सहसंपादक- डॉ-संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9922419159
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचं प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांची आर्थिक सालचंदी धोक्यात आली आहे. राज्याच्या ६० वर्षाच्या काळात एवढी अतिवृष्टी झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून तो १५ वर्ष मागे गेला आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी आग्रही मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली.
विधिमंडळ पक्षनेते व आमदार जयंतराव पाटील, राज्याचे माजी मंत्री व पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रभारी हर्षवर्धन पाटील यांनी स्थानिक खासदार धैर्यशील मोहिते पाटील, स्थानिक आमदार अभिजित पाटील, स्थानिक आमदार नारायण पाटील यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा व इतरही नुकसानग्रस्त गावांची पाहणी करून बळीराजाला मानसिक आधार दिला.
यावेळी हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, राज्यातील २२ जिल्ह्यातील ७५ लाख हेक्टर क्षेत्र अतिवृष्टी मुळे बाधित असल्याचे दस्तरखुद सरकारचे म्हणणे आहे. आम्ही देखील सरकारमध्ये अनेक वर्ष काम केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रास्त समस्येवर राजकारण न करता त्यांना मदत मिळावी ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट खरीप हंगाम कर्जमाफी द्यावी, रब्बी हंगामासाठी नव्याने कर्ज द्यावे, शेती तील महत्त्वपूर्ण घटक असलेले पशुधन सांभाळण्यासाठी छावणी सुरू करण्याचा विचार करावा, गहू, हरभरा व इतर रब्बी पिकांसाठी सध्याचे निकष बाजूस ठेवून भरीव मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जयंत पाटील म्हणाले, बळीराजावर मोठं आर्थिक व मानसिक संकट ओढावले आहे, त्यांचा संसार पूर्णपणे उद्धवस्त झाला आहे. अशा स्थितीत बळीराजाला या संकटातून सावरण्या साठी आणि त्यांच्या व्यथा शासन दरबारी पोहोचवण्यासाठी आम्ही नेत्यांनी राज्यभरातील ‘नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा’ सुरु केला आहे. या माध्यमातून सर्वबाधित ठिकाणांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जात असून या अडचणीच्या काळात सरकारने शेतकऱ्यांना सरसकट भरीव मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शेतकऱ्यांनी सर्व आस्मानी आणि सुलतानी संकटावर मात करण्यासाठी सरकारने शाश्वत शेतीमाल विकास धोरण राबवावे अशी मागणी केली.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा