संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे. मात्र, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते आपआपल्या पक्षांची मोर्चे बांधणी करत आहेत. यातच काँग्रेस पक्षाने मोठी घोषणा करत मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा आहे. मात्र, काँग्रेसच्या या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेसवर नाराज आहेत का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे, त्याबाबतची घोषणा काँग्रेसने केली आहे, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे आणि माझा पक्ष स्वतंत्र आहे”, असं एका वाक्यात उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं.
महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर?
काँग्रेसच्या निर्णयामुळे महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आहे का? असा प्रश्नही पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “खरं तर फुटीच्या उंबरठ्यावर हा शब्द जरा विचित्र आहे. पण त्यांचा (काँग्रेस) पक्ष निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे आणि माझा पक्ष निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची चेन्निथलांची घोषणा
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. २२७ जागांवर काँग्रेस पक्ष निवडणूक लढणार आहे. आमच्या पक्षाची जिल्हा काँग्रेस कमिटी, ब्लॉक काँग्रेस कमिटी आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांची हिच इच्छा आहे की आम्ही स्वबळावर निवडणूक लढवली पाहिजे. त्यामुळे आम्ही महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आहोत”, असं रमेश चेन्निथला यांनी म्हटलेलं आहे.
स्वबळावर निवडणूक लढवण्याचं कारण काय?
रमेश चेन्निथला यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की महापालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचं कारण काय आहे? यावर रमेश चेन्निथला यांनी म्हटलं की, “स्थानिक पातळीवरील निवडणुका आहेत, त्यामुळे आमचे कार्यकर्ते जे बोलत आहेत, त्यांची जी इच्छा आहे, तो निर्णय आम्ही घेतला आहे. काहीही अडचण येणार नाही, येणाऱ्या दिवसांत आम्हाला आमचा पक्ष आणखी मजबूत करायचा आहे”, असं रमेश चेन्निथला यांनी सांगितलं.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा