*इंदापूर, डॉ. संदेश शहा*
*टाइम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. 9922419159*
सध्या तुम्ही आम्ही सर्व जीवन चक्रव्यूहात अडकलो असून त्यामुळे आपल्या जीवनातील आनंद हरपला आहे. त्यामुळे चक्रव्यूह भेदण्यासाठी
बाह्यजगतातील पद, प्रतिष्ठा, पैसा, समाजाने केलेले मूल्यांकन बाजूस सारून रोज आपल्या अंतर्मनाशी किमान अर्धा तास संवाद साधणे गरजेचे आहे. त्यामुळे जीवन सुंदर व समृद्ध करण्यासाठी संयम, समाधान आणि अंतर्मनाशी रोज हितगुज या त्रिसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे आहे असे मत न्यूज १८ मराठी वाहिनीचे पत्रकार व न्यूज अँकर विलास बडे यांनी व्यक्त केले.
भिगवण येथील अखिल भारतीय मराठा महासंघ व छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त भिगवण येथे राजमाता जिजाऊ व्याख्यान मालेत ' जीवन चक्रव्यूहातील आजचा अभिमन्यू ' या विषयावर व्दितीय पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जेष्ठ नेते प्रदीप गारटकर, महाराष्ट्र प्रदेश भाजपचे विशेष निमंत्रित सदस्य मारुतराव वणवे, प्रायोजक प्रतिनिधी म्हणून स्वामी चिंचोली येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, बारामती येथील गिरीराज हॉस्पिटलचे डॉ. रमेश भोईटे, राजेगाव येथील राजनाथ दूध संकलन व शीतकरण केंद्राचे चेअरमन व दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भारत खराडे, राजेगाव येथील सार्थक डेअरी, सार्थक रोड लाईन्स, सार्थक फर्टीलायझर चे लक्ष्मण ठोंबरे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
विलास बडे पुढे म्हणाले, आज काल मुली घरातून पळून जात आहेत, त्यास माझा विरोध नाही. मात्र त्यांनी पळून जाताना सोबत एक विज्ञान, एक भूगोल, एक गणित आणि एक, दोन महामानवांच्या चरित्राचे पुस्तक घेऊन जाणे गरजेचे आहे. त्यामुळे अविचाराने पळून जाणाऱ्या मुलींचे जीवन बरबाद होण्यापासून वाचू शकते. महाभारतात अभिमन्यू ला चक्रव्यूह भेदून बाहेर कसे यायचे हे माहीत नव्हते, परंतु आजच्या अभिमन्यूला चक्रविवाहातून बाहेर कसे पडावे? हे सांगण्या करिता आई वडिलांच्या रूपाने साक्षात दोन दोन कृष्ण उपलब्ध आहेत. त्यांचा मुलांनी आदर केला, त्यांच्याशी संवाद साधला तर जीवन चक्रव्यूहात अडकलेला आजचा तरुण सहज बाहेर पडू शकतो.
त्यांनी शेवटी ' मला वेळ नाही....' ही कविता सादर करून माणसाच्या अधोगतीचे कारण स्पष्ट केले.
यावेळी प्रदीप गारटकर म्हणाले, जीवघेणी स्पर्धा, प्रचंड मानसिक ताणतणाव, असंतुलित आहार, दैनंदिन व्यायामाचा अभाव, हवा, पाणी आणि अन्न प्रदूषण यामुळे माणसाची अवस्था चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यू सारखी झाली आहे. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी नियोजनबध्द पद्धतीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी व्याख्यानमानेतून विचारांची आदानप्रदान महत्वाची असून हा उपक्रम स्तुत्य व अनुकरणीय आहे.
यावेळी प्रा. झोळ, श्री. कोंढरे यांचे देखील भाषण झाले. बाबासाहेब शेळके, भरत मोरे, बबनराव कुटे, बिराजमामा माने, अनिल गलांडे, बाळासाहेब गायकवाड, लहूशेठ घोलप, राजेंद्र गायकवाड, नामदेव जगताप, सचिन जामले, तुकाराम काटकर, दिनेश मारणे, उमेश डिडवळ, किरण लंगोटे, दीपक सूर्यवंशी, धनाजी नलवडे, संतोष दाभाडे, अनिल गलांडे यांनी महासंघाचे वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन सुनील वाघ, परिचय वाचन भरत गायकवाड तर आभार प्रदर्शन पांडुरंग वाघ यांनी केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा