*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
. *मो:-9730867448*
बार्शी तालुक्यातील शेळगाव आर गावाजवळ बुधवारी सायंकाळी सुमारे सहा वाजता कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात उत्तर सोलापूर तालुक्यातील दोन युवकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून गावडी दारफळ गावावरती शोककळा पसरली आहे. अपघातामध्ये मृत पावलेल्या युवकांचे नाव राहुल संदीपान खताळपवार आणि गणेश महादेव क्षीरसागर असून ते उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ येथील रहिवासी होते...... घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल संदिपान खताळ पवार आणि गणेश महादेव क्षीरसागर हे दोघे काही कामानिमित्त वैराग भागात आले होते तेथून गावाकडे दोघेही मोटारसायकल (एमएच १३ ईएस ३३१४) वरून परतत असताना, सोलापूरकडून वैराग कडे येणाऱ्या चारचाकी वाहनाने (एमएच १३ ईएस ४५३०) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकी सुमारे शंभर फूट दूर फरपटत गेली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले, परंतु दोघांपैकी एक जण जागेवरच गतप्राण झाला तर दुसरा रुग्णालयात नेत असताना प्राणज्योत मावळली.
घटनेची माहिती मिळताच वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन मुंडे आणि गोपनीय कर्मचारी किसन कोलते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.भीषण अपघातामुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला.
स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर वेगमर्यादा आणि सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या मार्गावर यापूर्वीही अपघात होऊन लोकांचा जीव धोक्यात आला असल्याने, स्थानिकांनी रस्त्यावरील सुरक्षा सुधारण्यासाठी तातडीची कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान शेळगाव येथे होणारी अपघातांची मालिका अद्याप देखील थांबलेली नाही.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा