*अकलूज --प्रतिनिधी*
*शकुरभाई तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज – येथील सदाशिवराव माने विद्यालयात श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील (आक्कासाहेब) यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त प्रथम पारितोषिक वितरण समारंभ व भव्य एस.पी.एम. चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सातारा जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे यांच्या शुभहस्ते व अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक पांडुरंग एकतपुरे, रामभाऊ गायकवाड, उत्कर्ष शेटे, प्रशाला समितीचे सदस्य इक्बाल काझी, आप्पासाहेब मगर, शिक्षक-पालक संघांचे पदाधिकारी, बक्षीसदाते व गुणवंत विद्यार्थी पालक यांच्या उपस्थितीत गुणवंत विदयार्थ्यांना बक्षीसांचे वितरण व चित्रकला स्पर्धेचे उदघाट्न करण्यात आले.
सुरुवातीला कार्यक्रमांचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अमोल फुले सर यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांचे बालपण, संस्कार, वारकरी सांप्रदयाची परंपरा, विठ्ठल भक्ती याविषयी माहिती सांगून त्यांनी सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांना माळशिरस तालुक्याच्या विकासात मोलाची साथ देऊन त्यांनी दिलेल्या योगदानाची माहिती सांगितली. तसेच विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची व गुणवत्तेच्या उज्वल परंपरेची माहिती सांगितली.
याप्रसंगी विद्यालयाच्या सयाजीराजे वाद्य वृंदाने श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील (आक्कासाहेब) यांच्या जयंतीनिमित्त ‘रत्नाई गीत’ सादर केले. यानंतर एसएससी व एचएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या शुभहस्ते रोख बक्षिसे व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यानंतर एसपीएम चित्रकला स्पर्धेचे उदघाटन विद्यार्थ्यांना चित्रकला साहित्य देऊन करण्यात आले.
विद्यार्थी भाषणात इयत्ता १२वी ची विद्यार्थिनी कु. वैष्णवी जाधव हिने आक्कासाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच माजी विद्यार्थी इंद्रनील चव्हाण याने आपले मनोगत व्यक्त करताना त्याच्या शालेय जीवनातील आठवणी सांगून आपल्या यशात विद्यालयाचे व शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना अष्टपैलू घडविण्यासाठी जिल्ह्यातील ही आदर्श शाळा असून अनेक शालेय-सहशालेय उपक्रमात सहभागी होण्याचा सल्ला दिला.
अध्यक्षीय भाषणात बोलताना जितेंद्र साळुंखे सर यांनी श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील (आक्कासाहेब) यांच्या विषयी बोलताना राज्याच्या उभारणीत योगदान दिलेल्या 'महाराष्ट्राचे शिल्पकार' असलेले शंकरराव मोहिते पाटील यांना त्यांच्या विकासकार्यात मोलाची साथ देण्याचे महान कार्य आक्कांनी केले असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी भविष्यातील यश गाठण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत अंगी बाळगावी. येथील संस्कार व मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून ध्येयाकडे वाटचाल करावी. स्पर्धेच्या युगात अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी करावी असा मोलाचा सल्ला दिला.
या कार्यक्रमास बक्षीसदाते भारत बाबर, कल्लाप्पा सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, उपप्राचार्य सुभाष मुंडफणे, संजय जाधव, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजित कांबळे, शिक्षक प्रतिनिधी बलभीम काकूळे, संजय राऊत, बहुसंख्य पालक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलभीम काकुळे, बक्षीस वितरणाचे वाचन अनुराधा निबाळकर यांनी तर आभार दत्तात्रय घंटे यांनी केले. कार्यक्रमांची सांगता सारे जहाँ से अच्छा या देशभक्तीपर गीताने झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा