Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

ऊसतोड मजुरांच्या टोळ्या गावोगावी दाखल, झोपड्या ( राहुट्या ) उभारणीचे काम सुरू. हंगाम विधानसभा निवडणुकी नंतर सुरू होणार

 


*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 8378081147

-----राज्यातील साखर कारखान्यांचा २०२४-२५ चा गळीत हंगामाला सुरूवात होणार आहे. त्यासाठी विदर्भ, मराठवाड्यासह मध्यप्रदेश येथील ऊसतोड मजुरांच्या टोळ्या गावोगावी दाखल होऊन झोपड्या ( राहुट्या ) उभारणीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे सहा महिन्यापासून ठप्प झालेली बाजारपेठा व आठवडे बाजारात पुन्हा हलचल वाढली आहे.

    राज्यातील साखर कारखानदारी सन २०२४-२५चा गळीत हंगाम सुरू होणार असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ट्रक व ट्रॅक्टर एक आठवड्यापूर्वी ऊसतोड मजुरांना आणण्यासाठी विदर्भ, मराठवाड्यात गेले होते. ऊसतोड मजूर दिवाळीपूर्वी आपापली बिऱ्हाडे बांधून कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील गावात टोळ्या दाखल होऊ लागल्या आहेत. गावोगावी राहुट्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यापासून थंड पडलेली बाजारपेठा व आठवडे बाजार हळूहळू हलायला लागली आहेत.

     नीरा व भीमा नद्यांच्या पट्ट्यातील आगारावर बहुधा अनेक ऊस कारखान्यांची कमान अवलंबून असल्याने जादा टोळ्या या परिसरात दाखल झाल्या आहेत. नीरा भीमा सहकारी कारखाना ( शहाजीनगर ), कर्मयोगी शंकरराव पाटील ( बिजवडी ), सहकार महर्षी शंकरराव मोहिते ( शंकरनगर ), दि सासवड माळी शुगर फॅक्टरी ( माळीनगर ), विठ्ठलराव शिंदे कारखाना ( गंगामाईनगर ), भैरवनाथ शुगर ( आलेगाव ), बारामती अॅग्रो ( शेटफळगढे ), छत्रपती सहकारी साखर कारखाना ( भवानीनगर ) आदींसह चार जिल्ह्यातील कारखान्यांच्या ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत.



   नीरा नरसिंहपूर परिसरातील गणेशवाडी, पिंपरी बुद्रुक, गोंदी, लुमेवाडी, ओझरे, गिरवी, हरहर महादेव, टण्णू, आडोबावस्ती, नरसिंहपूर, सराटी, निरनिमगाव, गारअकोले, टाकळी, आलेगाव, शेवरे, संगम, गणेशगाव, तांबवे, माळीनगर आदी गावांत प्रत्येकी दहा ते वीस ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल होऊ लागल्या आहेत. त्यामुळे या भागातील सर्वच आठवडे बाजार व लहान मोठ्या व्यावसायिकांच्या व्यवसायास सुरवात झाली आहे. त्यामुळे सहा महिन्या विश्रांती नंतर बाजारपेठ उभारी घेणार याची शक्यता वाढली आहे.

     मोसमी पावसाने परतीच्यावेळी अतिवृष्टी सदृश्य हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली. परंतु उसाचा उतारा यामुळे वाढणार असल्याने साखर कारखानदारी उशिरा पर्यंत चालवावी लागण्याची शक्यता काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर सध्याला विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून २० नोव्हेंबरला मतदान असल्याने ऊसतोड मजुरांना मतदानाला घेवून जाणे व परत घेवून येणे जिकीरीचे होणार आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष गळीत हंगाम सुरू होणार असल्याने ऊसतोड मजुरांना तोपर्यंत सांभाळण्याचे कसब गाडी मालकांचे लागणार आहे.

फोटो - टणू ( ता. इंदापूर ) साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होणार असल्याने ऊसतोड मजूर दाखल होऊन राहुट्या उभ्या करण्यात दंग आहेत.

------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा