आवरा, नाहीतर तुमची प्रतिमा कमी होईल असे सुतोवाच यावेळी काही वक्त्यांनी केले. त्यातून महायुतीतील भाजप, शिवसेना उबाठा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष असा संघर्ष दिसून आला.



बुधवारी दुपारी साडेबारा  वाजता जुन्या मार्केट कमिटी परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. तेथून मार्गक्रमण करत मोर्चा तहसील कार्यालयासमोर पोहोचला. तेथे मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनी व्यासपीठावरून तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कार्यपद्धतीचे जोरदार समर्थन करत त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले. मोर्चामध्ये इंदापूर तालुक्यातील महिला, पुरुष, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चामध्ये एसआयआर प्रक्रियेचा मुद्दा विशेष चर्चेत राहिला. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुक्यातील असंख्य गावामध्ये हयात असलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने अर्ज दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अशा अर्जांची बाब तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची भूमिका त्यांनी घेतल्याने त्यांच्याविरोधात रोष निर्माण झाला. त्यातून त्यांना लक्ष्य करण्यासाठी मोर्चा काढण्यात आल्याचा दावा समर्थनार्थ मोर्चातील नेत्यांनी केला. 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड राहुल मखरे आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संजय सोनवणे यांनी आपल्या भाषणांतून तहसीलदार जीवन बनसोडे यांचे समर्थन केले. तहसीलदार हे बौद्ध समाजाचे असल्यामुळे काही जातीयवादी लोक त्यांच्यावरती आकसा पोटी आंदोलन करत आहेत हे निषेधार्य असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांची कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी समाजाने उभे राहिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी थेट भाजप युवा नेते तथा सोनाई दूध संघाचे संचालक प्रवीण माने यांना टीकेचे लक्ष्य केले. तुम्ही साधे गावचे सरपंच नाही, तहसीलदार यांना घरी बोलवायचे कारण काय ? तहसीलदार काय तुमचा सालाचा गडी आहे का ? अशी विचारणा त्यांनी प्रवीण माने यांना केली. यावेळी पैशाचा माज उतरवला जाईल. माने यांच्या संगतीने प्रदीप गारटकर दादा हे देखील बिघडायला लागल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यामुळेच तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे, तालुक्यातील रस्ते चांगले झाले आहेत, इंदापूर शहरात नगरपरिषद, प्रशासकीय भवन, न्यायालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी महत्वाच्या इमारती श्री भरणे यांच्यामुळेच पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे भरणे मामा यांच्याशी वाकडे घेतल्यास त्याची स्मशानात लाकडे असे म्हणत त्यांनी भरणे मामा यांच्या विरोधात बोलणाऱ्यांची जीभ हासडली जाईल असा सज्जड इशारा दिला.

‘माझ्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात चांगले तहसीलदार जीवन बनसोडे असल्याचा निर्वाळा देखील 

राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी दिला. 

या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड राहुल मखरे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संजय सोनवणे, ॲड किरण लोंढे, सचिन सपकळ, माजी नगरसेविका राजश्री मखरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे, बाळासाहेब सरोदे, भीमा आक्रोश मोर्चाचे शरद चितारे, युथ पँथर फोर्सचे भाईसाहेब जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तहसीलदार हे बौद्ध असले तरी ते मेरिट वर तहसीलदार झाले आहेत. योग्य व्यक्तीला न्याय देताना काही जण दुखावले जातात. पण त्याला नाईलाज आहे. 

सदरच्या समर्थनाच्या मोर्चाचे निवेदन उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी स्वीकारले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हा परिषदेतील पक्ष प्रतोद श्रीमंत ढोले, प्रदेश सरचिटणीस डॉ. शशिकांत तरंगे, पंचायत समितीचे उपसभापती जयकुमार कारंडे, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुषार जाधव, पंचायत समिती सदस्य रणजीत भोंग, नगराध्यक्ष भरत शहा, नगरसेवक शकील सय्यद व बाळासाहेब ढवळे आणि सहकारी यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल झगडे यांनी तर आभार इंदापूरचे सभापती हर्षवर्धन लोंढे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा