*करमाळा-- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
संजयमामांना जनतेने कायमचा ब्रेक दिला असून त्यांनी आता नवीन कर्मभुमी शोधावी असा हल्लाबोल पाटील गटाकडून करण्यात आला. टाकळी ता करमाळा येथील एका सभेत माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आपल्या भाषणातून जनतेने आपल्याला विधानसभा निवडणुकीत पराभुत करुन ब्रेक दिला हे बरं झालं असल्याचे सांगत स्वतःचा पराभव मान्य केला. तसेच त्यांनी विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या वर टिका केली. यास उत्तर म्हणून आज विद्यमान आमदार नारायण आबा पाटील गटाकडून माजी आमदार संजयमामा शिंदे यांना टिकेचे लक्ष बनवले गेले. याबाबत अधिक सविस्तर बोलताना पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी सांगितले की स्वतःच्या निष्क्रियतेमुळेच माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्यावर आज घरी बसण्याची वेळ आली आहे. सन २०१९ ते २०२४ या पाच वर्षासाठी आमदार म्हणुन काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती परंतू सर्वकाही प्रशासनावर सोपवून संजयमामा शिंदे यांनी जनतेच्या प्रश्नांकडे कायमच दुर्लक्ष केले. जनतेचे शासनाच्या विविध विभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी एकदाही आमसभा घेतली नाही. नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण पाच वर्षात त्यांना कधी करता आले नाही. दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी पुर्व भागातील वडशिवणे व अन्य तलावात किमान पावसाळ्यात सुध्दा आणता आले नाही. शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी मुबलक वीज देता आली नाही. रावगाव, राजूरी यासह अनेक ठिकाणी ३३/११ केव्हीए सबस्टेशनची मंजुरी असताना पाच वर्षात उभारणी करता आली नाही. संजयमामा यांच्याकडून पाच वर्षात नाही झालेल्या कामांची यादी ही मारुतीरायांच्या शेपटीप्रमाणे कितीही लांब जाईल एवढी आहे. या उलट तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा शहरात नागरिकांना सोयीस्कर असलेल्या तहसील कार्यालयाचे स्थलांतर करण्याचा प्रयत्न केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंदिस्त पाईप लाईन कामास शेतकऱ्यांनी मागणी न करता मंजूर करुन आणला. सुमारे ११० कोटीच्या या कामातील चारी खोदकाम म्हणुन अधिक नफा मिळवून देणारे काम जवळच्या व्यक्तीला दिले. ती व्यक्ती कोण आहे हे नाव त्यांनी धाडसाने करमाळा तालुक्यातील जनतेसमोर स्वतः सांगावे. केवळ विधानसभा निवडणुकीतील पैशाची तरतूद म्हणुन जर या कामाचा त्यांचा उद्देश होता तो जनतेनेच मोडून काढला. करमाळा तालुक्यातील या पुर्वीच्या एकाही आमदारांनी कसलीही विकासकामे केली नाहीत असे भाष्य करुन वारंवार करमाळा तालुक्यातील जनतेचा स्वाभिमान दुखावला. केवळ माढा तालुक्यातील छत्तीस गावात दडपशाही, ऊसाची अडवणुक, खोट्या केसेस व बोगस मतदान याच्या जोरावर त्यांनी एकवेळ सत्ता मिळवली पण या वेळी तेथील जनतेनेच त्यांचे मनसुबे उधळून लावले. माजी आमदार संजयमामा शिंदे हे जर त्यांच्या मागील पाच वर्षाच्या आमदार फंडातील तसेच इतर मंजुर कामांची उद्घाटने आता पराभुत झाल्यावर करत असतील व कामांची प्रशासकीय मंजुरी मिळवण्यासाठी त्यांना इतकी वर्षे लागत असतील तर यावरुनच त्यांची निष्क्रियता सिध्द होत असल्याचे तळेकर यांनी आवर्जून सांगितले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा