*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील ३८ लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी ‘महावितरण’ची अभय योजना- २०२४ अंमलात येणार आहे. त्याअंतर्गत ग्राहकांना वीजबिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण एक हजार ७८८ कोटी रुपये माफ करण्यात येणार आहेत. मात्र, थकबाकीदार ग्राहकांना त्यांच्याकडील थकीत वीजबिल तातडीने भरावे लागणार आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ग्राहकांना कारवाईपासून दिलासा देण्यासाठी १ सप्टेंबरपासून ही योजना लागू केली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदारास वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. दरम्यान, थेट कायदेशीर कारवाई करण्याऐवजी सुविधा म्हणून ही सवलतीची योजना लागू करण्यात आली आहे. या संधीचा लाभ घेऊन ग्राहकांनी चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.
राज्यातील ‘महावितरण’च्या ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना लागू असणार आहे. थकित बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही.
योजनेचा कालावधी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ असणार आहे. ३८ लाख ग्राहकांकडून ‘महावितरण’ला मूळ बिलाची पाच हजार ४८ कोटी रुपयांची रक्कम तसेच एक हजार ७१९ कोटी रुपये व्याज आणि ६९ कोटी ९० लाख रुपये विलंब आकार येणेबाकी आहे. तथापि, या वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकित बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरुपातील दंड माफ करण्यात येणार आहे.
थकबाकी भरण्यासाठी सहा हप्ते
मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून ऊर्वरित ७० टक्के रक्कम सहा हफ्त्यात भरायची सवलत ग्राहकांना मिळेल. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एकरकमी थकित बिल भरतील, त्यांना १० टक्के सवलत देण्यात येईल. उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळेल. भिवंडी, मालेगाव, मुंब्रा, शीळ व कळवा या महावितरणच्या फ्रांचायजी क्षेत्रातील वीज ग्राहकांसाठीही योजना लागू होणार आहे.
ग्राहकांना असा घेता येईल लाभ...
संबंधित वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाईटवरून ऑनलाइन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. ‘महावितरण’च्या मोबाइल ॲपवरूनही लाभ घेता येईल. वीज ग्राहक १९१२ किंवा १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही माहिती घेऊ शकतात. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा