Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५

अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात कृष्णप्रियोत्सव -२०२५ ला उत्स्फूर्त प्रतिसाद कला विज्ञान सांस्कृतिक मेजवानीतून विद्यार्थी प्रतिभेचे दिमाखदार सादरीकरण सांस्कृतिक कार्यक्रम सर्जनशीलतेचे खरे शिल्पगृह-- डॉ. शिवाजी शिंदे

 अकलूज ---प्रतिनिधी 

  कादरभाई   शेख 

टाइम्स 45 न्यूज मराठी



सदाशिवराव माने विद्यालयात दि. २० व २१ नोव्हेंबर कालावधीत आयोजित केलेल्या वार्षिक ‘कृष्णप्रियोत्सव- २०२५’ या कार्यक्रमाचे उदघाट्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूरचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी शि.प्र. मंडळाचे संचालक उत्कर्ष शेटे, प्रशाला समितीचे सदस्य ॲड.रणजितसिंह माने-देशमुख, मुख्याध्यापक अमोल फुले सर, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा गायत्री शेटे, परीक्षक एस.एम. शिंदे, एस.एस. भोसले, रमाकांत साठे, दीपक साळुंखे, पत्रकार शशिकांत कडबाने, लक्ष्मीकांत कुरुडकर, विद्यार्थी प्रतिनिधी कीर्ती कदम, श्रेया देशमुख उपस्थित होते. 



प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक अमोल फुले सर यांनी विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या शालेय व सहशालेय उपक्रमांची माहिती दिली. विद्यालयाची यशोगाथा सांगताना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक कामगिरीचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी ‘कृष्णप्रियोत्सव’ हे व्यासपीठ कसे उपयुक्त ठरते, यावर त्यांनी भर दिला.


अध्यक्षीय मनोगतातून डॉ. शिवाजी शिंदे यांनी विद्यालयाच्या शिस्त, प्रगती, नवकल्पना आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. स्नेहसंमेलन हे कलाकारांना संधी देणारे खरे व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्याच्या काळात सुसंस्कारीत पिढी घडविण्याचे आव्हान असून शिक्षणामधूनच समाज जागृत होणार आहे. आज सर्वत्र कौटुंबिक, सामाजिक विसंवाद निर्माण झाला असून सुसंवादाची गरज असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुलांनी स्वतःची इमेज स्टेटसवर ठेवण्यापेक्षा इमेज तयार करण्याचा सल्ला दिला.



यानंतर सकाळ सत्रात विद्यार्थ्यांच्या सृजनशिलतेला वाव देण्यासाठी त्यांच्या कल्पक विचारातून निर्माण केलेल्या चित्रकला, कृषी, विज्ञान, रांगोळी, पुष्परचना व भित्तीपत्रक या कला दालनांचे उदघाट्न मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रदर्शनात विद्यालयातील एकूण ५३२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या कौशल्याचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेली विविध उपकरणे व कला पाहून उपस्थित सर्व मान्यवर, परीक्षक देखील भारावून गेले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.

या विशेष प्रसंगी विद्यालयातील मनमाड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत उज्वल यश संपादन केलेल्या खेळाडूंचा, राज्यस्तरीय चालण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थाचा व इन्स्पायर अवॉर्ड मध्ये निवड झालेल्या विद्र्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला



यानंतर दुपार सत्रात स्मृती भवन येथे आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाट्न  शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक नारायण फुले व महादेव अंधारे, परीक्षक ज्ञानेश्वर शेलार, रात्र प्रशालेचे मुख्याध्यापक संजय मुंगसे, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. रंगमंच पूजनानंतर इ. ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांची १५ बहारदार गीते सादर झाली. यामध्ये गणेश वंदना, वारकरी, शेतकरी, देशभक्तीपर, बॉलीवूड, खंडोबा, चित्रपट, आदिवासी, गोंधळी आणि कोळी गीतांची मनमोहक मेजवानी झाली.

स्पर्धेचे गटवार निकाल- 

गट क्रमांक १-(इयत्ता ५ वी-६ वी)

प्रथम- ६ वी इ,फ- कोळी गीत, द्वितीय- ६ वी क,ड- वाघ्यामुरळी गीत, तृतीय- ६ वी अ, ब -महाराष्ट्र गीत 

गट क्रमांक २ (इयत्ता ७वी ते ८ वी)- प्रथम- (विभागून)- ७ वी क,ड- चित्रपट गीत, ८ वी अ,ब - आदिवासी गीत 

या विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि उत्साह झळकत होता.


या दोन्ही कार्यक्रमास शालेय विविध समित्यांचे सदस्य, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेत्तर, पालक व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अनुराधा निंबाळकर व प्रतिभा राजगुरू, कृष्णा सरवदे, शैलेश माने पाटील यांनी तर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. तर आभार उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे यांनी मानले. अशाप्रकारे पहिल्या दिवसाची यशस्वी सांगता झाली.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा