Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५

राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणूकांसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर झाल्याने --निवडणुकीचे वाजले बिगुल-- किंगमेकर लागले कामाला*


 

सहसंपादक- डॉ-संदेश शहा

टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9922419159

राज्यातील ३२ जिल्हा परिषद आणि ३३६पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकां साठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला आहे. आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक म्हणून निश्चित केला असून, याच तारखेस अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे.

त्यामुळे मिनी आमदारकीची समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र यामुळे मतदार राजाची दिवाळी चांगली होण्याचे संकेत आहेत.

या निवडणुकांसाठी दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी विभाग व गण निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून, यावर ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. अंतिम मतदार यादी तसेच मतदान केंद्रनिहाय यादी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रकाशित केली जाणार आहे. निवडणूक विभाग व प्रभागानुसार तयार होणाऱ्या मतदार याद्या विधानसभा मतदार संघातील यादीच्या आधारेच तयार केल्या जाणार असून यात मतदारांची नावे व पत्ते तशीच कायम ठेवली जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.



राज्य निवडणूक आयोग नवीन नावे समाविष्ट करणे, नावे वगळणे किंवा पत्त्यात दुरुस्ती करणे यासंबंधी कोणतीही कारवाई करत नाही. मात्र, लेखनिक त्रुटी, निवडणूक विभाग किंवा प्रभाग चुकून बदलणे, विधानसभा यादीत नाव असूनही स्थानिक यादीत न आढळणे अशा बाबींसंदर्भात प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांच्या अनुषंगाने दुरुस्त्या करण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान मिनी आमदारकीची समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती कडून इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे. विरोधी महाविकास आघाडीत देखील सर्व काही आलबेल नाही. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडी मध्ये काही जागांवर सहमती तर काही ठिकाणी बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत. भारतीय जनता पक्ष शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो मात्र या पक्षात खूप इन कमिंग झाली असल्याने या पक्षातच जास्त बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत. सत्ताधाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी तारले मात्र या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर ओल्या दुष्काळाचे सावट असून सरकार शेतकऱ्यांना कशी व कधी मदत करणार यावर जय पराजय अवलंबून आहे. मात्र पडद्यामागचे किंग मेकर सक्रिय झाले असून इच्छुक नेत्यांबरोबरच कट्टर कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. त्यामुळे राजकीय फिव्हर वाढत जाणार हे निश्चित असून बॉर्डरलाइन कार्यकर्ते व नागरिकांची दिवाळी चांगली जाणार असल्याची चिन्हे आहेत. यावेळी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे कौशल्य मात्र पणास लागणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा