*संपादक -*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
वटवृक्षाखाली झाडंझुडपंच नव्हे तर गवताच्या काडीलाही उगवण्याची शामत नसते. तरीही महाराष्ट्रात नव्वदीच्या दशकानंतर राजकारणात हिमतीवर स्वत:चे नाव कोरणारा एक बहाद्दर गडी खुद्द बारामतीतूनच उदयाला यावा? त्याने थेट आपल्या वस्तादापुढेच दोन कडक शड्डू ठोकावेत? आणि बघता बघता तेल लावलेल्या वस्तादांच्या वस्तादाला चारीमुंड्या चीत करावे? याला काय म्हणावे?
नव्वदीच्या दशकात शरद पवार यांचे पुतणे म्हणूनच महाराष्ट्राच्या विधिमंडळात, मंत्रिमंडळात अजित पवार आले. तत्पूर्वी पवारांच्या पश्चात बारामती विधानसभा मतदारसंघातील कामे ते करायचे. पवार राज्यभर फिरायचे, पण बारामतीची फारशी चिंता त्यांना नसायची. राजीव गांधींच्या हत्येनंतर पवारांना दिल्लीच्या राजकारणाचे वेध लागले तसे अजित पवार विधिमंडळ आणि मंत्रालयाच्या सेवेत रुजू झाले. राज्याची सूत्रे पवारांनी सुधाकरराव नाईक यांच्याकडे सोपविली होती. मुख्यमंत्री म्हणून सुरुवातीला मोठ्या तडफेने ते राज्य करत होते. सत्तेच्या राजकारणाच्या सारीपटावरील सोंगट्या नेमक्या ठिकाणी कशा हलवायच्या या खेळात ते माहीर होते. शिकार टप्प्यात आल्यावरच बार उडवायचा, हे राजकीय शहाणपण त्यांच्याकडे होते. पण पुढे त्यांनीच या तत्त्वाला हरताळ फासला. नाईक तसे अल्पावधीत लोकप्रियही झाले होते. साहेब दिल्लीला गेले म्हटल्यावर त्यांचे राजकीय वारस म्हणून अजित पवार राज्याच्या राजकारणात आले. नाईकांच्या मंत्रिमंडळात ते कृषी आणि ऊर्जामंत्री होते.
अजित तसे फारसे कुणाच्यात मिसळायचे नाहीत. घडाघडा बोलायचेही नाहीत. विधिमंडळातील उत्तरेही जेवढ्यास तेवढी. सतत मूग गिळून असायचे. कदाचित नवखेपणामुळे भिडस्तही असावेत. तथापि, आमच्या दृष्टीने ते एक वशिल्याचे तट्टू होते. पण नाईक त्यांना सारखे अजितदादा अजितदादा करायचे. नाईकांना एकदा विचारले,''तुम्ही काय सारखे अजितदादा अजितदादा काय करता? त्यांना तर कशातलेच फारसे काही समजत नाही.'' तेव्हा नाईक म्हणाले, ''तुम्ही चूक करताय. माणूस अभ्यासू आहे. मेहनती आहे. आणि प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेणारा आहे. सुरुवातीच्या नवखेपणावर तुम्ही जाऊ नका.'' नाईकांचे म्हणणे फारसे मनावर घेतले नाही. त्यांच्या नेत्याच्या पुतण्याबद्दल ते असेच बोलणार, असे वाटले. नाईक माणसे वाचण्यात चुकत नव्हते. पण त्यांचेही कान नरसिंह रावांनी इतके भरले की ते पवारांच्या विरोधातच शड्डू ठोकायला लागले. तो अर्थात एक वेगळा किस्सा आहे.
नव्वदीच्या दशकात देशाच्या क्षितिजावर हिंदुत्वाचे राजकारण घोंगावत यायला लागले होते. यात बाबरी मशीद पाडल्यानंतर पहिला बळी गेला तोच सुधाकरराव नाईक यांचा. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे हा हिंदुत्वाचा आक्रमक ऐरावत राज्यातील काँग्रेसच्या तटबंदीला जबर तडाखे देत होता. विधिमंडळात आणि बाहेर शरद पवार मोठ्या ताकदीने या टोळधाडीचा सामना करत होते. याच कसोटीच्या काळात थोरल्या पवारांनी अनेक दूरगामी आणि ऐतिहासिक निर्णय घेतले. पण हिंदुत्वाचे वादळ दिवसागणिक नेटाने पुढे येत होते. यात काँग्रेसचे अनेक ढुढ्ढाचार्य निष्प्रभ आणि निस्तेज होऊन काळाच्या पडद्याआड गेले. नरसिंह राव तसे संघपरिवाराशी संधान बांधून होते. त्यामुळे ते आपला कार्यकाळ कसाबसा पूर्ण करू शकले. पण महाराष्ट्रात पवार एकहाती किल्ला लढवत असल्याने तेही चांगलेच जायबंदी झाले.
तथापि, या काळात पवारांनी पक्षाच्या राजकारणात राज्यभरातील तरुण रक्ताला वाव दिला. छगन भुजबळ त्वेषाने लढत होते. त्यांच्या मागे आर. आर. पाटील, दिलीप वळसेपाटील, जयंत पाटील, अशांत टापूतील दिलीप सोपल आणि तत्सम ताज्या रक्ताची कुमक होती. अजित यांचा सहभाग यांच्यातच असायचा. ते पुढे नसायचे. पण या तरुणाईत त्यांची भीड चेपत गेली. राज्यात युतीचे सरकार येण्याआधी आणि नंतर पवारांच्या नेतृत्वाखाली अनेक राजकीय उलथापालथीत त्यांनी सगळे बारकावे, कंगोरे न्याहाळले. माणसे हेरली. राजकीय व्यवहार जातीने पडताळून घेतले. दिल्ली, महाराष्ट्र, देशाचे राजकारण, अर्थकारण, काँग्रेस आणि काँग्रेसेतर पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना, त्या अनुषंगाने झालेल्या घडामोडी, हल्ले प्रतिहल्ले, राजकीय नेते त्यांच्यातील संबंधाचे बारकावे, याचे दैनंदिन शिक्षण आधी रामालय आणि नंतर सिल्व्हर ओकच्या तालमीत सुरू होते. त्यामुळे अजित पवार नामक दादा या पडत्या काळात राजकीय आखाड्यात उतरण्यासाठी तयार झाला नसता तरच नवल.
ते पवारांचे लाडके पुतणे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वाची उतरंड त्यांनी जाणीवपूर्वक जोपासली. 'प्रोटोकॉल' सांभाळले. तरुण नेतृत्वामध्ये त्यांचे आर. आर. पाटील यांच्याशी विशेष सख्य होते. आर. आर. तसेच वळसेपाटील यांचे माध्यमांशी चांगले संबंध असायचे. त्यामुळे अजितही थोडेफार पत्रकारांशी नमस्कार-चमत्कार करायला लागले. पण ते तेवढ्यापुरतेच. अगदी नावाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पक्षाच्या कामात ते अधिक लक्ष घालायला लागले. नव्याण्णव साली राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना खर्या अर्थाने सूर सापडला. विलासराव मुख्यमंत्री होते आणि राष्ट्रवादीची तरुण फळी आक्रमक होती. भुजबळ उपमुख्यमंत्री असले तरी नंतर ते अडचणीत येत गेले. त्याला तेही काही प्रमाणात कारणीभूत होते. आरआर यांचे नेतृत्व आणि अजितदादांची मेहनत प्रशासकीय कौशल्य याच काळात बहरत गेले. २००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर तर राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. आरआर आणि अजितदादा यांच्यातच स्पर्धा होती. त्यातही अजित यांची पक्षावर मोठी पकड निर्माण झाली. आमदार आणि कार्यकर्त्यांत ते सर्वाधिक लोकप्रिय होते. आरआर यांची लोकांत स्वच्छ प्रतिमा होती. मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे चालून आले होते.
पण राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:हून हे पद नाकारले. त्याबदल्यात केंद्रात महत्त्वाची आणि जास्तीची खाती स्वत:कडे घेतली. यात प्रफुल पटेल यांच्याकडे 'सिव्हिल एव्हिएशन' हे महत्त्वाचे खाते आले. शिवाय, स्वतंत्र कारभारदेखील. चांदीच चांदी. सूर्यकांता पाटील मंत्री झाल्या. पवारांकडे शेतीसंबंधित सगळी खाती आली. काँग्रेस पक्षाबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करणे हा एक उद्देश होता. तो कितपत सफल झाला हा संशोधनाचा विषय. पण संख्याबळाने राज्यातील मोठ्या पक्षाकडे दुय्यम भूमिका आली. शिवाय, अजित राजकारणात पहिल्यांदा दुखावले गेले. अगदी जिव्हारी. अजितऐवजी आर.आर. उपमुख्यमंत्री झाले. अजितना उपमुख्यमंत्री व्हायचेच नव्हते. 'उपमुख्यमंत्री कधीच मुख्यमंत्री होत नाही', असे ते म्हणायचे. महाराष्ट्रात तशीच स्थिती होती. पण अखेर राजकीय फासे असे काही पडत गेले की तीच उपमुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडत गेली. एकदादोनदा नव्हे तर सलग सहा वेळा. मग अजितदादा अधिक मोकळे झाले. बेदरकार झाले. कामाचा झपाटा तसाच होता, पण 'हर फिक्र को धुएँ मे उडाता चला गया', असाच दादांचा खाक्या राहिला. भाषणे करताना, लोकांशी बोलताना बेदरकार झाले. त्यातून ते अधिकच लोकप्रिय होत गेले. माणसात सच्चेपणा असला की लोकांना कशाचंही अप्रूप वाटायला लागते. तशात लोकांची कामे तत्परतेने करत. नसेल होत तर थेट नाही होत म्हणून सांगत. हेही लोकांना आवडायचे. काम करण्याचे व्यसनच त्यांना जडले होते. गडी पहाटे पाचपासूनच कामाला लागायचा. सकाळी सहाच्या ठोक्याला लोकांना भेटायचा. आठ वाजता मंत्रालयात हजर. जेव्हा मंत्रीसंत्री आपल्या लवाजम्यासह डेरेदाखल व्हायचे तेव्हा दादा घराकडे किंवा दौर्यावर गेलेले असायचे. अधिकारी, माणसे, कार्यकर्ते या अडनाड माणसाशी जुळवून घ्यायचे. हूं की चू न करता.
राष्ट्रवादीची दैनंदिन सूत्रे अजितदादांकडेच आली होती. ते पक्षासाठी पैसे आणायचे. खर्चही तेच करायचे. बाकीचे मंत्री पुढारी माया सांभाळत बसायचे. पक्षात काहीही अडले-नडले की दादांशिवाय पर्यायच नव्हता. उपमुख्यमंत्री कोणीही असो. खर्चाला दादा. अन् मग बाकीच्यांचे खाजगीत पालुपद, 'अहो पक्षच त्यांचा आहे ना!' जसंकाही पक्ष यांचा असता तर यांनी भरभरून खर्च केला असता. विधिमंडळाचा सुवर्ण महोत्सव सुरू असताना गणपतराव देशमुखांनी आर्थिक पाहणी अहवालाचा हवाला देत राज्यातील सिंचनावरील खर्चाचा आणि ओलिताखाली आलेल्या जमिनीचा प्रश्न उपस्थित केला. सिंचनावरील खर्च सत्तर हजार कोटी. पण प्रत्यक्षात ओलिताखालील जमिनीचे प्रमाण केवळ एक-दीड टक्का. हे त्यांनी आर्थिक पाहणी अहवालाचा हवाला देऊन सांगितले. वास्तविक पाहता आर्थिक पाहणी अहवालात सिंचनाखालील क्षेत्र किती याची माहितीच वर्षानुवर्षे भरलेली नाही. ही मोठी प्रशासकीय चूक होती. अजूनही ती चूक तशीच ठेवण्यात आली आहे. शिवाय, सत्तर हजार कोटी रुपयांचा खर्च हा कोयना धरणापासूनचा आहे. त्यानंतर छोटीमोठी शेकडो धरणे झालीत. कालवे निघाले. या खर्चात कर्मचार्यांचे पगारही आहेत. याचा विचार गणपतरावांनीही केला नव्हता. त्यांनी ती त्रुटी लक्षात आणून दिली इतकेच. पण भाजपवाल्यांनी त्यावर रान उठविले. एकनाथ खडसेंनी दे दणादण आरोप केले. मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण होते. त्यांनी चौकशीचे आश्वासन दिले. अजितदादांनी सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार केला एवढाच प्रचार सुरू झाला. गृहमंत्री आर. आर. पाटलांनी चौकशीच्या फायलीवर गुपचूप सही केली. पोलिसांनी गुपचूप चौकशीही केली. त्यातून निघाले काहीच नाही. पण अजितदादांच्या मागे सत्तर हजार कोटींचे शुक्लकाष्ट लागले. तेव्हापासून ते आजतागायत. अगदी अलीकडे तर पंतप्रधानांनीही तोच आरोप केला होता.
त्या आरोपामुळे नाही म्हटलं तरी दादा खचले. आरआरना ते मित्र मानायचे. त्यांनीही गुपचूप चौकशीच्या फायलीवर सही केली. हे त्यांच्या जिव्हारी लागले. पण तरीही त्यांनी आरआर यांच्याविषयी ब्र काढला नाही. ही मोठी गोष्ट आहे. मधल्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत असताना उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी चोख कामगिरी बजावली. उद्धव यांना राज्य चालविण्याचा अनुभव नव्हता. पण दादांनी ती भूमिका उत्तम वठवली. शिवाय, आपल्या कामाचा दूरान्वयेही उल्लेख केला नाही, हे विशेष. पुढे ७० हजार कोटींच्या आरोपांपाठोपाठ दादांच्या सगेसोयर्यांवर धाडी पडायला लागल्या. तेव्हा ते खचायला लागले. पक्षातील काही बड्या नेत्यांना भाजपबरोबर जायचे होते. त्यांना घेऊन दादांनी भाजपशी म्होतूर बडवला, हे खरे आहे. पण या बळजबरीच्या संसारात ते फारसे रमले नाहीत. भाजपच्या सर्वशक्तिशाली बरोबर असतानाही काहींना शरद पवारच जवळचे वाटतात. शिवाय, राज्याच्या निवडणुकांत झालेला दारुण पराभव अनेकांना डाचतोय. त्यांची कौटुंबिक नाळही भलतीच घट्ट आहे. त्यामुळेही गेले काही महिने राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. अजित यांनी पवारांशी दोन हात करून त्यांच्यावर मात केली ही वस्तुस्थिती आहे. अजित बाहेर पडले नसते तर पटेल, भुजबळांना कोणीही विचारले नसते.
कर्हेतून इतके पाणी वाहून गेल्यावर अजित पवार तरी पक्षाला कसे एकत्र आणू शकले असते, असा प्रश्न आहे. फाटाफूट आणि पराभव या पार्श्वभूमीवर हा पक्ष एकत्र येईल की एकत्र येताना आणखी फाटाफुटी होतील, हे काहीच सांगता येत नाही. ज्यांच्या दिशा परस्परविरुद्ध आहेत ते खरोखर एकत्र येतील? त्यामुळे भाजपच्या बरोबर जाऊन समाधान नाही, हे खरे असले तरी एकत्र आल्यावर नेतृत्व कोणी करायचे हाही प्रश्न आहे. शरद पवार आज थकले आहेत. तरीही ते सतत दौरे करतात. कार्यकर्त्यांना भेटतात. त्यांनी आता अजितदादांची जबाबदारीही सांभाळावी, अशी अपेक्षा कशी करणार? सुप्रियाताई तशा संसदेत उत्तम कामगिरी बजावत आहेत. शिवाय, ते विश्वही त्यांना साजेसे आहे. तिथे त्या रममाण आहेत. आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांत कमालीचे पोरकेपण आले आहे. पवार कितीही थकले असले तरी त्यांचा कार्यकर्त्यांना आधार वाटतो. पण अजित पवार यांच्या जाण्याने थोरले पवार असतानाही दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना पोरके वाटावे, ही विलक्षण गोष्ट आहे. अजितदादांच्या अकाली मृत्यूने राष्ट्रवादीच्या भवितव्याबाबतच प्रश्न उभे केले आहेत. या पक्षापुढे, नेत्यांपुढे, कार्यकर्त्यांपुढे इतकेच नव्हे तर पवार कुटुंबापुढे कठीण काळ उभा आहे,
हेच खरे!




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा