*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
सोलापूर जिल्ह्यात चार हजार ७६ अंगणवाड्या असून ३ डिसेंबरपासून मदतनीस व सेविकांनी पुकारलेले बेमुदत कामबंद आंदोलन २५ दिवसांनंतरही सुरूच आहे. दरम्यान, जिल्हा परिषद शाळांमध्ये भरणाऱ्या २३८ अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना शाळांच्या माध्यमातून पोषण आहार दिला जात आहे. पण, अद्याप जिल्ह्यातील तीन हजार ८३८ अंगणवाड्यांना कुलूपच लावलेले आहे.
पेन्शन लागू करा, शासकीय कर्मचारी म्हणून कायम नेमणूक द्यावी, मानधन नको वेतन हवे, अशा प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील एक लाख दहा हजार अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस महिला २५ दिवसांपासून बेमुदत कामबंद आंदोलनाला बसले आहेत. ताटवाटी, खर्डा-भाकरी, बोबांबोंब, किर्तन आंदोलन, कॅण्डल मार्च अशा वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने त्यांच्याकडून सुरू आहेत.
अधिवेशनापूर्वी हे आंदोलन सुरू असून अधिवेशनातही त्यावर मार्ग निघाला नाही. शासन स्तरावरून सकारात्मक तोडगा निघत नसल्याने अंगणवाड्या बंद आहेत. एकात्मिक बालविकास विभागाच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांच्या आदेशानुसार महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या मदतीने काही अंगणवाड्या सुरू केल्या आहेत. त्याची संख्या अत्यल्प असल्याची वस्तुस्थिती आहे. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास एक लाख ६३ हजारांवर चिमुकली मागील २५ दिवसांपासून अंगणवाड्यांमध्ये गेलेले नाहीत. त्यांना पोषण आहार देखील मिळालेला नाही.
नवीन सेविका- मदतनीस कर्मचाऱ्यांवर दबाव
नव्याने भरती झालेल्या सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांना आवाहन करून काही गावातील अंगणवाड्या आंदोलन काळात उघडल्या गेल्या. पण, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्याची खबर लागताच त्यांनी संबंधित सेविका व मदतनीस महिलांना समज दिल्याचे अधिकारी सांगतात. त्यामुळे आता दीड ते पावणेदोन लाख चिमुकल्यांसाठी अंगणवाड्या कधी सुरू होतील व त्या चिमुकल्यांना पोषण आहार कधी मिळेल, असे प्रश्न पालकांकडून विचारले जात आहेत.
ना झेडपी शिक्षक ना गावातील तरूणांची नेमणूक
अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांचे शैक्षणिक व शारीरिक नुकसान होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश एकात्मिक बालविकास विभागाच्या आयुक्तांनी दिले आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद शाळांमधील पहिली- दुसरीच्या वर्गांवरील शिक्षक आणि गावातील पदवीधर तरूण- तरूणींच्या माध्यमातून काही तास अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना शिकविण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, ते नियोजन अजूनही कागदावरच असून बहुतेक चिमुकल्यांना ना पोषण आहार ना अध्यापन अशी वस्तुस्थिती आहे. आता फक्त १०० पर्यवेक्षकांच्या माध्यमातून २३८ अंगणवाड्यांमधील मुलांनाच पोषण आहार मिळतोय.
*सौजन्य*
*कोकण-न्युज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा