Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

इंदापूर बस स्थानकावर मध्यरात्री एसटीला आग....* *आगीचे कारण अस्पष्टच सुदैवाने जीवितहानी नाही मात्र* *एसटी बससह प्रवाशांचे सामान जळून खाक


 

कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी 

मो.8378081247

सहसंपादक --संदेश शहा

मो:-9922419159

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इंदापूर शहरातील बस स्थानकावर प्रवासी घेऊन आल्यानंतर उभे असलेल्या बसने अचानक पेट घेतला. यावेळी प्रसंगावधान राखत प्रवासी बस मधून बाहेर आले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण बस जळाली यामुळे बसचे पूर्णपणे नुकसान झाले.

   याबाबत अधिक माहिती अशी की, बस (क्रमांक एम एच 20 बी एल 4233) ही धाराशिव पुणे बस मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास इंदापूर बस स्थानकाच्या फलाट क्रमांक 11 वर आली. याच वेळी बस ने अचानक पेट घेतला. इंधन गळतीमुळे बसला अचानक आग लागल्याचे बोलले जात आहे. ज्यावेळी आग लागली त्यावेळी बस मध्ये जवळपास 50 प्रवासी होते त्यामुळे अचानक एकच गोंधळ उडाला प्रवाशांनी कसाबसा आपला जीव वाचवला. मात्र या आगीत बस आणि प्रवाशांच्या साहित्याचे पूर्णपणे नुकसान झाले. अशी प्राथमिक माहिती असून याबाबत इंदापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्याबाबत पुढील प्रक्रिया सुरू आहे. 

    धाराशिव स्वारगेट ही बस धाराशिव येथून ११ वाजता निघून दोन वाजता इंदापूर बसस्थानकावर पोहोचली त्यावेळी चालक गाडी नोंदवण्यासाठी बस चालू ठेवूनच खाली उतरला होता. त्यावेळी काही प्रवासी खाली उतरले होते तर काही गाडीतच बसून झोपलेले होते. त्यावेळी डिझेल जळण्याची वास येत असल्याचे गाडीतील प्रवाशांच्या लक्षात आले. त्यावेळी अचानक बसने पेट घेतल्याचे प्रवाशांना समजताच जिव वाचवण्याच्या हेतूने कोणी दारातून कोणी खिडकीतून बाहेर पडले. पण बसने पेट घेतल्याने बस व प्रवाशांचे सामान जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले. 

     इंदापूर बस स्थानक व जळालेल्या बसमध्ये आग विझवण्यासाठी कोणतेही उपकरण नसल्यानेच आगीत बस जळून खाक झाली आहे. त्यानंतर इंदापूर नगरपरिषदेची आग विझवण्याची गाडीला पाचारण करण्यात आले परंतू तोपर्यंत बस जळून खाक झाल्याचे प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितले.

      पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून रोज पाचशे पेक्षा जास्त एसटी बसेस या स्थानकातून ये जा करतात मात्र बस स्थानकात बस पेटून भस्मसात होण्याचा प्रकार प्रथमच घडला त्यामुळे बस स्थानकात अग्निशमक बंब असणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया प्रवाशातून व्यक्त होत आहे.

--------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा