Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

नाद करते काय.... यावचं लागतंय!!.. प्रसिद्ध डायलॉग वाली एसटी बस सेवा प्रवाशांसाठी ठरतेय डोकेदुखी?


 

इंदापूर तालुका ---प्रतिनिधी डॉ.संदेश शहा

 मो:-9921 419 159

नाद करती काय... यावच लागतंय!!!" हा डायलॉग गेल्या काही दिवसांपासून खूप लोकप्रिय झाला आहे. हॉटेलपासून ते अगदी ट्रक आणि इतर वाहनांवरही हा डायलॉग संदेश देताना दिसतोय. पण आता चक्क एका एसटी बसच्या मागेही तो लिहिलेला आढळून आला आहे. बसवर लिहिण्याचा उद्देश ‘या बसने प्रवास करावा असा असला तरी, या बससेवेच्या गैरसोयीमुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर गावातील प्रवाशांची मोठी अडचण होत आहे.

इंदापूर तालुक्यात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पंचतारांकित औद्योगिक वसाहत असल्याने इंदापूर तालुक्यात लोणी देवकर पंचक्रोशीत कायम वर्दळ असते. मात्र लोणी देवकर येथे लांब पल्ल्याच्या बहुतांशी एस टी बसेस थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

इंदापूर तालुक्यात लोणी देवकर गावासाठी एसटी प्रशासनाने अधिकृत थांबा दिला आहे. पण तरीही, अनेक जलद बसगाड्या या थांब्यावर थांबत नाहीत. अनेकदा इंदापूर बस स्थानका वरून लोणी देवकरला जायचे असल्यास काही वाहक प्रवाशांना घेऊन जाण्यास नकार देतात. अशा घटनांमुळे शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

यासोबतच प्रवाशांना पळसदेवचे तिकीट काढायला लावून वाहक अनेकदा बस लोणी देवकरमध्ये थांबवत नाहीत असेही प्रकार समोर आले आहे. यामुळे प्रवाशांना लोणी देवकरला न उतरता पुढे पळसदेवला जावे लागते. यानंतर पुन्हा परतीचा प्रवास करून लोणी देवकरला यावे लागते. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. यासोबतच, लोणी देवकर येथून जाणाऱ्या बहुतेक बसगाड्या सेवा रस्त्याचा (सर्व्हिस रोड) वापर न करता थेट उड्डाणपुलावरून जातात. यामुळेही महिला आणि वृद्धांना अडचणी येतात, कारण त्यांना उड्डाणपुलावर जावे लागते. त्यामुळे

लोणी देवकर गावातील नागरिक या गैरसोयीमुळे त्रस्त झाले आहेत. त्यांनी एसटी प्रशासना कडे यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, "नाद करती काय..." हा डायलॉग बसवर चांगला दिसतो, तो प्रवाश्यांना देखील आकर्षित करतो पण प्रवाशांची गैरसोय होत असेल तर त्या डायलॉगचा काय उपयोग अशी चर्चा लोणी देवकर पंचक्रोशीत रंगली आहे.

यामुळे एसटी प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेऊन लोणी देवकर येथील थांबा आणि सेवा रस्त्याचा वापर योग्य प्रकारे होत आहे की नाही, हे तपासणे गरजेचे आहे. तसेच, प्रवाशांना योग्य सेवा मिळेल याची खात्री करणे आवश्यक आहे. अन्यथा, "यावच लागतंय!!!" म्हणणाऱ्या प्रवाशांना प्रशासनाच्या अनास्थेमुळे इतर पर्यायांचा विचार करावा लागेल असा इशारा लोणी देवकर येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक जगताप यांनी प्रशासनाकडे केली आहे.

विशेष म्हणजे एस टी बसेस लोणी देवकर येथे थांबवण्यात याव्यात या साठी ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी आंदोलन केल्यानंतर बसेस येथे थांबू लागल्या मात्र आता अनेक वाहन चालक बसेस थांबवत नसल्याने ग्रामस्थांवर पुन्हा आंदोलनाची वेळ येऊ देऊ नये असा इशारा लोणी देवकर चे मा. सरपंच कालिदास देवकर यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा