सहसंपादक- डॉ-संदेश शहा
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9922419159
भारतीय ज्ञान परंपरा ही जगाला दिलेली अनमोल देणगी असून हे ज्ञान भावी पिढ्यांसाठी दिशादर्शक आहे असे प्रतिपादन खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे
अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले.
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय ( स्वायत ) खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने "भारतीय ज्ञान परंपरा आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०" या विषयावर चर्चासत्राचे आयोजन टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सभागृहात संपन्न झाले.
अध्यक्ष श्री. गोयल पुढे म्हणाले, शिक्षण म्हणजे राष्ट्रनिर्मितीचे सर्वात प्रभावी साधन असून त्यातूनच नवा, सक्षम आणि जागतिक भारत निर्माण होणार आहे. भारतीय ज्ञान परंपरा ही केवळ भूतकाळाची शान नसून भविष्यातील पिढ्यांसाठी दिशादर्शक दीपस्तंभ आहे.
यावेळी दिल्ली येथे झालेल्या पॅरा योगासन राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक संपादन करणाऱ्या दिया जासूद या विद्यार्थिनीचा अध्यक्ष कृष्णकुमार गोयल व जेष्ठ विधीतज्ञ ॲड. एस. के. जैन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या चर्चासत्रात विविध महाविद्यालयाच्या ३७ प्राध्यापकांनी भाग घेतला.
यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ व खडकी शिक्षण संस्थेचे मानद अध्यक्ष ॲड. एस. के. जैन म्हणाले, भारतीय ज्ञान परंपरा समृद्ध असून या विषयास अनुसरून विद्यार्थी व शिक्षकहित केंद्रबिंदू मानून खडकी शिक्षण संस्था कार्य करत आहे. याचा सार्थ अभिमान आम्हा सर्वांना आहे.
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. धोंडीराम पवार यांनी भारतीय ज्ञान परंपरा आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याची दिशा व आव्हाने याविषयी मनोगत व्यक्त केले.
व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते तथा बीएमसीसी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत साठे म्हणाले, भारतीय संस्कृती ही प्राचीन काळापासून ज्ञान, तत्त्वज्ञान, विज्ञान आणि मूल्यांनी समृद्ध परंपरा असून योग, आयुर्वेद, गणित, खगोलशास्त्र यांसारख्या अनेक मौल्यवान देणग्या भारताने जगाला दिल्या आहेत. या देणग्या इतिहासा पुरत्या मर्यादित नसून त्या आज देखील मानवजातीला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे भारतीय ज्ञान परंपरेला आजच्या पिढ्यांनी आत्मसात करून भविष्याशी नाळ जोडणे आवश्यक आहे.
यावेळी संस्थेचे सचिव आनंद छाजेड, संस्थेचे पदाधिकारी रमेश आवस्थे, डॉ. काशिनाथ देवधर, ज्ञानेश्वर मुरकुटे, सुधीर फेंगसे हे मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषणात महाविद्यालय प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध नवीन उपक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी सूत्रसंचालन केले. आभार उपप्राचार्य प्रा. राजेंद्र लेले यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव रोकडे, उपप्राचार्या डॉ. सुचेता दळवी, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक लक्ष्मण डामसे, प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा