Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२६

३२ वर्षांनंतर पुन्हा एकदा शाळेच्या अंगणात रंगला आठवणींचा सोहळा..! शाळा, मैत्री, आठवणी आणि कृतज्ञतेचा अनोखा सोहळा; श्री. एस. एस. शेळके प्रशाला, वागदरीच्या १९९३-९४ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहबंध मेळावा उत्साहात संपन्न

 *वागदरी‌(अक्कलकोट) प्रतिनिधी* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



वागदरी : शाळा तीच... वर्ग तेच... मैदान तेच... फक्त काळ पुढे सरकला, विद्यार्थी मोठे झाले आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटांवर विखुरले गेले. मात्र मनाच्या एका कोपऱ्यात जपलेल्या शाळेच्या आठवणी, मित्रमैत्रिणींची मैत्री आणि गुरुजनांविषयीचा आदर आजही तसाच कायम आहे. याच आठवणींना उजाळा देत, जुन्या स्नेहबंधांना पुन्हा घट्ट करत आणि गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत श्री. एस. एस. शेळके प्रशाला, वागदरी येथील १९९३-९४ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहबंध मेळावा मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


अनेक वर्षांनंतर शाळेच्या अंगणात एकत्र आलेले विद्यार्थी, एकमेकांना भेटल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेला आनंद, जुन्या आठवणी सांगताना डोळ्यांत तरळलेले भाव आणि गुरुजनांचे आशीर्वाद घेताना मनात दाटून आलेली कृतज्ञता, अशा अनेक भावनिक क्षणांनी हा दिवस अविस्मरणीय ठरला. जणू काही पुन्हा एकदा शाळा भरली होती आणि बालपण काही तासांसाठी पुन्हा जगायला मिळाले होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील दिवंगत गुरुजन आणि दिवंगत मित्रमंडळींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनकर जावळे सर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेच्या विद्यमान मुख्याध्यापिका राजश्री शेळके मॅडम उपस्थित होत्या. यावेळी प्रधान सर, आलूरे सर, आंदोडगी सर, देशमुख सर, कांबळे सर आणि शेळके मॅडम यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आनंद व्यक्त करत त्यांना पुढील आयुष्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय मनोगतात दिनकर जावळे सर यांनी समाजात संस्कारक्षम पिढी घडविण्याची गरज अधोरेखित केली. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी समाजातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात द्यावा, त्यांचा शैक्षणिक खर्च उचलावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच आपला एखादा मित्र संकटात असेल तर त्याच्या मदतीला धावून जाणे, मित्रत्वाचे नाते केवळ भेटीगाठींपुरते मर्यादित न ठेवता ते कृतीतून जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आई-वडिलांचे ऋण फेडणे आणि समाजाचे ऋण जाणणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

या मेळाव्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व गुरुजनांचा केलेला सन्मान. उपस्थित विद्यार्थ्यांच्या वतीने गुरुजनांना फेटा, भेटवस्तू, पुस्तके आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. ज्या शिक्षकांनी आयुष्याला आकार दिला, ज्ञानाची शिदोरी दिली आणि योग्य-अयोग्याची जाणीव करून दिली, त्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण उपस्थितांसाठी विशेष भावनिक ठरला.

केवळ स्नेहमेळावा नव्हे, तर शाळेचे ऋण फेडण्याचा संकल्प!

या स्नेहमेळाव्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशालेतील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी कायमस्वरूपी निधी उभारण्याचा घेतलेला संकल्प. जमा झालेली रक्कम मुदत ठेवीमध्ये (फिक्स्ड डिपॉझिट) ठेवून त्यातून मिळणाऱ्या व्याजाचा उपयोग शाळेतील गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी करण्यात येणार आहे. तसेच इयत्ता पाचवी ते नववीमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्याचाही उद्देश ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या मेळाव्याला केवळ आठवणींचे स्वरूप न राहता सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कलबुर्गी यांनी केले. यावेळी सुषमा वारे, रवी कुलकर्णी, अंबादास सोनकांबळे, भरत पाटील, शरण सुरवसे, अंबिका वळसंग, शाबुद्दीन शेख यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

या मेळाव्याचे नियोजन दोन टप्प्यांत करण्यात आले होते. प्रत्येक माजी विद्यार्थ्याची वैयक्तिक ओळख करून देण्यात आली. शाळेतील जुन्या आठवणी, परीक्षेतील कामगिरी, सध्याचा व्यवसाय, कौटुंबिक माहिती आणि आयुष्यातील वाटचाल याविषयी माहिती सांगण्यात आली. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवास ऐकण्याची आणि एकमेकांना नव्याने जाणून घेण्याची संधी मिळाली.

कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेच्या परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेला हा स्नेहसोहळा सायंकाळी पाच वाजेपर्यंत रंगला. जवळपास ९० माजी विद्यार्थी या मेळाव्यास उपस्थित होते.

विशेष बाब म्हणजे दहावीच्या अ, ब, क आणि ड अशा सर्व तुकड्यांतील विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविण्यात आला होता. शाळेत काही कारणांमुळे शिक्षण पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांनाही या स्नेहमेळाव्यात आवर्जून सहभागी करून घेण्यात आले. तसेच सातवी-आठवीनंतर पुढील शिक्षणासाठी परगावी गेलेल्या विद्यार्थ्यांनाही या स्नेहबंधात जोडण्यात आले. कोण कुठपर्यंत शिकले, कोण कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे, यापेक्षा आपण सर्व एकाच शाळेचे विद्यार्थी आहोत, ही भावना या मेळाव्यातून प्रकर्षाने दिसून आली.

प्रत्येक विद्यार्थ्याला स्मृतिगंध सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. गुरुजनांचा सन्मान, मित्रमैत्रिणींच्या भेटी, जुन्या आठवणी, हसत-खेळत रंगलेल्या गप्पा आणि भविष्यातही एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा निर्धार अशा वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.

मेळाव्याच्या यशस्वितेसाठी माजी विद्यार्थ्यांचे सामूहिक योगदान

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत बटगेरी, मुन्ना कलबुर्गी,गौतम बनसोडे, शरण सुरवसे, महांतेश कोणजी, शिवानंद नंदर्गी, गुरुनाथ सिंदगी, गणेश शिंदे, भीमाशंकर ठोंबरे, दीपक भिमपुरे, सुरेश बकरे, अप्पू सोनकांबळे, शिवाजी सनके, सलीम आमटे, भरत पाटील, परमेश्वर मगी, अंबादास सोनकांबळे, गंगणा तोळणूरे, शिवशंकर पुजारी, करुणा पाटील, रेखा लोखंडे, महानंदा नंदे, सुषमा हिबारे, प्रभावती पोमाजी, सुनंदा दुधगी, नंदा खराडे, सुरेखा गौडगाव, परशुराम वळसंग, पंचप्पा पालापुरी, सचिन सुरवसे, चंद्रहार गायकवाड, शरण लगशेट्टी, अण्णाप्पा भैरामडगी, बिबीषण क्षिरसागर यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेवटी एकच भावना... शाळेचे ऋण कधीच विसरता कामा नये!

आपण आयुष्यात कितीही मोठे झालो, कितीही यश मिळवले, तरी आपल्या यशाची पहिली पायरी शाळेतच घातली गेली, हे विसरता कामा नये. शाळा आपल्याला केवळ शिक्षण देत नाही, तर जगण्याची दिशा, माणुसकीचे संस्कार आणि नात्यांची श्रीमंती देते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शाळेतील मित्रमैत्रिणींना भेटावे, गुरुजनांचा सन्मान करावा, शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी आणि शक्य असेल ते योगदान द्यावे.

१९९३-९४ च्या या माजी विद्यार्थी मेळाव्याने केवळ जुन्या आठवणी जाग्या केल्या नाहीत, तर शिक्षण, मैत्री, सामाजिक बांधिलकी आणि गुरुजनांप्रती कृतज्ञता यांचा सुंदर आदर्शही निर्माण केला.

खरंच... त्या दिवशी शाळा पुन्हा भरली होती; पण यावेळी हजेरी लावली होती ती अनुभवांनी समृद्ध झालेल्या विद्यार्थ्यांनी, आठवणींनी आणि आयुष्यभर जपलेल्या मैत्रीने!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा