*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. बरेचदा एक बाजू आपल्याला लगेच दिसते, पण दुसरी बाजू पाहण्यासाठी थोडा विचार आणि अनुभवांची उकल आवश्यक असते. सार्वजनिक स्वच्छता गृहांच्या बाबतीतही असंच घडतं. आज मी अतिशय स्पष्टपणे आणि अनुभवातून बोलणार आहे, कारण हीच खऱ्या अर्थाने ‘रीअॅलिटी’ आहे. हा माझा स्वतःचा अनुभव असून, त्यावर आधारित काही मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.
आपण अनेकदा बसस्थानक, रेल्वे स्थानक, रेल्वेमधील टॉयलेट्स, लग्न कार्यालये, हॉल्स, हॉटेल्स, शाळा, कॉलेजेस अशा विविध ठिकाणी स्वच्छता गृहांचा उपयोग करत असतो. परंतु, त्यांची अवस्था बऱ्याच ठिकाणी फारच दयनीय असते. तिथे वेळेवर सफाई होत नाही, कचरा उचलला जात नाही, पाण्याची सोय नसते, दरवाजे तुटलेले असतात किंवा कडीच नसते. विशेषतः महिलांच्या स्वच्छतागृहांमध्ये तर अनेक ठिकाणी महिला कर्मचारीच नसतात. ही केवळ असुविधा नाही, तर थेट आरोग्याशी निगडित गंभीर बाब आहे. यामुळे महिलांना वारंवार टॉयलेट इन्फेक्शन होणे, पि.सी.यू.डी. (PCUD) सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
या परिस्थितीत आपण सहजच सरकारला दोष देतो. पण एक गोष्ट विसरू नका – आपण जेव्हा सरकारकडे एक बोट दाखवतो, तेव्हा उरलेली तीन बोटं आपल्याच दिशेने असतात. म्हणून जबाबदारी केवळ सरकारची नाही, ती आपलीही आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून कधी कधी दुर्लक्ष होते, हे खरं आहे. पण त्यांच्याकडे सर्व सुविधा असतानाही त्या योग्य पद्धतीने वापरल्या जात नाहीत किंवा गैरवापर होतो. मात्र आपण स्वतःही जबाबदारी टाळतो. अनेक महिला सार्वजनिक स्वच्छता गृहांमध्ये सॅनिटरी पॅड्स, कपडे बेधडकपणे फ्लशमध्ये, खिडकीत, किंवा टॉयलेट बाऊलमध्ये टाकतात. यामुळे दुर्गंधी, रोगराई आणि अस्वच्छता वाढते. या वापरलेल्या वस्तूंना हात लावून त्या उचलाव्या लागतात त्या कर्मचाऱ्यांना – त्यांनाही घाण वाटतच असेल ना? आपण जेव्हा एखादा वापरलेला पॅड हातात घेताना चुकतो, तेव्हा त्या कर्मचाऱ्यांना तो उचलताना काय वाटत असेल?
यावर उपाय आहेतच, पण ते आपण स्वतः उचलले पाहिजेत. जसं आपण आपल्या पर्समध्ये मेकअपसामान ठेवतो, तसं पीरियड्सच्या काळात सोबत पेपर आणि कॅरी बॅग ठेवलं तर काय हरकत आहे? वापरलेला पॅड त्या बॅगेत गुंडाळून योग्य कचराकुंडीत टाकल्यास अर्धा प्रश्न तेथेच सुटतो. घरी आपण हीच दक्षता घेतो ना? मग बाहेर का नाही? यासाठी समाजात जागरूकता असणे आवश्यक आहे. शाळा–कॉलेजांमध्ये स्वच्छता शिक्षण, मासिक पाळी व्यवस्थापन, टॉयलेट शिस्त यावर मार्गदर्शन झालं पाहिजे. लहान वयातच ही संस्कृती रुजली पाहिजे.
सरकारने देखील प्रत्येक सार्वजनिक स्वच्छता गृहात पॅड जाळण्याचं यंत्र (Incinerator) बसवावं. अशा यंत्रामुळे पॅड जाळून विल्हेवाट लावता येते आणि त्यामुळे दुर्गंधी किंवा कचरा साचत नाही. स्वच्छता गृहांजवळ QR कोड लावावा, ज्यावरून नागरिक तक्रारी, सूचना किंवा स्तुती नोंदवू शकतील. अशी टॉयलेट रेटिंग सिस्टिम तयार झाली, तर प्रशासनही जबाबदार राहील.
स्वच्छता कर्मचाऱ्यांची जबाबदारी जितकी आहे, तितकीच त्यांचा सन्मानही व्हावा. त्यांना नियमित आरोग्य तपासणी, प्रशिक्षण, योग्य सुरक्षा साधने – जसे की हँडग्लोज, बूट, मास्क – मिळालेच पाहिजेत. तसेच त्यांचे काम समजून घेऊन त्यांना 'स्वच्छता योद्धा' या नावाने गौरवले जावे. महिलांना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी – सार्वजनिक स्वच्छता गृह ही सेवा महिलांसाठी मोफत आहे. जर कोठे अस्वच्छता असेल, तर तक्रार करण्याचा अधिकार आहे – तो वापरायलाच हवा.
फक्त महिलांचाच नव्हे, पुरुषांचाही यामध्ये सहभाग हवा आहे. सार्वजनिक टॉयलेट वापरताना पुरुषांनी शिस्त पाळली पाहिजे. भिंती रंगवणे, घाण टाकणे, फ्लश न करणे – हे सर्व वर्तन समाजाला मागे नेते. त्यामुळे महिलांच्या आरोग्याबरोबरच, ही एक सामाजिक संस्कृती बनायला हवी.
शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं – आपण जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो, तसं आपलं गाव, राज्य, देश आणि अख्खं जगही आपलं आहे. म्हणूनच, त्या ठिकाणी स्वच्छता राखणं ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. फक्त तक्रारी करून चालणार नाही. प्रत्येकाने एक पाऊल टाकलं, तर आपण या समस्यांवर नक्की मात करू शकतो.
ही जबाबदारी माझी आहे, तुमची आहे, आपल्या सर्वांची आहे. चला, सुरुवात करूया – स्वतःपासून! कारण "जगणं आणि जग – दोन्ही सुंदर व्हावं, तर स्वच्छतेची संस्कृती अंगीकारावीच लागते!"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा