*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
पुणे, दि. ११ मे २०२५: लग्नाचे खोटे आमिष दाखवून पुण्यातील एका आयटी कर्मचारी महिलेवर बलात्कार करून लाखो रुपये उकळल्याच्या आरोपाखाली कोंढवा पोलिसांनी सुफियान रजीउल्लाह शाह (रा. जयजवान सोसायटी, वानवडी) याला अटक केली आहे. आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा फायदा घेत सुफियानने पुणे, मुंबई आणि दिल्लीतील अनेक महिलांना फसवल्याचे उघड झाले आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून, तपास सुरू आहे.
सुफियान हा मॅट्रिमोनियल वेबसाइट्स आणि डेटिंग अॅप्सवर स्वत:ला अविवाहित आणि लक्जरी कार डीलर म्हणून दाखवत तरुणींशी मैत्री करायचा. २०२४ मध्ये पीडित महिलेशी त्याची ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर, लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेच्या मते, अनेकदा बळजबरीने संबंध ठेवले गेले. गरोदर राहिल्यावर लग्नासाठी आग्रह केल्यास सुफियान टाळाटाळ करू लागला.
आरोपीने कोल्ड्रिंकमध्ये नशेचे पदार्थ मिसळून पीडितेशी अनैसर्गिक कृत्य केल्याचा आणि त्याचे चित्रीकरण करून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळल्याचा गंभीर आरोपही पीडितेने केला आहे. सुफियानच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे अनेक तरुणी त्याच्यावर विश्वास ठेवत होत्या, याचा गैरफायदा घेत त्याने अनेकांना फसवले.
यापूर्वीही सुफियानविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा ( गु.र.न १०४/२०२५ ) गुन्हा दाखल होता, ज्यात तो फरार होता. आता बलात्कार आणि खंडणीच्या ( गु.र.न ३७०/२०२५ ) नव्या गुन्ह्यात अटक झाल्याने पोलिस त्याच्या इतर बळींचा शोध घेत आहेत. कोंढवा पोलीस सखोल तपास करत असून, या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.
*कोंढवा पोलिसांचे आवाहन*: अशा फसवणुकीला बळी पडलेल्या महिलांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, असे पोलिसांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा