*पुणे, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. 9922419159
इंदापूर, डॉ. संदेश शहा. बावडा ( ता. इंदापूर, जि. पुणे ) परिसरातील घरकुल लाभार्थी तसेच भूमिहीन नागरिकां साठी अत्यंत दिलासा देणारी आनंदाची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील ठाकरे यांच्या निरंतर प्रयत्नांना अखेर मोठे यश प्राप्त झाले आहे. हा निर्णय इतरांना पथदर्शी ठरण्याची शक्यता आहे.
बावडा ग्रामपंचायत अंतर्गत येथील घरकुल लाभार्थी व भूमिहीन नागरिकांना गायरान जमीन उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी केलेल्या प्रभावी पाठपुराव्यामुळे तब्बल १३२ नागरिकांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या विविध घरकुल योजनांमध्ये अनेक लाभार्थ्यांची निवड झाली होती. मात्र स्वतःच्या मालकीची जागा नसल्याने अनेक कुटुंबांना घर बांधकाम सुरू करता येत नव्हते. त्यामुळे अनेक गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व भूमिहीन कुटुंबांचे घराचे स्वप्न केवळ कागदावरच राहिले होते. या गंभीर समस्येची दखल घेत अंकिता पाटील ठाकरे यांनी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, बारामती उपविभागीय अधिकारी व गट विकास अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. यावेळी सागर मिसाळ उपस्थित होते.
गायरान जमीन उपलब्ध करून देण्याबाबत अनेक बैठका, चर्चा तसेच प्रशासकीय स्तरावर आवश्यक त्या सूचना करून नागरिकांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या सकारात्मक आणि लोकाभिमुख भूमिकेमुळे अखेर प्रशासनाने या विषयाला गती देत संबंधित लाभार्थ्यांसाठी गायरान जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता १३२ कुटुंबांना स्वतःचे हक्काचे घर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे अनेक भूमिहीन व सर्वसामान्य कुटुंबांच्या आयुष्यात स्थैर्य निर्माण होणार असून त्यांच्या कुटुंबाला सुरक्षित निवारा मिळण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर काम करताना अंकिताताईंनी दाखवलेली संवेदनशीलता आणि तत्परता नागरिकांमध्ये विशेष कौतुकाचा विषय ठरत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख व लोकहिताचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नयेत म्हणुन बावडा गावातील बेघर भूमिहीन लाभार्थीनां घरकुल बांधणेकरिता गायरान जागा मिळणेसाठी अंकिता पाटील ठाकरे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. या कामी राज्याच्या उपमुख्यमंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रावहिनी पवार, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे अंकिता पाटील ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी लाभार्थी नागरिकांनी भावना व्यक्त करताना सांगितले की घरकुल मंजूर होऊनही केवळ जागेअभावी आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अंकिताताईंनी आमच्या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आमचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.”




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा