*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
*तामलवाडी (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) दि. २ -* तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी गावात पावसाअभावी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे, याकडे लक्ष वेधत आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सैनिक *श्री सावंत शिवाजी रामकृष्ण* यांनी धाराशिवचे पालकमंत्री मा. प्रताप सरनाईक, गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर व ग्रामपंचायत तामलवाडी यांना ई-मेल द्वारे निवेदन पाठवून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
गेल्या दोन महिन्यापासून गावातील मुख्य पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी, बोअरवेल व तलावातील पाणी पातळी अत्यंत खालावली आहे. त्यामुळे नळ योजनेला वेळेवर व पुरेसे पाणी येत नसल्याने महिला-भगिनींना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. गुराढोरांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध नाही. रब्बी पिके पाण्याअभावी वाळून चालली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
*त्यांच्या प्रमुख मागण्या अशा:*
१. गावात तात्काळ शासनामार्फत पाण्याचे टँकर सुरू करावेत.
२. अपूर्ण असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत नळ कनेक्शन योजना तात्काळ दुरुस्त करावी.
३. गावातील सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण व टँकरने भराव करावा.
४. दुष्काळग्रस्त भाग म्हणून गावाला शासकीय मदत व चारा छावणी मंजूर करावी.
५. RO फिल्टर / टँकर पॉईंटची व्यवस्था करावी.
ही गंभीर बाब लक्षात घेऊन तहसीलदार व पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवून तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. या निवेदनाची दखल शासन घेणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा