Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ४ जानेवारी, २०२५

*नेहा जामसुतकर ,सरिता पवार, लक्ष्मी यादव,माही घाणे, आणि सपना राजपूत "कायद्याने वागा लोकचळवळ"चे यंदाचे , फातिमाबी --सावित्री पुरस्काराचे मानकरी! तर डॉ -शामल गरुड आणि डॉ-उषा रामवाणी यांना विशेष सन्मान पुरस्कार*


 

*उपसंपादक-- नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्युज मराठी*

पुरुषांची मक्तेदारी असलेला मालवाहतुकीचा व्यवसाय पतीच्या निधनानंतरही स्वतंत्रपणे आणि यशस्वीपणे सांभाळणाऱ्या मुंबईतील बोरीवलीच्या नेहा जामसुतकर, किशोरावस्थेतल्या आपल्या पहिल्याच कवितेत स्त्रियांचे पारंपरिक आदर्श नाकारणाऱ्या 'राखायला हवी निजखूण' या बहुचर्चित कवितासंग्रहाच्या कवी व सामाजिक कार्यकर्त्या कणकवलीच्या सरिता पवार, आपलं खडतर जगणं बदलावं यासाठी शिक्षणाचा मार्ग पत्करणारी, युवा नेतृत्व, पाणीप्रश्न, मानवाधिकार, महिला हक्क अशा विविध विषयांवर कार्यरत आणि समाजमाध्यमातला आजचा खणखणीत आवाज लक्ष्मी यादव, वर्तमानावर भाष्य करण्यासाठी रॅपचा परिणामकारक वापर करणारी कल्याणातील युवती माही घाणे आणि एकलपणाची पर्वा न करता समाजाच्या टिंगलटवाळीकडे दुर्लक्ष करत जळगावात टायर सर्विस सेंटर चालवणाऱ्या सपना राजपूत. या आहेत कायद्याने वागा लोकचळवळीच्या यंदाच्या फातिमाबी-सावित्री पुरस्काराच्या मानकरी !


कायद्याने वागा लोकचळवळीचे राज्य संघटक राकेश पद्माकर मीना यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली आहे.


तमाशा लोककला आणि त्यावर विसंबून कलावंतांचं जगणं व सद्यस्थितीचा संशोधनाच्या माध्यमातून महत्त्वाचा दस्तावेज करणाऱ्या डॉ. श्यामल गरूड आणि शिक्षणासाठी पारंपरिक मानसिकतेच्या आपल्या कुटुंबांशीच संघर्ष करत विना मार्गदर्शक पीएचडी करणाऱ्या डॉ. उषा रामवानी यांनाही विशेष सन्मान पुरस्कार घोषित करण्यात येत आहे.


कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांच्या अध्यक्षते खाली शनिवार, ११ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता उल्हासनगरातील सिंधु भवनमध्ये आयोजित फातिमाबी-सावित्री उत्सव व पुरस्कार वितरण सोहळ्यात सर्व मानकरींना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.


या कार्यक्रमाला बहुमाध्यमिक लेखक-दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई, मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख व मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यापूर्वीच्या पुरस्कारप्राप्त मानकरींची प्रतिनिधी म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांची विशेष उपस्थिती असणार आहे. डोंबिवलीतील आन्सर कॉम्प्युटर्सचे व्यवस्थापकीय संचालक नितीन शेठ यांच्या व्यवसायाला ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.


उल्हासनगरातील माजी नगरसेविका अंजली चंद्रकांत साळवे स्वागताध्यक्षपदी असून, कार्यक्रमाचं संयोजन महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्थेच्या अध्यक्ष वृषाली विनायक यांच्याकडे आहे. कार्यक्रम खुला असून, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन राकेश पद्माकर मीना यांनी केलं आहे.


- प्रफुल केदारे, माध्यम समन्वयक, कायद्याने वागा लोकचळवळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा