*तामलवाडी --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी गावातील नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी माजी सैनिक व आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. शिवाजी रामकृष्ण सावंत यांनी सकारात्मक पुढाकार घेतला आहे, त्यांनी बालाजी अमाईन्स लिमिटेड, तामलवाडी या कंपनीच्या व्यवस्थापनाकडे ई-मेलद्वारे निवेदन पाठवून गावात पूर्वीप्रमाणे मोफत वैद्यकीय सुविधा व टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची नम्र विनंती केली आहे. पावसाच्या कमतरतेमुळे यंदा शेतीत अपेक्षित उत्पन्न आलेले नाही. त्यामुळे गावात आर्थिक अडचण, बेकारी, पाण्याची टंचाई आणि अस्वच्छतेमुळे आजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीत लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना वेळेवर उपचार व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
*निवेदनातील प्रमुख मागण्या अशा :*
*1.) डॉक्टरांसह महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक व बालकांसाठी गावात नियमित मोफत आरोग्य तपासणी शिबीर / दवाखाना सुविधा सुरू करावी.
*2.)गरजू कुटुंबांसाठी टँकरद्वारे स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा.
बालाजी अमाईन्स लिमिटेडने आजपर्यंत गावाच्या विकासात आणि संकटाच्या काळात नेहमीच मोलाचे सहकार्य दिले आहे. यापुढेही कंपनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून पुढाकार घेईल, असा विश्वास श्री सावंत शिवाजी यांनी ग्रामस्थांनीच्या वतीने व्यक्त केला आहे. या निवेदनाची प्रत माहितीस्तव व योग्य शासकीय मार्गदर्शनासाठी जिल्हाधिकारी, धाराशिव, तहसीलदार, तुळजापूर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती तुळजापूर तसेच ग्रामपंचायत कार्यालय, तामलवाडी यांना पाठवण्यात आली आहे. कंपनीने सकारात्मक निर्णय घेतल्यास गावातील शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल, रोगराई आटोक्यात येईल आणि गाव व कंपनी यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ होईल, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा