-------
शरद पवार साहेब हे आमचे दैवत आहेत, विठ्ठल आहेत तर खासदार सुप्रिया सुळे देखील आमच्याच आहेत. त्यांनी इंदापूर विधानसभेचा आमच्या तंबूत घुसलेला उमेदवार न बदलल्यास भारतातील सर्वात मोठी बंडखोरी इंदापूर मध्ये होईल असा सूचक इशारा सोनाई दूध संघाचे अध्यक्ष दशरथ माने यांनी दिला.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जुन्या मैदानात झालेल्या विराट परिवर्तन मेळाव्यात दशरथ माने बोलत होते. यावेळी सर्वच वक्त्यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी सभेतील सर्वांनी हात करून उमेदवार न बदलल्यास अपक्ष अर्ज दाखल करण्यास पाठिंबा दिला.
दशरथ माने पुढे म्हणाले, सन १९५२ पासून तालुक्यात पाटील घराणेशाही सुरू आहे. आता तर पाटील घराण्याचे बंटी बबलू देखील राजकारणात आले आहेत. ही तीन आदमी पार्टी आमच्या तंबूत घुसली आहे. मात्र आमच्याकडे बांबू आहेत. हर्षवर्धन पाटील चांगला दिसतोय, उंचापुरा आहे. मग त्यांना मोदीच्या जागेवर बसवा किंवा विधानपरिषद, राज्यसभेवर घ्या, आमचे काही म्हणणे नाही. आम्ही दत्तात्रय भरणे यांना कंटाळलो तर हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी लादण्यात येत आहे. पाटील यांनी तालुका विकास आघाडी, शिवसेना, भाजप व काँग्रेस ओरबाडून खाल्ली आहे. हा माणूस सर्वांना मॅनेज करतो मग आम्ही काय गवत उपटायचे काय? असा संतप्त सवाल करत जर निर्णय बदलला नाही तर आम्ही ११० टक्के लढू. वेळ प्रसंगी जेल मध्ये बसू पण लढून परिवर्तन करत जिंकूनच दाखवू असा इशारा श्री. माने यांनी दिला.
जिल्हा बँकेचे संचालक तथा प्रबळ इच्छुक उमेदवार आप्पासाहेब जगदाळे म्हणाले, हर्षवर्धन पाटील व माझे भांडण नाही पण ते शब्द पाळत नाहीत. आमचे मामा भाचे असे नाते आहे. मात्र भाचा मामाला फसवतोय. नात्याने मी मोठा आहे तर ते वयाने मोठे आहेत. त्यांनी पक्ष प्रवेश करण्यापूर्वी शरद पवार, जयंत पाटील यांच्या सोबत झालेल्या बैठकीची देखील माहिती आम्हाला दिली नाही. श्रध्येय शंकरराव पाटील उर्फ भाऊ, त्यांची कन्या पद्माताई पाटील, माजी आमदार राजेंद्रकुमार घोलप, गोकुळदास शहा, मुकुंदशेठ शहा, भरत शेठ शहा यांना संस्थेतून त्यांनी बाहेर काढले. सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीत २६ हजार मतांचे लीड दिले, त्यात अदृश्य शक्ती म्हणून आमचा हात आहे, असे खोटे वक्तव्य भाऊंच्या पुतळ्यासमोर श्री पाटील यांनी पक्ष प्रवेश सोहळ्यात केले आहे. त्यांनी सर्वांना फसविले असून आम्हा सर्वांचा तळतळाट त्यांना निश्चित लागणार आहे कारण हा जनतेचा आवाज आहे. सन २०१४ मध्ये मला आमदारकीचा शब्द दिला होता. त्यावेळी दत्तात्रय भरणे आमदार झाले. त्यानंतर २०१९ मध्ये विजयसिंह पाटील यांच्या साक्षीने मला हर्षवर्धन पाटील यांनी पुढील वेळी आमदारकीचा शब्द दिला मात्र आता त्यांच्या उमेदवारीची मेळाव्यात घोषणा करण्यात आली आहे. पहिल्यांदा भरणे मामांनी तर दुसऱ्यांदा भाचे पाटील यांनी फसविले. त्यामुळे यंदा हा उमेदवार न बदलल्यास तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने अपक्ष लढू. इंदापूरच्या बंडखोरीचे मोहोळ संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल असा इशारा त्यांनी दिला.
सोनाई परिवाराचे संचालक, इच्छुक उमेदवार प्रविण माने म्हणाले, उजनी धरणासाठी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्याग केला आहे. त्यामुळे उजनीचे पाणी बारमाही मिळायला हवे, उजनी पुनर्वसनाचे प्रश्न सुटले पाहिजेत, नीरा नदी वरील बंधारे, ढापे यांचे दरवाजे व्यवस्थित असावेत, बंधाऱ्यांची गळती बंद व्हावी, खडकवासला कालव्या तून शेटफळ गढे ते तरंगवाडी पर्यंतचे तलाव, शेततळी भरली पाहिजेत, नीरा डावा सणसर कट ते शेटफळ हवेली तलावाचे अवर्तन व्यवस्थित मिळाले पाहिजे तरच तालुका सुजलाम सुफलाम होईल. शेतकऱ्यांच्या उसाला बारामती तालुक्यातील कारखान्या प्रमाणे भाव मिळाला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांना ७०० ते ८०० रुपये टना मागे ज्यादा मिळतील. इंदापूर च्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या कार्यामुळे इंदापूर नगरपरिषद देशात गाजली आहे. त्यामुळे तुम्ही परिवर्तना साठी आम्हाला साथ द्या, तुमच्या विश्वासास तडा जाऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी भरत शहा, बाबासाहेब चवरे, कांतीलाल झगडे, शकीलभाई सय्यद, बाळासाहेब हरणावळ, बाळासाहेब चितळकर, अमोल मुळे, रविराज भाळे यांची भाषणे झाली. यावेळी तुषार जाधव, मनोहर ढुके, विलासराव माने, दत्तात्रय फडतरे, प्रदीप जगदाळे, राजेश जामदार, आबासाहेब पाटील, किरण बोरा, रामकृष्ण मोरे, दादा थोरात, विकास खिलारे, समदभाई सय्यद, रोहित मोहोळकर, अर्शदभाई सय्यद, शकिल सय्यद, बापू जामदार, प्रशांत उंबरे, रुपाली रणदिवे, सुनिता नरुटे, विजया कोकाटे, अक्षय सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक बबनराव लावंड यांनी तर सूत्रसंचालन अनिल रुपनवर यांनी केले. आभार प्रदर्शन अमोल भोईटे यांनी केले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा