कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी
मोबाईल नंबर 8378081147
----- परतीच्या पावसाने अखेर काढता पाय घेतला असून भिमा नदीतील उजनीचे पाणी कमी करण्यात आले असून नीरा नदीचेही पाणी वाहण्याचे मंदावले आहे. त्यामुळे भीमा नदीवरील तीन व नीरा नदीवरील दहापेक्षा अधिक बंधाऱ्यांची ढापे टाकून पाणी अडवण्यात यावे. अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे. अन्यथा वर्षभर पिकांना पाण्याविना जगवण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे.
भीमा नदीवरील भाटनिमगाव, टणू, नरसिंहपूर तर नीरा नदीवरील संगम, गिरवी, ओझरे, लुमेवाडी, अकलाई, सराटी, निरनीमगाव, भगतवाडी, निरवांगी, खोरोची आदीसह बंधाऱ्यांना ढापे टाकण्यात आली नसल्यामुळे पाणी वाहून चालले आहे. जलसंपदा विभागाच्या शासकीय नियमानुसार प्रतिवर्षी पावसाळ्याच्या अखेरीस १८ ऑक्टोबरच्या दरम्यान नदीवरील सर्व बंधाऱ्यांना ढापे टाकून पाणी अडवण्याचा नियम आहे. परंतु ऑक्टोबर महिन्यातील पंधरवडा संपत आला असतानाही अद्यापि ढापे टाकण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पाणी वाहून जाऊन बंधारे रिकामे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भीमा नदीच्या काठावरील इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव, भाटनिमगाव, भांडगाव, बावडा, शिंदेवस्ती, गणेशवाडी, पिंपरी बुद्रुक, टणू, आढोबावस्ती व नरसिंहपूर तर माढा तालुक्यातील शेवरे, चांदज, टाकळी, गाराअकोले, आलेगाव, रुई तसेच नीरा नदीवरील इंदापूर तालुक्यातील नरसिंहपूर, गिरवी, ओझरे, पिंपरी बुद्रुक, लुमेवाडी, गोंदी, सराटी, निरनीमगाव, भगतवाडी, पिठेवाडी, चाकाटी, निरवांगी, खोरोची तर माळशिरस तालुक्यातील संगम, तांबवे, गणेशगाव, माळीनगर, सवतगाव, अकलूज, आनंदनगर, चाकोरे आदी गावातील शेती क्षेत्र भिजत असून जर पाणी अडवण्यात आले नाही. तर आगामी वर्षभराच्या काळात शेती पाण्याअभावी उजाड बनवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावर्षीच्या पावसामुळे नीरा नदीवरील गिरवी व ओझरे बंधाऱ्याची अतिवृष्टीच्या पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले होते. तसेच दोन वर्षांपासून बंधाऱ्यात नादुरुस्तीमुळे पाणी अडवण्यात आले नसल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. चालू वर्षीही पाऊस काळ चांगला झाला असून पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. आता फक्त बंधारेची ढापे टाकून पाणी अडवणे गरजेचे असल्याचे केशव बोडके, संतोष सुतार शेतकऱ्यांनी सांगितले.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यामध्ये लक्ष घालून नीरा व भीमा नद्या वरील बंधाऱ्यांना ढापे टाकण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी महादेव घाडगे, संग्रामसिंह पाटील, रणधीर मोहिते, केशव बोडके, विक्रम मोहिते, नितीन सरवदे, दादा क्षिरसागर, ताजुद्दीन शेख, राहुल बागल, नवनाथ माहिते, राजू बळवंतराव, फणिंद्र कांबळे, अशोक बोडके, नंदकुमार शिंदे, शशिकांत सुर्यवंशी आदि शेतकरी व नागरिकांनी केली आहे.
फोटो - नरसिंहपूर ( ता. इंदापूर ) येथील नीरा नदीवरील बंधारा ढापे टाकली नसल्याने पाणी वाहून चालल्याचे दिसत आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा