Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २६ ऑक्टोबर, २०२५

देशात व राज्यात आधुनिक शेतीचे आदर्श उदाहरण शेतकऱ्यांनी उभे करावे --कृषिमंत्री दत्तात्रय भरणे


 

सहसंपादक- डॉ-संदेश शहा

टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9922419159

इंदापूर तालुक्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांनी आधुनिक कृषी उपकरणांचा वापर करून देश व राज्यात आधुनिक शेतीचे आदर्श उदाहरण उभे करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर इंदापूर तालुका कृषी विभागा च्या वतीने इंदापूर प्रशासकीय भवन प्रांगणात लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत ५१ अनुदानित ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलीत ८ यंत्रे व औजारांचे वितरण कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.



मंत्री दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले, पारंपरिक शेती सध्या परवडत नसल्याने त्याला आधुनिकतेची जोड देणे गरजेचे आहे. त्यामुळे कृषी यांत्रिकी करण हे शेतीच्या प्रगतीचा पाया आहे. आधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने शेती उत्पादनाची प्रक्रिया सुलभ करणे, शेतमजूर टंचाईवर मात करणे, वेळेची बचत यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजना महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक कृषी उपकरणांचा जास्तीत जास्त वापर करून शेतात परिवर्तन घडविणे गरजेचे आहे.आधुनिक यंत्रसामुग्रीच्या वापरा मुळे उत्पादन खर्च कमी होऊन शेती अधिक फायदेशीर बनेल. तरुण पिढीला शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. इंदापूर तालुक्यातील एकूण २३ हजार ५९७ लाभार्थी शेतकऱ्यांची निवड या योजनेत करण्यात आली आहे. त्यापैकी, ९ हजार ८२१ लाभार्थी ट्रॅक्टर साठी निवडले गेले आहेत. १ हजार ३ लाभार्थ्यांनी ट्रॅक्टरसाठी कागदपत्रे अपलोड केली होती. त्यातून ३२६ लाभार्थ्यांना पूर्व संमती देण्यात आली आहे. त्यापैकी ५१ लाभार्थ्यांना या कार्यक्रमात अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले आहे. एकूण १३ हजार ७७६ लाभार्थी ट्रॅक्टरचलीत यंत्र व औजारांसाठी पात्र आहेत. त्यापैकी आठ लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचलीत औजारांचे वितरण करण्यात आले. पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांना ट्रॅक्टर,यंत्र व औजारांचे वितरण पूर्ण झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या वेळेनुसार व टप्प्याटप्प्याने ट्रॅक्टर व औजारांचे वाटप करण्यात येईल असे सूतोवाच त्यांनी केले.

दिवाळी पाडव्याच्या पावन दिवशी शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती साधनांचा लाभ मिळणार आहे. शेती अधिक गतिमान व उत्पादनक्षम होण्यास मदत होणार आहे. कृषी विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याने शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ होत आहे. इंदापूर तालुक्या तील शेतकरी नेहमीच शेतात नवनवीन प्रयोग करत असतात.आता कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन सिस्टिम व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आपला तालुका समृद्ध करण्याची जबाबदारी आपण स्वीकारु. तरुणांनी देखील अधिकाधिक कृषी शिक्षण घेऊन आपापल्या शेतात नवनवीन प्रयोग करावेत. राज्यासह देशातील शेतकऱ्यांसमोर एक उदाहरण ठेवावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले. 



यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे, सचिन सपकळ, ॲड शुभम निंबाळकर, सुनील बनसोडे, तालुक्यातील कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी शेतकरी व ट्रॅक्टर कंपनीचे वितरक उपस्थित होते. 

 फोटो ओळ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण योजनेतील साहित्याचे वाटप फोटो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा