उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
दैना शेतकऱ्याची
राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने शेतकऱ्यांचं जगणंच उद्ध्वस्त करून टाकलं आहे. मेहनतीने उभी केलेली उभी पिकं पाण्यात कुजली, फळं गळून पडली, भाजीपाल्याचा रेंदा झाला. गुर ढोरं मरून पडली वाहून गेली . काही ठिकाणी तर अख्खी दावन आडवी झाली , पिकासह माती वाहून गेली म्हणजेच काळी माय ज्याच्यावर शेतकरी जीवापाड प्रेम करतो ,जपतो राबतो सोनं पिकवतो तेच निसर्गाने हिसकावून घेतलं . शेतकऱ्याच्या डोळ्यातला विश्वास आणि कष्टाचं सोनं दोन्ही पाण्यात वाहून गेलं.स्वप्नच सारी वाहून गेली.
आज शेतकरी केवळ कर्जबाजारी नाही तर मानसिकदृष्ट्याही खचला आहे. बँकेचे हप्ते,वडील धाऱ्यांचे औषध गोळया,दवाखाना ,अपेक्षा लेकरांच्या शाळेचे पैसे आणि घरातील खर्च पोटातील आग या सगळ्या प्रश्नांच्या वादळात तो अडकला आहे भरडत आहे यातून आता बाहेर कसे पडणार हा प्रश्न त्याच्यासमोर आ वासून उभा आहे . सरकारची मदत कागदावरच दिसते ,विमा योजनांची दरे बंद केली जातात ,पुन्हा जिद्दीने हिमतीने पिकवल तर भाव मिळत नाही.मग शेतकऱ्याला वाटत , " मी शेतकरी आहे हा माझा गुन्हा आहे का ?
संकटाशी झुंजत तो पुन्हा तो उभा राहतो कारण त्याला माहित असते तो उभा नाही राहिला तर त्याचे कुटुंब कोलमडेल .या जलप्रकोपाने त्याला झुकवल आहे पण मोडलं नाही त्याचा आत्मविश्वास त्याच्या घामात आहे आणि त्याची जिद्द हेच खरं बळ आहे .या देशाच्या पाठीचा कणा मजबूत राहण्यासाठी भीक नको मदत हवी आहे .
भीक देण्याचे काम सरकारने करू नये हमी भाव द्यावा,निर्यातबंदी उठवावी.मदत ही प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यापर्यंत पोहचावी .मदत पोहोचायला उशीर लागतो. विमा योजना अनेकदा निरुपयोगी ठरतात.
पण हा प्रश्न फक्त शेतकऱ्याचाच नाही.शेतकरी वाचला तरच समाजाला भाकरी मिळेल . त्याने पिकवलच नाही तर ? हा विचार प्रत्येकाने करायलाच हवा . शेतकऱ्याचं नुकसान म्हणजे समाजाचं नुकसान आहे. कारण शेतकरी वाचला नाही, तर अन्नधान्य कमी होईल, महागाई वाढेल आणि अखेर उपासमारचं संकट उभं राहील.
म्हणूनच आता फक्त तोंडी सहानुभूती देऊन भागणार नाही.शेतकऱ्यांसाठी तातडीची मदत,
कर्जमाफी,
खऱ्या अर्थाने उपयोगी विमा योजना,
आणि हवामान बदल लक्षात घेऊन आधुनिक शेतीतंत्र या गोष्टींवर सरकारने त्वरीत पावलं उचलली पाहिजेत.
शेतकरी हा देशाचा कणा आहे. कणा तुटला तर देश उभा राहणार नाही. म्हणूनच आजच्या ओल्या दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्याला आधार देणं ही केवळ सरकारची नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. शेतकऱ्याचं दु:ख हे आपलंही दु:ख आहे – हे आपण सगळ्यांनी मनापासून मान्य केलं पाहिजे. शेतकऱ्याच्या भावना आणि दुःख कष्ट जाणून घेण्यासाठी राजकीय नेत्यांनी बांधावर न येता शेतात चिखलात जावून पहावे. तुटपुंज्या मदतीचे आश्वासन देण्यासाठी तर येवूच नये.
नूरजहाँ फकृद्दिन शेख
गणेशगाव
9146443282






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा