Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ८ मार्च, २०२६

*रमजानुल मुबारक -१९* *इन्सानियत म्हणजे मानवता हाच धर्म*

 *सलीमखान पठाण*

 *श्रीरामपूर*

*९२२६ ४०८०८२*



रमजान महिन्याची वाटचाल उत्तर अर्धा कडे होत असताना आता उन्हाचा तडाखा देखील वाढत आहे.फेब्रुवारी संपून मार्च महिना लागला आणि ऊन वाढू लागले.त्यामुळे रोजाची जाणीव देखील आता होत आहे.परंतु आता सवय झाल्याने फारसा त्रास होत नाही.

रमजान महिन्याचा काळ जसजसा संपत आहे तशी ईदची तयारी सुरू झाली आहे .बाजारपेठेत कपडे व इतर साहित्य खरेदी सुरु झाली आहे.जकात आदा करुन गरजूंना मदत करण्याची लगबग वाढली आहे.जवळचे गरजू नातेवाईकांना मदत पोहोच झाली असून देशभरातील मदरसांच्या सफिरांनी आपली वसूली केली आहे व काही करत आहेत.एकमेकांना साह्य करण्यासाठी हात पुढे सरसावले आहेत.मानवतेच्या भावनेतून मदतीचा ओघ कोणत्याही सरकारी मदतीशिवाय सुरु आहे. हजरत पैगंबरानी सांगितलेला मार्ग व कुरआन मधील मार्गदर्शनानुसार वर्तन करण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करीत असून रमजान महिन्याच्या पुण्यपर्वाचा लाभ घेण्याचा प्रयत्न प्रत्येक जण आपल्या परीने करीत आहे. आपल्या देशात सर्व जातिधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. भाजी विकणारा,दुधवाला, किराणावाला,डॉक्टर, ड्रायव्हर व इतर अनेक क्षेत्रात सर्व जातिधर्माची माणसे एकत्र वागतात,व्यवहार करतात पण त्यांच्यात कधी जात आडवी येत नाही. भाजी विकणाऱ्याला त्याची जात कुणी विचारीत नाही कि किराणा वाला कोण आहे हे कुणी पाहत नाही.कय्युमच्या दुकानात मटन चांगले मिळते म्हणून शहरातील सर्व समाजाचे लोक तेथे गर्दी करतात तर सिकंदरच्या दुकानातून शहरातील सर्व व्यापारी तेल खरेदी करतात.

 दैनंदिन जीवनात जाती धर्माचा विचार कुणीही करीत नाही पण गेल्या काही वर्षात देशात नवे सत्ताधारी आल्यापासून समाजविघटनाची प्रक्रिया सुरु झाल्यासारखे दिसत आहे.तेच गाव,तोच समाज, तेच लोक असतांना आता तेढ वाढतेय.नागरिकांचे मूलभूत प्रश्न व समस्या सोडविण्याऐवजी नको ते प्रश्न निर्माण करुन लक्ष विचलीत केले जात आहे.हे विश्वचि माझे घर ही ज्ञानेश्वरांनी मांडलेली संकल्पना मोडीस काढून वेगळया पध्दतीने केवळ मुस्लीम विरोध निर्माण करण्याचा प्रयत्न काही शक्ति करीत आहेत.याला मिडिया खतपाणी घालत आहे.विरोधी पक्ष दीन आणि हीन झाला आहे.पण या परिस्थितीतही काही समजूतदार माणसंही या बेफाम सुटलेल्या वारु ला आवरण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

खरं तर इस्लाम धर्माने कुणाचा द्वेष करण्याची शिकवण दिलेली नाही. अजानला आक्षेप घेणारे खूप निर्माण झाले पण आरतीला कुणी मुस्लीमाने कुठं आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही.मी राहतो त्या भागात जेवढया मशिदी आहेत तेवढीच मंदिरे आहेत.नवरात्र व गणेशोत्सवात या ठिकाणी खूप उत्साहात आरत्या व पूजा पाठ होते.पण कुणी कधी आक्षेप घेतलेला नाही.सर्व जण गुण्यागोविंदाने राहतात.हे वातावरण प्रत्येक ठिकाणी हवे.यालाच मानवता धर्म म्हणतात.(क्रमशः)


*सलीमखान पठाण*

 *श्रीरामपूर*

*९२२६ ४०८०८२*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा