करमाळा तालुका प्रतिनिधी- अलीम शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-98506636830*
राज्यातील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यासाठी राज्य सरकारने ५ हजार ४०० कोटी रूपयांच्या विकासनिधीची उभारणी केली असुन पुढील वर्षापासून शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधून कुशल रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. करमाळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस रा.स्व. संघाचे माजी सहकार्यवाहक स्व.मदनदासजी देवी औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण करण्यात आले असून याचा नामांतर सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्या हस्ते व मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी आमदार नारायण पाटील, नगराध्यक्ष मोहिनी सावंत, जिल्हा परिषदेच्या गटनेत्या रश्मी बागल, माजी आमदार राम सातपुते, जि. प. शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत, भाजपाचे गणेश चिवटे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, सहसंचालक चंद्रशेखर ढेकणे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मनोज बिडकर, स्व.मदनदास देवी यांचे बंधू खुशालदास देवी,पुतणे राधेश्याम देवी व त्यांच्या परिवारातील सदस्य याशिवाय भाजपाचे कार्यकर्ते संजय घोरपडे आदी उपस्थित होते.
राज्यभरातील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून इंजिनिअरिंग व एमबीए च्या तोडीचे प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधून देण्यात येणार आहे. स्व. मदनदास देवी यांच्या जन्मगाव असलेल्या येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पुढील वर्षा पासुन नव्याने आणखी सहा कोर्सेस सुरू करण्यात येणार असुन त्यामध्ये दोन कोर्सेस मुलींसाठी ऐच्छिक स्वरूपात सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी करून टाटा इन्स्टिट्यूट राज्यभरात येत्या सहा महिन्यात ५६ टेक्निकल इन्स्टिट्यूट सुरू करणार असून त्यातील एक इन्स्टिट्यूट सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे प्राधान्याने सुरू करण्याची घोषणाही मंत्री लोढा यांनी केली. स्व. मदनदास देवी यांनी आपले संपूर्ण जीवन देशसेवेसाठी समर्पित केले. त्यांचा परिवार म्हणजे देशातील शंभर कोटी जनतेचा होता असे मंत्री लोढा यांनी सांगून आयटीआय मधून चार ते सहा महिन्याच्या कमी कालावधीचे कोर्सेस सुरू करण्याच्या विचाराधीन सरकार असून याकरिता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांच्या सेवकांनी वेळ द्यावा असे आवाहन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुभ संदेश ध्वनीचित्रफितीद्वारे कार्यक्रम स्थळी दाखवण्यात आला. रा.स्व. संघाचे प्रचारक सुनील आंबेकर यांनी स्व. मदनदास देवी यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बिडकर यांनी केले तर आभार संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे सतीश सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमास रा.स्व. संघाचे राज्यभरातील पदाधिकारी, करमाळ्यातील भाजपा चे पदाधिकारी व कार्यकर्ते, व्यापारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा