Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

आधुनिक शेतीतील भरीव योगदानाबद्दल :धुळाभाऊ केरू कोकरे' हे पुणे येथे "अहिल्यारत्न" पुरस्काराने सन्मानित


 

सहसंपादक- डॉ-संदेश शहा

टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:-- 9922419159

उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील कुगाव (कुर्मग्राम) या बेटावरील शेतकरी धुळाभाऊ केरू कोकरे यांना पुणे येथे संपन्न झालेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय धनगर अधिवेशनामध्ये आधुनिक शेतीतील भरीव योगदानाबद्दल अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुणे येथे सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य मार्फत आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात “आधुनिक शेती” या श्रेणीत धुळाभाऊ कोकरे यांना मा. खासदार विकास महात्म्ये, मा. खासदार प्रकाश आंबेडकर तसेच पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्या हस्ते अहिल्यारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी आमदार रामराव वडकुते व विजयराव मोरे, आयकर विभाग आयुक्त नितीन वाघमोडे, राज्याच्या महिला व बालकल्याण विभाग आयुक्त नयना गुंडे, प्रा. यशपाल भिंगे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शशिकांत तरंगे, कैलास बोंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

धुळाभाऊ कोकरे

यांनी परंपरागत शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ग्रामीण भागात एक नवा आदर्श उभा केला आहे. त्यांनी पारंपरिक शेतीची मर्यादा ओळखून आर्टिफिशियल इंटेलिजन्स व स्मार्ट फार्मिंग तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू करून फायद्याची शेती सुरू केली आहे. त्यांच्या शेतात स्मार्ट सिंचन प्रणाली कार्यरत असून जमिनीतील आर्द्रता, हवामान व पोषण द्रव्यांचे मापन सेन्सरद्वारे केले जाते. एआय आधारित डेटा अ‍ॅनॅलिटिक्स च्या साहाय्याने पिकांचे आरोग्य, उत्पादनक्षमता व बाजारभावाचा अंदाज लावून नियोजन केले जाते. त्यामुळे पाण्याची बचत, खर्चावर नियंत्रण आणि उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. धुळाभाऊ कोकरे यांनी निर्यातक्षम केळी लागवडीचे उत्तम उदाहरण साकारले आहे. केळी लागवडीत टिश्यू कल्चर रोपे, ड्रिप सिंचन, फर्टिगेशन तंत्र, आणि एआय मॉनिटरिंग सिस्टम चा वापर करून त्यांनी गुणवत्तापूर्ण निर्यातक्षम उत्पादन मिळवले आहे. त्यांच्या शेतातील केळीचे उत्पादन आखाती देशांमध्ये व महानगरांमध्ये निर्यातीसाठी योग्य दर्जाचे ठरले आहे. उत्पादन, पॅकिंग व बाजारपेठेपर्यंत सर्व टप्प्यांत त्यांनी शिस्त, गुणवत्ता व नवकल्पनांना प्राधान्य दिले आहे. उजनी बॅकवॉटर काठच्या सुपीक पण आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीत त्यांनी शेतीला पर्यटन व शिक्षणाचा संगम करून दिला आहे. विद्यार्थ्यांना, कृषी संशोधकांना व नवीन पिढीतील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचे शिवार हे उत्तम प्रयोगशाळा बनले आहे. विज्ञान, संस्कार आणि स्वाभिमान केंद्रबिंदू मानून त्यांनी शेतीचे व्यावसायिक सादरीकरण करून या अभिमानास्पद व्यवसायाचा दर्जा उंचावला आहे. त्यामुळे

धुळाभाऊ कोकरे यांचा हा सन्मान त्यांच्या प्रगतशील विचारसरणीचा, ग्रामीण नवकल्पकतेचा आणि समाजात परिवर्तन घडविण्याच्या कार्याचा गौरव आहे. "आपण बदललो तर शेती बदलते, आणि शेती बदलली तर देश बदलतो तसेच शेतकरी सुखी तरच जग सुखी या विचारावर चालणारे धुळाभाऊ कोकरे आजच्या ग्रामीण भारतातील आधुनिक शेतीचे आदर्श उदाहरण ठरले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा